पारंपरिक पद्धतीबरोबरच विज्ञानाची कास धरून शेती केली तर शेतीही नफ्याची ठरते. यासाठी थोडे नियम आणि प्रयत्नांची जरूरी आहे. याचे तंत्र शिकवणारे पवन पाखले. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगलीचे पाखले कुटुंब हे पिढीजात शेतकरी. ज्ञानदेव पाखले आणि शोभा पाखले या सुशिक्षित दाम्पत्याला तीन अपत्ये. दोन मुली एक मुलगा. तो मुलगा म्हणजे पवन होय. ज्ञानदेव माजी सैनिक. मात्र, सैनिकी पेशातून निवृत्त झाल्यावर त्यांनी घराची एकी अबाधित राखण्यासाठी शेती करायचे ठरवले. भाऊ-भाऊ मिळून पिढीजात शेती एकोप्याने करू लागले तर घरपण टिकते, एकी राहते असा यामागचा हिशोब.
मात्र, इतर शेतकर्यांप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने पाखले कुटुंबीयही शेती करत. पण ही शेती बेभरवशाची. पवन तेव्हा १२ वर्षांचे असतील. वडिलांनी मोठ्या आशेने त्यावेळी दुधी भोपळ्याचे पीक घेतले. ५५ दिवसांमध्ये पीक हातात येईल, बाजारभाव मिळेल, त्यातून पोराबाळांसाठी कापड-चोपड, घरासाठी इतर वाणसामान घेऊ हे स्वप्न बघत ५५ दिवस कधी गेले समजले नाही. भल्या पहाटे ज्ञानदेव, शोभाबाई आणि पवन दुधी भोपळ्याच्या राशी घेऊन इस्लामपूर बाजारात आले. एक किलो दुधीला किमान १० रुपये मिळावेत हा त्यांचा अंदाज. मात्र, दुपार झाली, उन्हं उतरली तरी दुधी भोपळ्याला भाव मिळेना. शेवटी दीड रुपया किलोने दुधी विकावा लागला. त्यावेळी नफा तर सोडाच, पण पीकखर्चही काढता आला नाही. सूर्य मावळत होता आणि ज्ञानदेव-शोभाबाई डोळ्यातली आसवं पुसत गावाकडे परतत होती. हे पवन यांनी पाहिले होते. ते दृश्य ते कधीही विसरू शकले नाहीत. शेतीतल्या कमी उत्पन्नाला वाढवता कसे येईल, आई-बाबांचे दु:ख कमी कसे करता येईल या विचारात ते कायम मग्न असत. शाळेत कमी आणि शेतात जास्त जाऊ लागले. परिणामी, नववीला ते अनुत्तीर्ण झाले. शिक्षणातून त्यांचे मनच उडाले. शेवटी ज्ञानदेव यांनी पवन यांना समजावले की, आपण शेतकरीच आहोत. तुला शेतीची आवड आहे ती तू करशीलच. पण आयुष्यात दुसरेही काहीतरी शिकायला हवे. त्यासाठी मग पवन गुजरातच्या राजकोट येथे सुवर्णकाम शिकायला गेले. तेथे तीन वर्षे पवन यांनी सुवर्ण कारागिरीचे शिक्षण घेतले. तेथील राहण्याचा खर्च वडिलांवर पडू नये म्हणून तेव्हा प्रेसमध्ये रात्रपाळी करू लागले. पेपरचे गठ्ठे बांधण्याचे काम करू लागले. पुढे तीन वर्षांनी ते गावी परतले. गावात त्यांनी छोटेसे दुकानही थाटले. पण पवन यांचा हा काही पारंपरिक व्यवसाय नव्हता. त्यामुळे सुरुवातीला तीन वर्षे अनेक उंबरठे झिजवूनही त्यांना काम मिळालेच नाही. आई-वडील धीर द्यायचे. पण तो काळ प्रचंड मनस्तापाचा होता. कारण, गावातले तसेच काही नातेवाईक ज्ञानदेवांना म्हणायचे, आपण शेतकरी, सोन्या-चांदीचा काय संबंध. हा पोरगा डुबवेल सगळं. पण ज्ञानदेव आणि शोभा यांनी पवनला नेहमी साथच दिली. पुढे पाच-सहा वर्षांच्या चिकाटीनंतर पवन यांना थोडी कामे मिळू लागली. पण या सगळ्या धकाधकीत पवन यांनी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. तसेच शेतीबद्दलची अनेक पुस्तके वाचली. नव्हे गावातले चांगले पीक उत्पन्न घेणार्या शेतकर्याचा ते अभ्यासच करत की, या शेतकर्याने काय केले म्हणून त्याचे पीक चांगले आले. पिकाला बाजारभाव चांगला आला. कुणाच्या बोलण्यात आले की, अमूक एक शेतकरी बक्कळ पीक-पाणी घेतोय, तर पवन त्याला भेटायला जायचे. या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना बरेच शिकायला मिळत होते.
