अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या 'सीड मदर' अर्थात 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांना नुकताच 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
भारत हा जगभरात कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. हरितक्रांतीमुळे सर्वार्थाने देशामध्ये क्रांतीच घडून आली. या हरितक्रांती पश्चात देशामध्ये संकरित म्हणजेच 'हायब्रीड' बियाणांचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणात होऊ लागला. झटपट पीक मिळवण्याच्या अट्टाहासापायी शेतकरी संकरित बियाणांचा अधिकाधिक वापर करु लागले. परंतु, कालांतराने या बियाणांचे अनेकदा मानवी स्वास्थ्यावरील दुष्परिणामही दिसून आले. काही बाबतीत तर फळे, भाज्या, अन्नधान्य यांची मूळ चवच नाहीशी झाली. त्यामुळे या बियाणांचे फायदे असले तरी याचे काही तोटेही आहेत, हे नाकारून चालणार नाही. अशामध्ये 'जुने ते सोने' म्हणतात ना तेच खरे. कारण, आताच्या आधुनिक शेतीमध्ये पूर्वीच्या बियाणांची साठवण हीदेखील तेवढीच महत्त्वाची ठरते. संकरित बियाणांमुळे पारंपरिक, गावरान वाणांच्या वापराकडे, जतनाकडे दुर्लक्ष झाले. परंतु, अहमदनगरमधील एका निरक्षर महिलेने छंद म्हणून अशा पारंपरिक आणि गावरान वाणांचे जतन केले. सध्या त्यांच्या 'देशी बियाणांची बँक'मध्ये ५२ पिकांचे एकूण ११४ वाण आहेत. त्या महिलेचे नाव म्हणजे राहीबाई पोपरे. कुठलेही शिक्षण नसताना कृषिक्षेत्रात राहीबाईंनी केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे. राहीबाई पोपरे यांना नुकताच भारत सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उचित सन्मानही झाला. महाराष्ट्रातील हे काहीसे परिचित नाव या निमित्ताने देशपातळीवर पोहोचले आहे.
राहीबाई पोपरे यांचा जन्म १९६४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे या आदिवासी गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थितीमुळे राहीबाईंना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. परंतु, शेती आणि निसर्गाच्या शाळेमधील शिकवणीने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. लहानपणापासून त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. राहीबाईंच्या वडिलांकडून त्यांना हे ज्ञान-कौशल्य अवगत झाले. त्यांचे वडील नेहमी 'जुने ते सोने' या तत्त्वावर शेती करत होते. राहीबाईंनी याचा अर्थ समजून घेतला आणि जुने बियाणे जोपासण्याचा छंद त्यांच्यात निर्माण झाला. वाणाचे बियाणे वापरून शेती करण्यावरून अनेकांनी त्यांना वेड्यात काढले होते. सुरुवातीला अनेकांकडून त्यांना याविषयी बोलणीही ऐकावी लागली, पण त्यांनी हा मार्ग सोडला नाही. राहीबाई हे काम पूर्वी छंद म्हणून करत. परंतु, त्यानंतर त्यांनी पारंपरिक पद्धतीने बियाणे गोळा करत आणि शेतीमध्ये त्यांचा वापर करू लागल्या. त्यांनी पुढे भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला. आजघडीला राहीबाईंच्या आसपासच्या परिसरातील बहुतांश शेतकरी पारंपरिक देशी वाणाचे बियाणे वापरूनच शेती करतात. राहीबाई गेली २० वर्षे हे काम अविश्रांतपणे न डगमगता करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल भारतने तर घेतलीच. शिवाय सातासमुद्रापारही त्यांच्या या पारंपरिक शेतीची चर्चा आहे. दरम्यान, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी एका कार्यक्रमात राहीबाईंना 'मदर ऑफ सीड' अर्थात 'बीजमाता' ही उपमा दिली होती. राहीबाईंना मिळालेले 'बायफ' या संस्थेचे मार्गदर्शन व सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून राहीबाईंनी या गावरान बियाणांचा प्रसार-प्रचार केला.
पुढे त्यांच्या या कार्याला एक निश्चित दिशा मिळाली. त्यांनी गावरान बियाणांची एक आगळीवेगळी बँकच सुरू केली. गावरान बियाणांचा मोठा संग्रह करून त्यांनी 'सीड बँक' सुरू केली. त्यांच्या या बँकेत पांढरे वांगे, हिरवे वांगे, पांढरा तूर, टोमॅटो, घेवडा, वाल, उडीद, हरभरा हुलगा, बाजरी, गहू, नागली, तीळ, भुईमुग, सूर्यफुल, जवस, भात, राळा, नाचणी, रायभात, अशा प्रकारच्या रानभाज्या आणि अनेक प्रकारच्या पिकांच्या वाणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या घराभोवती तीन एकर परिसरात विविध प्रकारची ४००-५०० झाडे आहेत. त्यांचे घर म्हणजे जणू एक प्रकारचे संशोधनाचे केंद्र बनले आहे. या २० वर्षांमध्ये त्यांना प्रत्येक बियाणाची माहिती अगदी तोंडपाठ आहे. पारंपरिक गावरान वाणांची बियाणे बँक 'बायफ' या सेवाभावी संस्थेच्या मदतीने सुरू केलेल्या या बँकेमार्फत आतापर्यंत हजारो गरजू शेतकऱ्यांना गावरान देशी वाणांचा पुरवठा केलेला आहे. त्यांच्याकडे सुमारे ५३ पिकांचे ११४ गावरान वाण शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करण्यात आलेले आहेत. त्यांच्या या अमूल्य कामगिरीने प्रभावित होऊन कृषी विभागाने आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानितही केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. २०१८मध्ये त्यांचा समावेश 'बीबीसी'च्या शंभर प्रभावशाली महिलांमध्ये समावेही करण्यात आला आहे. पुढे २०१९ मध्ये 'नारीशक्ती' पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर आता २०२० मध्ये भारत सरकारने देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल त्यांना 'पद्मश्री' जाहीर केला आहे. उत्तरोत्तर त्यांच्या कामाचा विस्तार होवो आणि त्यांचे हे कार्य अधिकाधिक समृद्ध होवो यासाठी शुभेच्छा...!
Nameplate of Param Vir Chakra winner Sardar Joginder Singh Marg reinstalled within 48 hours..