२०२१-२२ च्या अर्थसंकल्पात आहे 'एवढ्या' कोटी रुपयांची तरतूद
मुंबई: महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाची घोषणा यांनी या हिवाळी अधिवेशना दरम्यान झाली होती. आता या कामाला गती मिळाली असून प्रकल्पाची स्वरूप निश्चिती, प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे, या कामांचा तपशील निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या समितीमध्ये वित्त विभागाचे प्रधान सचिव, पुरातत्व विभागाचे संचालक, सर ज.जी कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पर्यटन आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव विशेष निमंत्रित असतील. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव हे या समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धनाचे प्रस्ताव शासनासमोर सादर करतील.
प्राचीन मंदिरांचा वैभवशाली वारसा हा महाराष्ट्राच्या सामाजिक, आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या लेण्या आणि शिल्पे हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या सर्व वैभवाचे जतन आणि संवर्धन करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून द्यायला हवा. प्राचीन मंदिरे, लेण्या आणि शिल्पांचा जीर्णोद्धार आणि संवर्धनाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास सोपवण्यात आले असून यासाठी महामंडळास स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.