ऐतिहासिक लेखन करणारे अनेकजण असतील, पण त्याला तत्कालीन किंवा समकालीन संदर्भांची जोड दिली की, त्या त्या काळाचे चित्र स्पष्ट होते. मराठ्यांच्या इतिहास लेखनात मात्र गेल्या कित्येक वर्षांमध्ये एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा इतिहास सांगणारेही लेखक झाले. सध्याच्या काळात तर अशा लेखक आणि व्याख्यात्यांची बरीच नावे अवतीभवती दिसतात. परंतु, त्या कोणातही आपले नाव सामील होऊ न देणारे इतिहास लेखक, अभ्यासक म्हणजे कौस्तुभ कस्तुरे. गेल्या रविवारी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी महेश पुराणिक यांनी कौस्तुभ कस्तुरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग प्रकाशित करण्यात आला. आता या मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित करत असून यावेळी समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, इतिहास लेखनाची साधने आणि अन्य विषयांवर कस्तुरे यांनी साधलेला हा मनमोकळा संवाद...
- महाराष्ट्रात विशिष्ट समुदायांकडून नेहमीच वादाचा केला जाणारा विषय म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आपण रामदास स्वामींवरही ‘समर्थ’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. याच विषयाला अनुसरून आजच्या घडीला आपल्या आजूबाजूला जे काही चालले आहे, ते आपण पाहतच आहोत. परंतु, त्या काळात समर्थ रामदास स्वामी, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, याकूत बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेमके संबंध कसे होते, याबद्दल आपण काय सांगाल?
समर्थांची ‘जात’ हे एकमेव कारण आहे त्यासाठी आणि हे न समजण्याइतके कोणीच अनभिज्ञ नाही. रामदास स्वामींनी सतराव्या शतकात महाराष्ट्रात जो एक वेगळा विचारप्रवाह मांडला तो सर्वार्थाने गरजेचा होता. म्हणजे वैष्णव पंथ हा योग्य आहेच, त्यात वाद नाहीच. त्याच्या जोडीला रामदासी पंथ आला, ज्यात बलोपासनेला महत्त्व होते. समर्थांच्या वाङ्मयात हे आपल्याला जागोजागी जाणवते. अगदी समर्थ स्वतः म्हणतात की, ‘शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना’ आणि हे त्या काळी आपल्याला इतिहासाच्या पानोपानी आढळते. मुघल, आदिल, निजाम या तीन मुख्य शाह्या, त्यांच्या जोडीला गोमंतक काबीज केलेले पोर्तुगीज, जंजिरेकर सिद्दी वगैरे लोक केवळ बळाच्या जोरावर इथल्या निर्बल जनतेवर अत्याचार करत. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी बलोपासनेचे हे महत्त्व वेळीच ओळखून आपले सैन्यबळ वाढवण्यास सुरुवात केली आणि पुढे स्वराज्याचा उद्योग बळकट झाला. समर्थांनी नेमके हेच केले, गावोगावी बलोपासनेचे महत्त्व समजावले. पण दुर्दैव म्हणजे, समर्थांच्या एकंदर कार्याकडे आपण सगळेच दुर्लक्ष करून शिवाजी महाराजांचे त्यांच्याशी संबंध कसे होते, ते महाराजांचे गुरू होते इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. समर्थ शिवरायांचे गुरू असल्याने वा नसल्याने दोघांपैकी कोणाच्याही कार्याचे महत्त्व कमी होत नाही.
