कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. ग्रामीण भागात आपल्या मातृभाषेची विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करणाऱ्या ऋजुता तायडे यांच्याविषयी...
यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील ऋजुता तायडे यांचा यंदाच्या उस्मानाबाद येथील मराठी साहित्य संमेलनातील ‘जागर मराठीचा’ हा स्टॉल आकर्षणाचा विषय ठरला. वारली चित्रकलेतून मराठी भाषा व आपली संस्कृती मांडण्याचा उपक्रम त्यांनी या माध्यमातून राबविला. ऋजुता अशोक तायडे या दिग्रस तालुक्यातील सिंगद या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवित असणार्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे त्या विद्यार्थ्यांच्याही लाडक्या. आजची ग्रामीण पिढी आणि त्यांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढत असलेला ओढा ऋजुता यांना चिंतीत करतो. खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा, त्यांचा तो अप टू डेट गणवेश, विद्यार्थ्यांचं बाह्यरुपडं पालटणारं असलं तरी त्या शाळा विद्यार्थी घडविण्यात मात्र कमी पडतात, असे मत त्या व्यक्त करतात. आपल्या मुलांना एखादी इंग्रजी कविता म्हणता आली की, आता ते इंग्रजी बोलण्यात पारंगत झाले, असे पालकांना वाटते; पण आपल्या मातृभाषेतील ज्ञान, संस्कार कमावण्याच्या वयात ही मुले मात्र पाश्चिमात्त्य संस्कृतीकडे वाहवत जातात.
ऋजुता यांना विद्यार्थी घडविण्याचे बाळकडू आईवडिलांकडूनच मिळाले. त्यांचे आईवडील माध्यमिक शाळेत मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षक असल्याने घरात कायमच शैक्षणिक वातावरण असायचे. आपल्या आईवडिलांच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल बघून आपणही त्यांच्यासारखे कार्य करावे, यासाठी ऋजुता कायम प्रयत्नशील राहिल्या. ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाबाबतीत खूप गैरसोय होते. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावे हीच प्रेरणा मनात ठेवून काम करायचे, तायडे यांनी ठरवले. त्यांनी ‘मराठी’ विषयात पदव्युत्तर पदवी घेत आपले शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, त्या लग्न करून यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणाहून एकदम ग्रामीण भागात म्हणजेच दिग्रस तालुक्यातील लाख रायाजी या खेडेगावात आल्या. लग्न झाल्यावर काही महिन्यांतच त्यांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीची संधी मिळाली.
ऋजुता यांचे सासरे गावचे सरपंच. शेतीही भरपूर होती. त्यामुळे त्यांच्या घरात कोणालाही नोकरी करण्याची गरज नव्हती. ऋजुता यांचे पती व्यवसायानेे डॉक्टर असले तरी ते शेतीकडे विशेष लक्ष द्यायचे. त्यामुळे नोकरी करायला मिळेल, अशी कोणतीच शक्यता ऋजुता यांना दिसत नव्हती. त्यात पतीकडूनसुद्धा नोकरी करण्यास नकार आल्याने ऋजुता यांची निराशा झाली. परंतु, सासर्यांनी नोकरी करण्यास परवानगी दिली. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलाची समजूत काढली आणि येथूनच ऋजुता यांचे शैक्षणिक कार्य सुरू झाले. १९९० मध्ये लाख रायाजी याच गावातील जिल्हा परिषदेतील पाचवी ते सातवीच्या वर्गांवर शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या. रुजू होताच त्यांनी ग्रामीण भागातील रोजगार व इतर संधी लक्षात घेता, मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला. मुलांनाही ते आवडू लागले. याच दरम्यान त्या अंगणवाडीत जाऊन तिथे असणार्या मुलांनाही शिकवत. तसेच तेथे गरोदर महिला, नुकत्याच बाळंत झालेल्या महिलांना आरोग्य, आहार, लसीकरण याबाबत मार्गदर्शन करत. गावात ऋजुता यांच्या कुटुंबाचे प्रस्थ असल्याने त्यांना अधिक चांगल्यारितीने काम करता येऊ लागले. लाख रायाजी येथे त्यांनी आठ वर्षे काम केल्यानंतर त्यांची बदली सावंगा या अगदी छोट्या गावात झाली.
या ठिकाणी एका वर्गातील ६५ मुलांपैकी फक्त पाच मुलांना लिहिता-वाचता येत होते. मुलांची वर्गातील नियमित उपस्थितीही कमी होती. त्यामुळे मुलांचा शिक्षणाकडे कल वाढावा, त्यांची शिक्षणात रुची निर्माण करावी, हे सर्वात मोठे आव्हान ऋजुता यांच्यासमोर होते. मुलांना काव्य, कथा लिहण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले व मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण केली. केवळ सहा महिन्यांत सर्व ६५ मुले उत्तम वाचन व लिखाण करू लागली. ‘भावविश्व’ हा उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केला. एका शब्दावरून मुलं उत्तम लिखाण करू लागली. या मुलांचे परीक्षेतील निबंध बघून शिक्षणाधिकारीही चाट पडले. मुलांना काव्य, कथा लिहिण्यास ऋजुता यांनी प्रोत्साहन दिले व मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण केली. २०११ मध्ये त्यांची वरूडला बदली झाली.
सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या कार्याचा मोठा प्रभाव ऋजुता यांच्यावर आहे. त्यामुळे त्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिक्षण व एक चांगला समाज घडविण्याच्या दृष्टीने कायम प्रयत्नशील असतात. मराठी भाषा, आपली संस्कृती यांची पाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य त्या गेल्या ३० वर्षांपासून करत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणजे ‘मी सावित्री’ हा उपक्रम. सावित्रीबाईंच्या वेशभूषेतील वर्गात फार कमी बोलणारी दिव्यांग मुलगी ‘मी सावित्री आहे’ असे बोलून स्वतःला सावित्रीबाईंच्या जागेवर पाहते. त्यानुसार आपणही शिकावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे तिला वाटते, ही भावना केवळ एक शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये जागृत करू शकतो. २०११ ते २०१६ या पाच वर्षांत ऋजुता यांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या सात काव्यसंग्रहांचे प्रकाशन केले.
सध्या त्या कार्यरत असणार्या गावात शैक्षणिक वातावरण कमी असल्याने मुलांमध्ये शिक्षणाची रुची निर्माण होण्यास अनेक अडचणी आल्या. शाळेतील अनेक मुलं त्यांच्या पालकांसोबत ऊसतोडणी, वीटभट्टीवर काम करण्यासाठी स्थलांतरित होतात. वर्षातील केवळ तीन महिने ही मुलं शाळेत येतात. या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, तीन महिन्यांत वेगवेगळे उपक्रम राबवत या मुलांनी इथेच थांबून शिक्षण घ्यावे, याकरिता त्या प्रोत्साहन देत आहेत. आज ऋजुता यांच्यासारखे आदर्श शिक्षक मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत हे अगदीच स्तुत्य आहे. कोणत्याही पुरस्काराची व गौरवाची अपेक्षा न ठेवता आपल्या कार्यातून ग्रामीण मुलांचे भविष्य उज्ज्वल करणार्या या सावित्रीच्या लेकीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!