देशासह नवी मुंबईमध्येही एप्रिल महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले. अशामध्ये अनेक प्रभागांमध्ये कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे भीतीचे वातावरण पसरले होते. लोकांमध्ये पुढे काय होणार ही भीती आणि नियमांबाबतचा संभ्रमही कायम होता. यावेळी नवी मुंबईमधील प्रभाग क्र. ८४च्या नागरिकांसाठी समाजसेवक विकास पालकर आणि माजी नगरसेविका स्नेहा पालकर हे धावून आले. त्यांच्या मदतकार्याचा घेतलेला हा आढावा...
विकास पालकर
राजकीय पक्ष : भाजप
पद : समाजसेवक
कार्यक्षेत्र : प्रभाग क्र. ८४
संपर्क क्र. : ८१०८४ ७८७६७
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश मेटाकुटीला आला होता. यावेळी महाराष्ट्राच्याही अनेक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. नवी मुंबईमधील अनेक प्रभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यावेळी जनतेला शांत करणे आणि अशा संकटसमयी नागरिकांना योग्त ती दिशा दाखवणे, हे अत्यंत महत्त्वाचे होते. नवी मुंबई महानगरपालिकेमधील प्रभाग क्रमांक ८४च्या जनतेसाठी समाजसेवक विकास पालकर आणि माजी नगरसेविका स्नेहा पालकर हे पुढे सरसावले. नेरुळ प्रभागातील नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत होती. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे एक जबाबदार समाजसेवक म्हणून विकास पालकर आणि माजी नगरसेविका स्नेहा पालकर यांनी पुढाकार घेत समाजाच्या सेवेसाठी कंबर कसली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २२ मार्च, २०२० ला संपूर्ण देशभरामध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केले. यानंतर प्रभाग ८४ मध्ये विकास पालकर आणि स्नेहा पालकर यांनी आपल्या मदतकार्याला सुरुवात केली. प्रभागाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर तेथील कुटुंबांना अन्नधान्य, तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची चणचण भासू नये, यासाठी प्रयत्न केले. शेतकरी ते ग्राहक यांच्यातील दुवा बनत त्यांनी नागरिकांसाठी भाजीपाला उपलब्ध करून दिला. यावेळी कुठेही गर्दी होऊ नये, यासाठी त्यांनी काही ठिकाणी घरपोच, तर काही ठिकाणी सोसायटीमध्ये भाजीपाला उपलब्ध करून देता येईल, अशी सोय केली. एवढेच नव्हे, प्रभागातील औषधाच्या दुकान मालकांशी संपर्क साधून औषधांची घरपोच सेवा उपलब्ध करून दिली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना किंवा इतर आजारी नागरिकांना लागणाऱ्या औषधांची सेवा घरपोच देण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना विषाणू हा श्वासावाटे पसरतो, म्हणून केंद्राने मास्क वापरणे हे अनिर्वाय केले. त्यानंतर प्रभागातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित राहावे, यासाठी मोफत मास्कवाटप करण्यात आले.
प्रभागामध्ये सुरुवातीला काही कोरोना रुग्ण आढळून येत होते. भाजप आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रभागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यानंतरही ज्या परिसरामध्ये किंवा ज्या इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले, तिथे त्यांनी संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले. त्यांच्या या सजगतेमुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसण्यास मदत झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी वेळोवेळी जंतुनाशकांची फवारणी केली जात होती. कोरोनासारख्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढणे हे अत्यंत गरजेचे होते. यामुळे आयुष मंत्रालयाने परवानगी दिलेल्या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपेथिक गोळ्यांचे वाटपदेखील करण्यात आले. पहिल्यांदा या गोळ्यांना चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर, आतापर्यंत तब्बल चार वेळा या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे हजारो कुटुंबांना याचा फायदा झाला. यानंतर माजी नगरसेविका स्नेहा पालकर यांनी प्रभागामध्ये ‘मास स्क्रीनिंग’ व्हावे, अशी मागणी नवी मुंबई महानगरपालिकेकडे केली होती. नागरिकांचे कोरोनासारख्या विषाणूपासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यांनी मागणीचा पाठपुरावादेखील केला. यानंतर अखेरीस २२ जूनला नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागामध्ये ‘मास स्क्रीनिंग’ तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यामुळे हजारो कुटुंबांचा फायदा झाला. यावेळी त्यांचे काही सहकारी आणि कार्यकर्त्यांचादेखील समावेश होता. सुरुवातीला काही कोरोना रुग्ण परिसरामध्ये आढळून येत होते. याची साखळी तोडण्यासाठी प्रभागामध्ये ‘कोविड रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट’ शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले. कोणत्याही नागरिकाला, कोरोनाची लक्षणे आढळल्यास तपासणी करून घेण्याचे आवाहन स्नेहा पालकर यांनी केले. त्यानंतर त्यांच्या या शिबिराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
"कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. या काळात लाखो लोकांना आपले रोजगार गमावण्याची वेळ आली. मजूर, कामगारांना तर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली. यावेळी त्यांच्यासोबत उभे राहणे हे गरजेचे होते. म्हणून एक समाजसेवक आणि या प्रभागाचे पालक म्हणून आम्ही दोघांनीही या कार्यात पुढाकार घेतला."
