दि. २४ मार्चपासून त्यांनी आपल्या मदतकार्यास सुरुवात केली. याकाळात त्यांनी गरजवंताना डाळ, तांदूळ यांसारख्या कोरड्या शिध्याचे वाटप केले. तसेच, ‘लॉकडाऊन’काळात बंदोबस्तावर असणार्या पोलिसांना पाणी, बिस्कीट, चहा, नाश्ता यांचे वाटप करत, त्यांनी त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ‘लॉकडाऊन’ असल्याने सगळेच बंद होते. त्यामुळे या काळात लहान मुले रस्त्यावर खेळण्याचा आनंद लुटत होती. अशा वेळी ही लहान मुले घरातच राहावी व त्यांचे मनोरंजन व्हावे, यासाठीदेखील फिरोदिया यांनी लहान मुलांना खेळणीवाटप करत आपल्यातील प्रगल्भतेचे दर्शन याकाळात घडविले. याशिवाय मास्कवाटप, परिसर निर्जंतूक करणे, जनजागृती करणे यावरदेखील त्यांचा भर होताच.
पायी चालणार्या नागरिकांच्या क्षुधातृप्तीबरोबरच त्यांचे पायी चालताना हाल होऊ नये, यासाठी त्यांना चपलांचे वाटपही त्यांनी केले. शिजवलेले अन्नवाटपाचे कार्य करत त्यांनी आपल्यातील अन्नपूर्णेचे तत्त्वदेखील अधोरेखित केले. या संपूर्ण मदतकार्यात १५ ते २० हजार नागरिकांना फिरोदिया यांच्यामार्फत मदतीचा हात देण्यात आला. याकामी त्यांना महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. फिरोदिया यांच्या मदतीचा परीघ हा सर्वसमावेशक असा होता. या काळात त्यांनी पाटा-वरवंटा बनविणारे कारागीर, कंपनीतील कामगार वर्ग, बांधकाम कार्य करणारे मजूर, बिगारी कामगार, परराज्यातील नागरिक, लहान मुले, देहविक्री करणार्या महिला अशा प्रकारे समाजातील जवळपास सर्वच क्षेत्रातील नागरिकांना मदत केली. आशा सेविकांना मदत करत त्यांनी त्या करत असलेल्या आरोग्यदायी कार्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष मदत फिरोदिया यांच्यामार्फत करण्यात आली. आपण घरात जे आणि जशा पद्धतीचे अन्न सेवन करतो, त्याच दर्जाचे अन्नवाटप व्हावे यासाठी त्यांचे पती आशिष फिरोदिया विशेष आग्रही होते. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या हाताने सुकामेवायुक्त असा शिरा बनवत त्याचे वाटप केले. परिसरातील जगताप वाडी, वडाळा गाव, प्रभूद नगर, आनंदवल्ली गाव, वडार वस्ती, मोरवाडी गाव, सोनवणे मळा, नवीन सिडको, अंबड लिंक रोड, अण्णाभाऊ साठे नगर, बजरंग वाडी, कांबळेवाडी, संजीव नगर, गरवारे पोईंट आदी भागात त्यांनी आपल्या मदतीचा झरा प्रवाही ठेवला होता. याकामी त्यांना पुत्र मिहीर फिरोदिया, कमलेश सूर्यवंशी, जयश्री पाटील, दीपाली खैरनार, सीमा सहगेल, प्राची देवकर, पूजा बागुल, अरुण बोडके आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. इतर सामाजिक संस्थांची मदत न घेता स्वयंबळावर फिरोदिया यांनी हे कार्य केले विशेष. यासाठी त्यांनी सुमारे नऊ ते सव्वा नऊ लाख रुपये पदरमोड खर्च केले.
नागरिकांना मदतीची आस असल्याने सामानवाटपाची गाडी दाखल होताच नागरिक गर्दी करत असत. त्यामुळे ही गर्दी कमी करण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचे मोठे आव्हान फिरोदिया यांना या काळात पेलावे लागले. स्थानिक नागरिकांच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने फिरोदिया यांनी या आव्हानाचा सामना केला. तसेच, या कार्यात फिरोदिया यांचा काही राजकीय स्वार्थ आहे, असा काही नागरिकांनी समज करून घेतला. निःस्वार्थ सेवा आहे हे सिद्ध होण्यासाठी फिरोदिया यांनी आपले कार्य अविरत सुरू ठेवले. पत्रकार, मनपा, पोलीस यांचे मोलाचे सहकार्य फिरोदिया यांना या कार्यात लाभले. हे सर्व घटक गरजवंताची माहिती देण्याचे काम करत असल्याने फिरोदिया यांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे सहज शक्य होत होते. या कार्यात फिरोदिया यांच्या आरोग्याची कुटुंबाला सतत चिंता सतावत होती. मात्र, अशाही परिस्थितीत कुटुंबाचे मोलाचे सहकार्य फिरोदिया यांना लाभले. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक यांचे मार्गदर्शन व सहकार्य फिरोदिया यांना लाभले.
भविष्यात जिथे समाधान असेल अशा ठिकाणी कार्य करण्याचा मनोदय फिरोदिया व्यक्त करतात. तसेच, समाजातील खर्या गरजवंतांना मदत करण्याची त्यांची मनीषा आहे. भाजप हा पक्ष गरिबांसाठी कार्यरत असून दु:खीतांचे अश्रू पुसण्याची संधी पक्षामुळे मिळत असल्याची विनम्र भावना फिरोदिया व्यक्त करतात. कुंटणखाण्यातील महिलांना मदत करण्यास फिरोदिया गेल्या असता, तेथील महिलांनी आमच्यापर्यंत मदत पूर्वीच पोहोचली असून तुम्ही अमुक एका ठिकाणी असणार्या महिलांना मदत करा. त्या मदतीपासून वंचित असल्याचे सांगितले. हा अनुभव फिरोदिया यांच्यासाठी भावस्पर्शी होता. तसेच, एका गर्भवती महिलेला आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली असता, तिला आर्थिक मदत फिरोदिया यांनी या काळात केली होती. त्यांनतर दोन महिन्यांनी ती महिला प्रसूत झाली असता, ती महिला आपल्या नवजात बाळाला फिरोदिया यांना भेटावयास घेऊन आली. बाळाचा तो पहिला स्पर्श हा मन हेलावून टाकणारा असल्याचे त्या पहिल्या स्पर्शाने आजवरच्या कार्याची पोेचपावती प्राप्त झाली, असे फिरोदिया आवर्जून नमूद करतात.