अशातच पाखले कुटुंब श्री श्री रवीशंकरजींच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या शिबिरांना जायचे. तेथेच बंगळुरूचे सेंद्रीय शेतीचे अभ्यासक प्रभाकर राव यांची आणि पवनची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने पवन यांनी बंगळुरू येथे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ पुरस्कृत शेतीआधारित कोर्स केला. तेव्हा पवन यांना शेतीसंदर्भातला नवा दृष्टिकोन प्राप्त झाला. पुढे सांगलीमध्ये परत आल्यानंतर पवन यांनी शेती संशोधनामध्ये स्वत:ला अक्षरश: गाडून घेतले. रासायनिक खते, औषधे नसताना आपले पूर्वज कशाप्रकारे शेतीउत्पन्न जास्त घेत असतील याचा त्यांनी शोध घेतला. गाईपासून निर्माण होणार्या पंचगव्याचा शेतीसाठी कसा उपयोग होऊ शकतो, याचा त्यांनी अभ्यास केला. त्यातून त्यांना गोआधारित शेती हा मूलमंत्र मिळाला. रासायनिक खताऐवजी सेंद्रीय खत वापरणे, जमिनीची क्षमता वाढवणे, त्याआधी शेतकर्याने स्वत:ची क्षमता वाढवावी, एकच पीक न घेता, एकाच वेळी बहुपीक घ्यावे, त्यातही मका, चवळी आणि झेंडू पीक आवर्जून घ्यावे. कारण, कोणतेही रोग याच पिकांवर आधी येतात. त्यामुळे मुख्य पिकांवर रोगाची धाड कमी पडते. तसेच कीटकनाशक फवारणीमध्ये नासलेल्या ताकाची फवारणी केली तर चांगला परिणाम मिळतो. अमावस्येच्या दोन दिवस अगोदर आणि पौर्णिमेच्या दोन दिवसानंतर कीटकांच्या विणीचा हंगाम असतो. त्यावेळी ही फवारणी केली तर पिकांवर हल्ला करणार्या, रोग उत्पन्न करणार्या कीटकांची पैदास रोखू शकतो. हेच अनुभव ते आजूबाजूच्या शेतकर्यांना देऊ लागले. काही शेतकर्यांना स्वत:चे पैसे देऊन अशा प्रकारे तंत्रयुक्त शेती करण्यास उद्युक्त केले. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७०० शेतकरी पवन यांच्या संपर्कात आले. त्यांनी सांगितलेल्या साध्या सोप्या पारंपरिक पण विज्ञाननिष्ठ पद्धतीने शेती करू लागले. आशादायक म्हणजे, या शेतकर्यांचे शेती उत्पन्न वाढले. पवन आज सांगलीच्या शेतकर्यांमध्ये शेतीसंदर्भात जागृती करत आहेत. स्वत:च्या पदराला खार लावून आपला शेतकरीबांधव कसा सुखी होईल, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सातत्याने नवनवे प्रयोग, संशोधन करत आहेत. हे सगळे का, तर शेतकरीबांधवाने निसर्गाच्या प्रकोपाचे बळी ठरू नये. त्याचेही जीवन सुखी व्हावे म्हणून. बळीराजासाठी पवन यांचे सुरू असलेले कार्य शब्दातीत आहे.