आपल्याकडे महाराष्ट्रात दोन टोकाच्या विचारधारा आहेत. एक म्हणजे ‘रामदासांचा शिवरायांशी संबंध कधीच आला नाही’ असे म्हणणारा, तर दुसरा ‘रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू, त्यांच्यामुळे स्वराज्य स्थापन झाले’ म्हणणारा प्रवाह. वास्तविक हे दोघेही चुकीचे आहेत. शिवाजी महाराज आणि समर्थांची पहिली थेट भेट प्रत्यक्ष पुराव्यांनुसार १६७२ची आहे. खुद्द समर्थांनी संभाजीराजांना लिहिलेल्या अंतःकाळच्या पत्रात ‘परिधाविनाम संवत्सरी सिंगणवाडीचे माथी हनुमंतासमोर परमार्थ जाला’ म्हटले आहे. ‘खरे जंत्री’नुसार हे साल १६७२-१६७३ असे आहे. शिवाय इतरही पत्रांवरून हे सिद्ध होते. तेव्हा १६४९ पासून शिव-समर्थ संबंध होते, रामदासस्वामी हे शिवरायांचे राजकीय गुरू होते असे जे म्हणतात ते साफ चुकीचे आहे. शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेशी समर्थांचा कसलाही थेट संबंध नाही. स्वतः शिवाजी महाराजांना लिहिलेले’ निश्चयाचा महामेरू’ हे पत्र १६७० नंतरचे आहे हे उघड आहे, त्यातही शेवटी ‘तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण जाले, काय नेणो’ असे समर्थ म्हणतात, हे आपण लक्षात नाही घेत. पण म्हणून शिव-समर्थ संबंध कधीच नव्हते असे कोणी म्हटले तर तेही चूक आहे. १६७२ नंतर महाराजांनी समर्थांकडे विशेष लक्ष पुरवले. महाराजांनी स्वराज्याचे जे काम आरंभले होते, त्याचा उद्देश आणि समर्थांची शिकवण समान असल्याचे जाणवल्यामुळे असेल कदाचित, पण यानंतर या दोघांशी संबंधित पुष्कळ पत्रव्यवहार उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांनी ‘सज्जनगड’ आणि ‘महिपतगडा’पैकी एक किल्ला निवडून तिथे ‘हवे तितके दिवस राहा, हवे तेव्हा उतरा’ म्हटले त्यावरूनच हे शिवरायांचे मन समजते. एरवी गोसावी-बैराग्यांना राजकारणात ढवळाढवळ न करू देणार्या, चिंचवडकर देवांना ‘आमची बिरादी तुम्ही घ्या, तुमची आम्हास द्या’ म्हणणार्या महाराजांनी थेट अशा एका महत्त्वाच्या किल्ल्यावर समर्थांना ‘घर जागा बारा करून देणे, बोभाट कानावर आलियास साहेब मुलाहिजा करणार नाहीत’ अशी जिजोजी काटकराला ताकीद दिली, हे सगळे सिद्ध करत नाही का? ‘चाफळ सनद’ हा वेगळा विषय आहे, त्यात उल्लेखलेले ‘श्री सद्गुरुवर्य’ हे शब्द ‘राजकारणी गुरू’ अशा अर्थाने नसून ते आध्यात्मिक वंदनीय अशा अर्थाने आहेत.
तुकाराम महाराजांचा काळ हा शिवरायांच्या बालपणाचा आहे. १६४९ मध्ये जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला गेले, तेव्हा नुकतेच कुठे स्वराज्य सुरू होत होते. त्यामुळे शिवरायांशी त्यांचे संबंध प्रस्थापित होण्याची आशाच नव्हती. पुढे संभाजीराजांनी तुकोबांचे पुत्र नारायणबुवा देहूकर यांना सनद दिली आहे, जी उपलब्ध आहे.
केळशीकर बाबा याकूत यांचं नाव माझ्या माहितीप्रमाणे केवळ ९१ कलमी बखर सोडल्यास कुठेही येत नाही. त्याबद्दल अजून कागदपत्र सापडल्यास काही सांगता येईल. ९१ कलमी बखरीवर विसंबून निष्कर्ष काढणे कठीण आहे. शिवदिग्विजय बखरीतही शिवाजी महाराजांना वंदनीय असणार्या १४ पुरुषांची नावे आहेत, त्यात तुकाराम महाराजांचेही आहे आणि समर्थांचेही आहे. अर्थात, यात निश्चलपुरी गोसावी, परमानंद गोविंद नेवासकर वगैरेही नावे आहेत आणि रामदासी संप्रदायातील इतर समर्थशिष्यांचीही नावे आहेत.
- सध्या गल्लोगल्ली स्वतःला ‘इतिहासकार’ म्हणवून घेत स्वतःची पुस्तके छापणारी आणि खपवणारी मंडळी दिसतात. अशा लोकांच्या खोगीरभरतीत स्वतःची गणना होऊ न देता आपण इतिहासलेखनाची परंपरा पुढे नेत आहात. याबद्दल आपल्याला काय वाटते?
