कोरोना व ‘लॉकडाऊन’च्या काळात स्थानिक रहिवासी, गरीब कुटुंबाच्या मदतीला धावून जात, ‘हाजी फकीर मोहम्मद पटेल फाऊंडेशन’च्या माध्यमातून नागरिकांसमोरचे रोजच्या जगण्याचे प्रश्न सोडविले ते भाजप नेते व नवी मुंबईतील मा. नगरसेवक मुनावर फकीर मोहम्मद पटेल यांनी. अन्नधान्याच्या वाटपापासून ते रुग्णवाहिकेपर्यंत पटेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्वोपरी साहाय्य केले. तेव्हा, कोरोनाकाळातील त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
मुनावर फकीर मोहम्मद पटेल
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी नगरसेवक
प्रभाग क्र. : ५५, खैरणे, नवी मुंबई
संपर्क क्र. : ९९२०६ ६९५५५
‘लॉकडाऊन’चा फटका सर्वच स्तरातील नागरिकांना बसला. गरीब, मजूर व रोजंदारीवर काम करणारे मजूर, छोटे-मोठे दुकानदार यांच्यासमोर रोजच्या जगण्यातील प्रश्न उभे राहिले. अशावेळी आपल्या प्रभागातील नागरिकांची कुटुंबाप्रमाणे काळजी घेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी भाजप नेते मुनावर फकीर मोहम्मद पटेल यांनी पुढाकार घेतला. यामध्ये पटेल यांना त्यांच्या पत्नी व समाजसेविका नाजिया मुनावर पटेल यांनी मोठा हातभार लावला.
नवी मुंबई परिसरात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेत, पटेल यांनी स्वखर्चाने सर्वप्रथम प्रभागातील सर्व इमारती व लहान-मोठी घरे व परिसरात निर्जंतुकीकरण करून घेण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतः या कार्यात उतरत परिसर सॅनिटाईझ करण्यास सुरुवात केली. यावेळी पटेल यांच्यासमवेत प्रत्येक कार्यकर्ता स्वतःहून या कार्यात सहभागी होत होता. स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण हे महत्त्वपूर्ण कार्य सुरू असतानाच दुसरीकडे पटेल यांच्या माध्यमातून रेशन व अन्नधान्याचे वाटप सुरू होते. ‘लॉकडाऊन’काळात पटेल यांच्या माध्यमातून तब्बल पाच हजार नागरिकांना चार ते पाच वेळा रेशनचे वाटप करण्यात आले. एवढेच नाही, तर ज्यांना अन्न शिजविणे शक्य नाही, अशा ७० ते ८० हजार लोकांना शिजविलेल्या अन्नाचे वाटप केले. रेशन किटच्या वाटपासोबतच फळांचं वाटपदेखील केले. संपूर्ण खैरणे प्रभागात ही मदत पोहाचेल, याची खबरदारी पटेल यांनी घेतली.
पटेल यांनी आपल्या संस्थेच्या व पक्षाच्या माध्यमातून २४ तास रुग्णवाहिका सेवादेखील उपलब्ध करुन दिली, जी आजतागायत सुरू आहे. प्रत्येक गरजू रुग्णाला रुग्णालयात बेड मिळेल, योग्य उपचार मिळतील याची पूर्ण खबरदारी पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आली. प्रभागातील ज्या घरात ‘कोविड’ रुग्ण आढळून येत होते, अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी रुग्णाला दवाखान्यात पोहोचविण्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक साहित्य, रेशन व भाजीपाला, औषधे घरपोच मिळतील याची व्यवस्था केली. रिक्षाचालक व परिसरातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत होते. ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटपदेखील पटेल यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणावर केले.
"माझे आजोबा, काका व वडील राजकारणात सक्रिय होते. त्यानंतर आ. गणेश नाईक साहेबांनी मला प्रभाग समिती सदस्य होण्याची संधी दिली. या पदावर पाच वर्षे काम केल्यावर त्यांनी मला खैरणे गाव जिथे नाईक साहेब स्वतः राहायला आहेत, त्या ठिकाणी मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व असायला हव, एकतरी मुस्लीम प्रतिनिधी सभागृहात त्यांचे प्रश्न मांडायला असावा, यासाठी नाईक साहेबांनी सागर नाईक यांच्याजागी मला संधी दिली. मी निवडून आलो व आजतागायत मी, माझे कर्तव्य पार पाडतो आहे."
