ईशान्य भारताला तोडण्याचे प्रयत्न हाणून पाडा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020   
Total Views |
SHARJEEL_1  H x


शाहीनबाग येथील नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असणार्‍या आंदोलनाचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ नुकताच समोर आला. या व्हिडिओमध्ये जेएनयुचा माजी विद्यार्थी शरजील इमाम हा आसामला भारतापासून वेगळे करण्याच्या घोषणा देताना दिसला.शरजील इमामच्या या व्हिडिओमुळे ईशान्य भारत आणि आसाम मिटविण्याच्या घृणास्पद योजनेला भारताच्या नकाशावरून उघडकीस आणले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओची गंभीर दखल घेत सरकारने शरजीलच्या मुसक्याही आवळल्या आहेत. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

शरजील इमाम त्याच्या व्हायरल व्हिडिओत म्हणतो की, “जर आपण लोकांना संघटित केले, तर आपण भारतला आसामपासून कायमचे वेगळे करू शकतो. कायमस्वरुपी नसल्यास आपण आसामला एक-दोन महिने तरी भारतापासून विभक्त करू शकता. रेल्वेरुळांवर इतका ढिगारा ठेवा की, त्याला हटवण्यासाठी एक महिना लागेल. आसामला वेगळ करण्याची जबाबदारी आपली आहे.”


याच प्रक्षोभक व्हिडिओमध्ये पुढे शरजील म्हणतो की, “भारत आणि आसाम वेगळे झाले, तरच ते आपले म्हणणे ऐकतील. आसाममध्ये मुस्लीम कसे राहतात, हे तुम्हाला माहिती आहे. ‘एनआरसी’ तेथे लागू आहे. मुस्लिमांना नजरकैदेत ठेवले जात आहे. सहा-आठ महिन्यांमध्ये हे समजले की, तिथे सर्व बंगाली मारले गेले आहेत. जर आपल्याला आसामला मदत करायची असेल, तर आसामकडे जाणारे रस्ते बंद करावे लागतील.”


देशद्रोही शरजीलला अटक

दिल्लीतील शाहीनबागच्या निषेधाचा मुख्य संयोजक शरजील इमामच्या देशद्रोही विधानाची दखल घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला बिहारमधून अटकही करण्यात आली.


“दिल्लीचे जनजीवन विस्कळीत व्हावे ही आमची इच्छा आहे. दिल्लीच नव्हे, तर देशातील प्रत्येक शहरात मुस्लीम ‘चक्काजाम’ करू शकतात. मुस्लिमांकडे तेवढी ताकद नाही का? उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ३० टक्के आहे. तुमची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे, तर या शहराचे जनजीवन सुरळीत कसे सुरू आहे? तुम्ही शहरात राहणारे आहात तर शहर बंद करा,” अशी चिथावणी देताना शरजील या व्हिडिओत दिसतो.


दिल्लीतील शाहीनबाग येथे मुस्लीम महिलांचे ‘सीएए’ विरोधी आंदोलन सुरू आहे. याच धर्तीवर मुंबईतील नागपाडा परिसरात मुस्लीम महिलांनीदेखील आंदोलनाला सुरुवात केली आहे. तसेच हा कायदा मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.


‘ऑपरेशन पिन-कोड’

१९७१ मध्ये ८०-९० लाख बांगलादेशी भारतात आले म्हणून आपले पाकिस्तानशी युद्ध झाले. केवळ ५०० घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध झाले, पण पाच ते सहा कोटी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी ज्यावेळेस ‘एनआरसी’, ‘एनपीआर’ संमत करण्यात आले, त्यावेळेस अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी निदर्शने आणि हिंसाचार सुरू केला. सध्या माध्यमांतील काही मंडळी या हिंसाचाराला अतिरंजित प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतत आहेत.


‘द पायोनियर’ दैनिकाने १५ जानेवारी २००५ रोजी बांगलादेशने भारताच्या विरोधात आखलेली अत्यंत घातक योजना उघडकीस आणली होती. बंगालच्या उत्तरेला एक निमूळता टापू आहे. (रुंदी फक्त २४ किमी) हाच भूभाग भारताला पूर्वांचलशी जोडतो. याला ‘चिकन-नेक’ असे म्हणतात. हा भाग तोडून संपूर्ण पूर्वांचलचा भारताशी संबंध तोडायचा आणि कश्मीरप्रमाणेच बिगरमुसलमान हटविण्याचा अथवा हाकलण्याचा पद्धतशीर कट आखला आहे. याला ‘ऑपरेशन पिन-कोड’ असे नाव देण्यात आले आहे.


ईशान्य भारतास जोडणारा ‘सिलीगुडी कॉरिडोर’ नावाचा जो २४ किमीचा चिंचोळा भूप्रदेश आहे, त्यावर ताबा मिळविला की आसाम देशापासून तोडणे सहज शक्य आहे. ‘चिकन नेक’ या नावाने ओळखला जाणारा हा भूप्रदेश नेपाळ आणि बांगलादेश या दरम्यान असून तो देशाच्या संरक्षणाचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा आहे. चार-पाच लाख मुस्लिमांनी त्या भागावर कब्जा घेतला की, आसाम आणि ईशान्य भारतात आपण हवे ते घडवू शकू, असे शरजील इमामने म्हटले आहे.