माझ्या आकलनाप्रमाणे बर्याच जणांना इतिहास म्हणजे पोट भरायचे साधन वाटते आणि त्याप्रमाणे ते पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्याकडे बघतात. हे जेव्हा होते तेव्हा इतिहासातील माहिती बाजूला राहून केवळ पोपटपंची करून लोकांना भुलवायचे आणि पैसा कमवायचा एवढेच काय ते उरते. इतिहास हा माझ्या पोटापाण्याचा विषय नाही, किंबहुना मी तो होऊ दिला नाही आणि होऊ देणारही नाही. माझे शिक्षण आयटीमधील असून एमबीए झाल्यानंतर मी डिजिटल मार्केटिंगमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे पोटाकरता इतिहास हे तत्त्व नाही. इतिहास वाचन ही मुळात आवड असल्याने, त्यातच चुकीचा इतिहास बाहेर पसरतो आहे हे पाहून ते गैरसमज दूर करण्याच्या निमित्ताने अभ्यासाकडे वळलो. हे क्षेत्र असे आहे की, तुम्हाला प्रसिद्धी अथवा पैशाची चटक लागली तर सगळे संपले. तुमच्याकडून त्यानंतर काम व्यवस्थित होणार नाही. जमीन आणि तुमच्या पायात अंतर भासू लागले की समजावे आपला रस्ता चुकतो आहे. इतिहास अभ्यासात मतभेद असतात, ते असावेतही. मी ज्यांना ‘गुरू’ मानतो, अशा व्यक्तीशीही माझे अनेक बाबतीत मतभेद आहेत. ते त्यांनाही माहीत आहेत, पण त्यांनी कधीच हे असे करू नका सांगितले नाही किंवा अमूक एक गोष्ट जी त्यांच्या मांडणीच्या विरोधात आहे ती मांडण्यास आडकाठी केली नाही. उलट प्रोत्साहनच दिले. हे सगळे होत असताना, अशी मायेची माणसे डोक्यावर आशीर्वादाचा हात धरून असताना पैसा आणि प्रसिद्धी नगण्य असते. आजही मी हे तत्त्व कसोशीने पाळतोय. व्याख्यानासाठी जेव्हा विचारले जाते तेव्हा मानधनाबाबतही विचारतात. यावेळी माझे उत्तर एकच असते की, इतिहास हा माझा अर्थार्जनाचा विषय नाही, अगदी नाही दिले तरी मी एका शब्दाने मागणार नाही. आयुष्यभर मी हे तत्त्व कसोशीने पाळणार आहे, हे मी माझ्यापुरते पक्के ठरवले आहे.
इतिहासाचार्य राजवाड्यांनी पैसे नसताना, अपमान सहन करूनही इतिहास संशोधन हे ध्येय मानले. ग. ह. खरेंसारख्या तपस्व्यांनी माधुकरी मागून संशोधन केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्राचा ध्यास घेऊन ते प्रकाशित करण्यासाठी प्रसंगी कोथिंबीरही विकली. हे सारे यांनी पैशांकरिता केले नाही. आपण आज सगळे सुख-समाधान असताना एवढेसुद्धा नाही का करू शकत? मी हा प्रश्न मला स्वतःला विचारलाय केव्हाच, प्रत्येक इतिहास अभ्यासकाने आपल्या स्वतःला विचारावा.
- आपण आपल्या ऐतिहासिक लेखनासाठी नेमक्या कोणत्या माहितीचा, पुस्तकांचा आधार घेता किंवा आपल्या इतिहास लेखनाची साधने कोणती?