भाजप आमदार व लोकनेते गणेश नाईक यांनी कोरोनाची आपत्ती येताच, नवी मुंबईतील सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांना २४ तास जनसेवेसाठी तत्पर राहण्याचे दिशानिर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यानुसार सर्व नगरसेवक कोरोनाकाळात मदतकार्यात आपले योगदान देत होते. ज्या अडचणी कार्यकर्ते सोडवू शकत नव्हते, अशावेळी पाठीशी खंबीरपणे उभे राहत या अडचणी नाईक यांनी सोडविल्या. सर्व तरुण कार्यकर्त्यांचे पटेल यांना मोलाचे सहकार्य लाभत होते. केवळ तरुण मुले व पुरुषच नव्हे, तर महिला कार्यकर्त्यादेखील जोमाने मदतकार्यात उतरल्या होत्या. आजपर्यंत प्रत्येक आपत्तीत व संकटकाळात पटेल यांना कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. तसेच सहकार्य या महामारीच्या काळातही मिळाले. मुनावर पटेल यांना पत्नी व इतर कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले. मात्र, मदतकार्यादरम्यान कुटुंबातील आई, भाऊ, वाहिनी, त्यांची दोन मुलं यांनादेखील कोरोनाची लागण झाली. यावर सर्व कुटुंबीयांनी यशस्वीपणे मात केली व पटेल कुटुंबीय पुन्हा मदतकार्यात उतरले.
पटेल यांचा प्रभाग मुस्लीम बहुसंख्य आहे. प्रभागात सहा ते सात हजार मुस्लीम कुटुंबीय वास्तव्यास आहेत. कोरोनाकाळातच रमजानचा महिना होता. अनेकांचे रोजाचे उपवास सुरू होते. त्यामुळे या काळात खजूर, फळवाटप हे कार्य पटेल यांच्या वडिलांच्या नावाने सुरू असणार्या ‘हाजी फकीर मोहम्मद पटेल फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी तसेच पनीर बिर्याणी, गुलाबजामून या पदार्थांचे महिनाभर गरजूंना घरपोच वाटप करण्यात आले. या कार्यात पटेल यांना अंदाजे २५ ते ३० हजार रुपये खर्च येत होता. हे सर्व काम करत असताना अनेक अडचणींचाही त्यांना सामना करावा लागला. काही अडचणी इतर व्यक्ती किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निर्माण केल्या जात होत्या. अनेक वेळा पोलिसांना चुकीची माहिती दिली जात होती. मात्र, या सर्व अडचणींवर पटेल यांनी अगदी संयमाने आणि धीराने मात केली. प्रशासकीय पातळीवर नवी मुंबई महापालिकेकडून पटेल यांना जनकार्यासाठी मोठे सहकार्य लाभले. पोलिसांकडूनही मोठे सहकार्य मिळाले. “माझा प्रभाग हे माझे कुटुंबच आहे. मला जनतेने निवडून दिले, त्यांचा कुटुंबप्रमुख बनवलं, त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं हे माझं कर्तव्यच आहे. त्यांचेही सहकार्य व मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत असते,” असे मुनावर पटेल सांगतात.
कोरोनाकाळात मदतकार्य करत असताना नागरिकांसमोर येणारे अनेक मन हेलावणारे प्रसंग पटेल यांच्या समोर येत होते. ‘हाजी फकीर मोहम्मद पटेल फाऊंडेशन’च्या माध्यमातून या काळात दफनविधी करण्याचे कामदेखील करण्यात येत होते. एक दिवस एका मुलीचा फोन आला की, तिच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आईचा दफनविधी करायला त्या मुलीकडे पैसे नव्हते. त्यावेळी पटेल यांनी रुग्णालयातील सर्व नियम पाळून त्या मुलीच्या आईचा दफनविधी केला. अनेकांना या काळात आपल्या जवळच्या व्यक्ती कोरोनामुळे गमवाव्या लागल्या. पटेल यांनीदेखील कोरोनामुळे आपल्या काकी रुखसाना पटेल यांना गमावले, असे अनेक भावनिक प्रसंग पटेल यांच्यासोबत कोरोनाकाळात घडले. या काळात समाजातील सर्व घटकांनी पक्ष, जात, धर्म हे बाजूला ठेवून गरजवंतांसाठी धावून आले पाहिजे. याबाबत नवी मुंबईमध्ये सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मदतकार्यास हातभार लावला. कोरोनाकाळातील ही एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे, असे ते अभिमानाने सांगतात.