बांगलादेशातील पाकिस्तानचे उच्चायुक्त कार्यालय कारवायांचे केंद्र

बांगलादेशातील अत्यंत सक्रीय अशा नेटवर्कचा आधार घेऊन ‘आयएसआय’ ही संघटना भारतातील आसाम आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये हिंसाचार आणि असंतोष पसरवण्यासाठी सतत कार्यरत असते. बांगलादेशमधील ‘हरकत-उल-बिहारी इस्लाम’ (हुजी), ‘जमात-ए-इस्लामी बांगलादेशी’ या दहशतवादी संघटना आज पण कार्यरत आहेत. सौदी अरेबियासारख्या आखाती राष्ट्रांमधून या उपक्रमांना आर्थिक मदत हवालाद्वारे पुरवली जाते.


‘उल्फा आणि ‘एमयुएलटीए’ची हातमिळवणी

फुटीरतावादी चळवळींमध्ये गुंतलेले समूह आणि त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेता, या चळवळी बांगलादेश आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनांना गैरफायदा घेण्यासाठी अत्यंत योग्य असल्याचे निदर्शनास येते. या चळवळींमध्ये परकीय नागरिकांचाही समावेश आहे. ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ (उल्फा) यासारख्या संघटनांसोबतच ‘आयएसआय’ने मुस्लीम ‘युनायटेड लिबरेशन टायगर्स ऑफ आसाम’ (एमयुएलटीए) यांसारख्या स्थानिक पातळीवर उगवलेल्या इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनांशीही हातमिळवणी केली आहे. ईशान्य भारतामधील ‘आयएसआय’च्या कारवायांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. स्थानिक अतिरेकी गटांना राज्यामध्ये अंदाधुंदी, हिंसाचार माजवण्यासाठी सक्रीय प्रोत्साहन व मदत दिली जाते. वांशिक आणि धार्मिक भावना भडकावून त्या आधारे नवे वांशिक आणि धार्मिक अतिरेकी गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अतिरेकी गटांना दारुगोळा, स्फोटके आणि आधुनिक शस्त्रांचा पुरवठा केला जातो. तेलवाहिन्या, दळववळण साधने, रेल्वे, रस्ते आणि अन्य आस्थापनांना हानी पोहोचवली जाते. बांगलादेशी घुसखोरांना ‘जिहाद’च्या नावाखाली भडकावणे, खोट्या प्रचाराच्या आधारे हिंदू आणि मुस्लीम समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करणे असे सुरूच असते.


काय करावे?

ईशान्य भारतात फुटीर चळवळ कमी होत असली, तरी फुटीरांचे छोटे गट कायम आहेत व ते संधी मिळताच डोके वर काढतात. त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे, तरच या फुटीर संघटना समूळ नष्ट होतील. आता या भागात सरकारी यंत्रणा बर्‍यापैकी पोहोचल्या आहेत आणि हळूहळू या भागाचे देशाच्या अन्य भागांशी दळणवळणही वाढू लागले आहे. त्यामुळे या भागातील तरुण मंडळींना फुटीरतेच्या मागणीचे आकर्षण थोडे कमी झाले आहे. अरुणाचल, नागालँड, मिझोराम व आसाममधील अनेक तरुण-तरुणी अलीकडच्या काळात शिक्षणासाठी दिल्ली, मुंबई, पुण्यात येऊ लागले आहेत व त्यांना आपण भारतीय आहोत, याची जाणीव होऊ लागली आहे, पण तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे.


२०१४-२०१९ मध्ये ईशान्य भारतात दहशतवाद आधीच्या तुलनेत ९० टक्के कमी झाला आहे. पण, त्याला पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बांगलादेशी घुसखोरीमुळे अतिरेक्यांच्या हिंसाचारामुळे जर्जर झालेल्या या प्रदेशाच्या दुखण्याकडे गांभीर्याने पाहण्याची आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज आहे. हिंसक आंदोलने आणि निरपराध लोकांचे जीव घेणारे माथेफिरुंना कठोरपणे मोडून काढले पाहिजे. शस्त्रे खाली ठेवून जर विकासाच्या आणि प्रश्नांच्या सोडवणुकीचा विचार असेल, तर सरकार बोलणी करेल; अन्यथा निव्वळ हिंसेचा मार्ग कोणी स्वीकारत असेल, तर त्यांना कठोरपणे मोडून काढले जाईल, असा कृतिशील संदेश दिला जावा.


आसामच्या दिब्रूगढ येथे रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ला करीत बंडखोरांनी स्फोट घडवून आणले. ‘सिलिगुडी कॉरिडोर’ हा निमुळता आणि अरुंद टापू असल्यामुळे त्याला बंद करणे नक्कीच शक्य आहे. काश्मीर खोर्‍यामध्ये सैन्य ज्यावेळेला दहशतवादी विरोधी अभियान राबवते, त्यावेळेस रस्ते बंद करण्याचा काश्मिरी युवकांकडून प्रयत्न केला जातो. अनेक वेळा बायका आणि मुले यांना ‘ह्युमन शिल्ड’ म्हणून पुढे आणले जाते. नेमकेच हेच शाहीनबागमध्येही केले जात आहे. त्या भागात रस्ते आंदोलकांनी बंद केले आहेत. म्हणूनच ‘सिलिगुडी कॉरिडोर’ व अनेक शहरांना बंद करण्याच्या दिलेल्या धमकीला गंभीरपणे घेतले पाहिजे आणि आणि अशा प्रकारच्या धमक्या देणार्‍यांना आणि रस्ता बंद करणार्‍या आंदोलकांच्या विरुद्ध सक्त कारवाई करणे गरजेचे आहे.
@@AUTHORINFO_V1@@