तब्बल ३० वर्षे गाजवलेली इजिप्तची सत्ता
कैरो : इजिप्तवर तीस वर्ष सत्ता गाजवणारे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. इजिप्तमध्ये २०११ मध्ये झालेल्या आंदोलनानंतर त्यांना सत्ता सोडावी लागली होती.
होस्नी मुबारक यांच्या ३० वर्षांच्या सत्ताकाळात अमेरिका व इस्त्राएल बरोबर इजिप्तचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली होती. इजिप्तमध्ये युवकांनी लोकशाहीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाने त्यांच्या सत्तेला आव्हान मिळाले.
होस्नी मुबारक यांच्या विरोधात इजिप्तमधील युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लढा उभारला. आंदोलना दरम्यान इजिप्तमध्ये हिंसाचारही झाला होता. राजधानी कैरोतील तेहरीर चौकामध्ये लाखो नागरिकांनी निदर्शने केली. सलग १८ दिवस तेहरीर चौकातील आंदोलन सुरू होते. होस्नी यांच्याविरोधात इजिप्तचे लष्करही उभे राहिले. अखेर त्यांना ११ फेब्रुवारी २०११ मध्ये सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
अरब क्रांतीनंतर मुबारक यांना अनेक वर्षे तुरुंगात रहावे लागले होते. पण २०१७ मध्ये बहुतांश आरोपांतून मुक्तता झाल्याने मुबारक यांना तुरुंगातून बाहेर पडणे शक्य झाले. मुबारक यांनी अरब जगतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचे नेतृत्व केले होते.