इतिहास लेखन हा खरेतर मोठा विषय आहे. म्हणजे ‘साधनचिकित्सा’ नावाचा एक प्रकारच असतो, ज्यात प्रकाशित-अप्रकाशित साधनांची वर्गवारी करून प्राथमिक पुरावे, दुय्यम पुरावे वगैरे तुम्हाला ठरवावे लागतात. यासाठी सर्वसाधारण काही नियम आहेत. वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या ‘साधनचिकित्सा’ या ग्रंथात याबद्दल सगळे उलगडून सांगितले आहे. शिवाय राजवाड्यांनी यावर अनेक निबंध लिहिले आहेत. पूर्वी मला इतिहासविषयक लिखाणासाठी संदर्भ मिळावेत म्हणून पुण्याला जावे लागायचे. ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ म्हणजे संशोधकांची पंढरी आहे. पण, आता काळ बदलतोय. आता जवळच काही संस्थांकडे दुर्मीळ पुस्तके उपलब्ध आहेत, शिवाय अनेक दुर्मीळ पुस्तके मी जमवली, स्कॅन केली, फोटोकॉपी काढल्या, जमेल तितकी विकत घेतली आणि मग त्यामार्फत अभ्यास सुरू केला. अगदीच एखादी गोष्ट अडली अथवा घरी असलेल्या पुस्तकात नाही सापडली तर बाहेर जाऊन शोधावे लागतेच. अनेकदा तुम्हाला मूळ संदर्भाची आवश्यकता असते, अशावेळेस मग ते मूळ मोडी पत्र पाहण्यासाठी त्या त्या संस्थांशी संपर्क करावे लागतात. या संस्था लांब असल्यास प्रत्यक्ष न जाता तिथून पैसे भरून स्कॅन्स मागवता येतात. एकंदर, इतिहास लेखनाकरिता तुमच्याकडे वेळ हवा, संयम हवा, चिकाटी हवी आणि मुख्य म्हणजे सारासार विचार करण्याची वृत्ती हवी. माझ्याकडे हे सगळे आहे, अशी बढाई मी अजिबात मारणार नाही, पण त्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो.
- समोरचा लेखक, इतिहासकार हा अस्सल तेच सांगतोय, खोटे काहीही सांगत नाही, हे सर्वसामान्य वाचकांनी किंवा ज्याला इतिहासाबद्दल काहीच माहिती नाही त्याने कसे ओळखावे?
हा प्रश्न खरोखरंच आवडला. अमूक एक जण आपल्या विचारांचा आहे म्हणून तो खरेच बोलत असणार, तो कशाला खोटे बोलेल. इतकेच नव्हे तर तो माझ्या जातिधर्माचा आहे, मग तो कसाही असला तरी मी त्याचेच ऐकणार ही गोष्ट आजकाल खूप फोफावत चाललीय. इतिहास अभ्यासकांना सगळ्यात महत्त्वाचे काय असेल ते म्हणजे पुरावे. कोणीही काहीही सांगत असो, पुरावे आहेत का तपासायचे, ते जर संबंधित पुस्तकात दिले असले तर उत्तम, नाहीतर त्या लेखकाशी संपर्क करून विचारायचे. अनेकदा काय होते, आपल्याला ललित गद्य (Fiction) आणि ललितेतर गद्य (Non-Fiction) यातला फरक समजत नाही. कादंबर्या, नाटक, कविता, चित्रपट, मालिका हे सारे ललित गद्यामध्ये मोडते. त्याला वास्तव अथवा इतिहास समजण्याची गल्लत आपण करता नये. हे न समजल्यामुळेच ‘श्रीमान्योगी’, ‘छावा’, ‘राऊ’सारख्या कादंबर्यांना लोक ‘इतिहास’ समजतात. कादंबरीत बहुतांशी लेखकाचा कल्पनाविलास असतो. तो जरी नसला, तरी त्याला संदर्भासाठी वापरता येऊ शकत नाही. इतिहास हा ललितेतर गद्यात मोडतो, तो पुराव्यांनिशी सिद्ध करावा लागतो. गंमत सांगतो, ‘श्रीमानयोगी’त महाराज जिजाऊसाहेबांना ‘माँसाहेब’ म्हणतात असे दाखवले आहे. याला इतिहासात काही आधार नाही. जिजाबाईसाहेबांचा उल्लेख ‘आईसाहेब’, ‘आऊसाहेब’ असा कागदपत्रांत येतो. शिवाय जे महाराज फार्सीचे मराठीकरण करण्यासाठी आग्रही असतात ते स्वतःच्या आईला फारसीत ‘माँ’ म्हणतील का? पण नाही, या कादंबरीचा ‘संदर्भ’ म्हणून वापर करणारे शिवाजी महाराज ‘माँसाहेब’ म्हणायचे असे छातीठोक सांगतात. तेव्हा नियम एकच, लेखकाने स्वतःहून संदर्भ दिले असतील तर ते तपासून पाहायचे, नसतील तर त्याला विचारून संदर्भ शोधायचे. अनेकदा निष्कर्ष न काढता तर्कही मांडावे लागतात इतिहासात, पण या तर्कांनाही आधार असावे लागतात. जो पुरावे अथवा आधार देऊ शकत नाही आणि छातीठोकपणे सांगतो तो निश्चितपणे काहीतरी हेतू मनात धरून बोलतोय हे उघड आहे. पण मूळ एकच, आधी स्वतः ललित-ललितेतर मधील फरक लक्षात घ्यायचा आणि नंतर आधार तपासायचे. याद्वारे आपण खरे-खोटे सहज करू शकतो.
