कासवांच्या पिल्लांना 'सुरक्षाकवच'; कोकणात कासव संवर्धनासाठी 'टेम्परेचर डेटा लॉगर'चा उपयोग

    11-Feb-2020
Total Views | 131

tiger_1  H x W:
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) -  तापमान बदलामुळे सागरी कासवांच्या प्रजोत्पादनावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेणारा अभ्यास कोकण किनारपट्टीवर सुरू झाला आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या ’टेम्परेचर डेटा लॉगर’ या उपकरणामुळे कासवांच्या पिल्लांच्या मृत्यूदरावर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. रत्नागिरीतील गावखडी आणि सिंधुदुर्गातील वायंगणी किनाऱ्यावरील कासवांच्या घरट्यांमध्ये हे उपकरण बसविण्यात आले आहे. येत्या महिन्याभरात आणखी पाच किनाऱ्यांवर ही उपकरणे लावण्यात येतील.
 
 
 


tiger_1  H x W:
 
 
 
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील ’ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ किनाऱ्यांचा समावेश आहे. 'नोव्हेंबर ते मार्च' हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत या किनाऱ्यांवर कासवांची वीण सुरू आहे. सागरी कासवांच्या प्रजनन प्रक्रियेवर यापूर्वी महाराष्ट्रात शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. मात्र, आता ’भारतीय वन्यजीव संस्थान’च्या (डब्लूआयआय) संशोधिका सुमेधा कोरगावकर या विषयासंदर्भात कोकण किनारपट्टीवर संशोधनकार्य करत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून त्या कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या ’ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या प्रजोत्पादनाच्या प्रक्रियेवर अभ्यास करत आहेत.
 
 


tiger_1  H x W:
 
 
 
बदलत्या तापमानाचा कासवांच्या प्रजोत्पादनावर कसा परिणाम होतो, यासंदर्भात त्यांचे संशोधनकार्य सुरू आहे. कासवांच्या घरट्यामधील तापमानाची नोंद घेण्यासाठी त्यांनी ’टेम्परेचर डेटा लॉगर’ या उपकरणाची निर्मिती केली आहे. गेल्यावर्षी हे उपकरण तयार करण्यासाठी कोरगावकरांना ’सोसायटी फॉर कॉन्झर्वेशन’चे आर्थिक पाठबळ मिळाले होते. यंदा वनविभागाच्या ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’ने दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे त्यांनी अशा प्रकारची सात उपकरणे तयार करून घेतली आहेत. कासवांच्या घरट्यांमधील २८ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान पिल्लांच्या वाढीस पोषक ठरते. ३२ अंश सेल्सिअस पुढील तापमान पिल्लांच्या वाढीस घातक असते. कारण, या तापमानामध्ये घरट्यामधील वाळूत आर्द्रता वाढते. महाराष्ट्रातील किनारे हे खाडीक्षेत्राजवळ असल्याने तेथील वाळूमध्ये आर्द्रता निर्माण होण्याचे प्रमाण जास्त आहे. परिणामी, घरट्यामधील वाळू कडक होते आणि त्यामध्ये पिल्ले अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण आम्ही गेल्यावर्षी रत्नागिरीतील काही किनाऱ्यांवर नोंदविल्याची माहिती कोरगावकरांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. घरट्यांमधील तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअसदरम्यान स्थिर राहते की नाही, हे तपासण्यास ’टेम्परेचर डेटा लॉगर’ मदत करते. या उपकरणामुळे घरट्यामधील वाढते तापमान वेळीच लक्षात आल्याने नियोजनात्मक उपाययोजना राबवून पिल्लांचा मृत्यूदर कमी करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
’डेटा लॉगर’ कसे काम करते ?
 
 
’टेम्परेचर डेटा लॉगर’ हा एक संच असून प्रत्येक संचास उभ्या दांडीसारखे आठ ’सेन्सर’ आहेत. हे ’सेन्सर’ प्रत्येक घरट्यामध्ये लावले जातात. या ’सेन्सर’द्वारे प्रत्येक १० मिनिटांच्या अंतराने घरट्यामधील तापमानाची नोंद होते. ’डेटा लॉगर’मध्ये ’जीएसएम’ यंत्रणा बसविण्यात आल्याने कोरगावकरांना ही माहिती थेट कॅम्पुटरवर मिळणार आहे. यामुळे एखाद्या घरट्यामध्ये तापमान वाढत असल्याची माहिती किनाऱ्यावरील कासवमित्राला देऊन वेळीच उपाययोजना राबवणे शक्य होणार आहे. गावखडी आणि वायंगणी किनार्यावरील घरट्यांमध्ये ’डेटा लॉगर’ लावण्यात आले असून येत्या महिन्याभरात कोळथरे, दाभोळ, आंजर्ले, केळशी आणि माडबन किनाऱ्यावरील घरट्यांमध्ये हे उपकरण लावण्यात येणार आहे.
 
 
“गेल्या काही वर्षांमध्ये सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम आपण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मात्र, आता खरी गरज आहे कासवांवर शास्त्रीय अभ्यास करण्याची. कोकणात कासवांवर शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. आता हा अभ्यास सुरू झाल्यामुळे कासव संवर्धन कामाला अधिक बळकटी येईल.”
- भाऊ काटदरे, प्रणेते, सागरी कासव संवर्धन मोहीम, महाराष्ट्र
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121