विकास पालकर आणि स्नेहा पालकर यांनी प्रभागातील कोरोना रुग्णांचीदेखील मदत केली. एखाद्या कोरोना रुग्णाला मदत लागल्यास त्याच्यासाठी रुग्णवाहिकेचा बंदोबस्त, ते बेड उपलब्ध करून देण्यापासून ते रुग्णालयातील वाढीव बिल कमी करण्यापर्यंतची सर्व मदत त्यांनी या संकटकाळात केली. एवढेच नव्हे, तर रुग्णाचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मनोबल वाढावे, यासाठी त्यांचे योग्य मार्गदर्शनही केले. विकास पालकर यांनी प्रभागामध्ये कोरोनाविषयक जनजागृती व्हावी, यासाठी नागरिकांशी संवाद साधला. स्नेहा पालकर यांनी भाजप नवी मुंबई आयोजित ‘संवाद आपुलकीचा’ या कार्यक्रमामार्फत प्रभागातील नागरिकांशी, तर डॉक्टरांशीही संवाद साधला. या कार्यक्रमामुळे कोरोनाविषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. याशिवाय कोरोनामुक्त झालेल्या योद्ध्यांना प्रोत्साहनही दिले.
‘लॉकडाऊन’मुळे रोजंदारीवर पोट असणाऱ्या कामगारांचे चांगलेच हाल झाले होते. कामच बंद झाल्याने काहींचे अन्नधान्यदेखील बंद झाले होते. यावेळी प्रभागामधील गरजू कुटुंबांची एक यादी बनवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मोफत धान्यवाटप, तसेच इतर गरजेच्या गोष्टींची पूर्तता केली. राज्यामध्ये ‘अनलॉक’ला सुरुवात झाल्यानंतर काही उद्योगधंदे हळूहळू पूर्ववत होऊ लागले. मात्र, ‘लॉकडाऊन’मध्ये पथविक्रेत्यांवर चांगलाच परिणाम झाला होता. त्यांची गाडी रुळांवर आणण्यासाठी स्नेहा पालकर यांनी पुढाकार घेतला. पथविक्रेत्यांमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजने’ची जनजागृती करण्यात आली. या योजनेचा अनेक पथविक्रेत्यांना लाभ झाला.
प्रभागातील मध्यवर्ती शांतीधाम स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार केले जात. परंतु, यामुळे आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला. नागरिकांच्या आरोग्यास कुठलीही हानी होऊ नये, यासाठी यावर तोडगा म्हणून अंत्यसंस्कार झाल्यावर महापालिकेच्या माध्यमातून स्मशानभूमीच्या आतील आणि बाहेरील परिसरामध्ये जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. याव्यतिरिक्त स्मशानभूमीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी योग्य ती साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्नेहा पालकर यांच्याकडून करण्यात आली. समजासाठी सतत झटत राहणाऱ्या समाजसेवक विकास पालकर आणि माजी नगरसेविका स्नेहा पालकर यांच्या कार्याकडे पाहून ‘सेवा परमो धर्मः’ याची प्रचिती येते.