- ‘इतिहासमित्र’ या मोबाईल अॅप आणि ‘मोडीकस्तुरे’ या फॉन्टविषयीही काय सांगाल?
साधारणतः पाच वर्षांपूर्वी ‘इतिहासमित्र’ हे मोबाईल अॅप्लिकेशन मी सुरु केले होते. ते इतिहासाचा अभ्यास करणार्यांना प्राथमिक माहिती मिळावी म्हणून. उदाहरणार्थ मुसलमानी महिने, जुन्या शब्दांचे अर्थ वगैरे. अर्थात, हे खूपच मर्यादित होते. शिवाय ‘गुगल’ने त्यांची पॉलिसी बदलल्यानंतर सध्या ते अॅप्लिकेशन प्ले-स्टोअरवर उपलब्ध नाही. हे अॅप्लिकेशन एका नव्या रूपात मी लवकरच प्ले-स्टोअरवर अपलोड करत आहे, त्याचे डिझाईन वगैरे आणि माहिती लिहिणे सुरू आहे. त्याबद्दल वेळोवेळी माहिती देत राहीनच.
जवळपास दहा-बारा वर्षांपूर्वी मी ‘मोडी’ शिकलो ती इतिहासाच्या अभ्यासासाठी. स्वतःची स्वतः, कोणताही क्लास न लावता. बाबासाहेबांशी ओळख झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या घरी जाणे-येणे सुरू झाले तेव्हा मी त्यांना मुद्दाम काही दिवस आधी मोडी पत्र पाठवायचो. सुरुवातीला पत्रांमध्ये अनेक चुका असायच्या. पुण्याला गेल्यावर बाबासाहेब सांगायचे की, “पत्र मिळाले, पण चुका आहेत अनेक.” मग ते पत्र काढून काय चुका आहेत ते सगळे व्यवस्थित सांगायचे, हे इथे असे हवे, इथे असे नको. नंतर मग हळूहळू सराव चांगला झाला आणि मोडी येऊ लागली. मला आठवतेय, एकदा रात्री असाच कार्यक्रमानिमित्त गेलो असताना आणि बाबासाहेबांच्या घरी राहणे झाले असताना दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर श्रीमंतांनी त्यांच्या घराण्याची सगळी जुनी पत्र काढून मोडीतले बारकावे शिकवले होते. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही एखादी लिपी शिकता ते शिकवण्या करण्याहून वेगळे असते, केवळ शिकायचे म्हणून नसते. याच ध्यासातून मी मोडीकरिता वेगवेगळे प्रयोग करत गेलो. राजेश खिलारी आणि समीर घाटे यांनी आधीच मोडीचे फॉन्ट्स बनवले होते, पण ते फॉन्ट्स खूप घोटीव होते. मला मोडीचा तो ‘फील’ येण्याजोगा फॉन्ट हवा होता. अखेरीस मग स्वतःच बनवायचा असे ठरवून मी मूळ कागदपत्र स्कॅन करून त्यातून योग्य अशी अक्षरे घेऊन मग त्याचा एक फॉन्ट बनवला, तोच ‘मोडीकस्तुरे.’ पेशवेकालीन वळणाचा हा मोडी फॉन्ट अल्पावधीत लोकप्रियही झाला. फॉन्ट बनवल्यावर बाबासाहेबांना त्यात टाईप केलेले पत्र लिहिले तेव्हा त्यांना समजेना की जुन्या वळणाचे मोडी हस्ताक्षर दिसतेय, पण आपले नाव कसे? ही पावतीच होती माझ्यासाठी. सदर फॉन्टमध्ये अजूनही काही अक्षरे जोडायची आहेत, पण र्ींशीीळेप २.० वापरण्यासाठी माझ्या ब्लॉगवर मोफत उपलब्ध आहे. शिवाय फॉन्ट वापरण्यासाठी आवश्यक असलेली माहितीही तिथे दिली आहे. मोडी जाणकारांनी आणि संगणकावर मोडी लिहू इच्छिणार्यांनी हा फॉन्ट नक्की डाऊनलोड करावा.