धुळे : धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदार संघाच्या निवडणूक पार पडल्या. यानिवडणुकांमध्ये भाजपने महाविकास आघाडीला धूळ चारत दणदणीत विजय प्राप्त केला. यापार्श्वभूमीवर प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत सूचक विधान केले आहे.महाविकास आघाडीचे हे सरकार शरद पवार यांनी आणलं आहे. जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी त्यांची इच्छा नसेल तेव्हा सरकार कोसळेल, असा दावा अनिल गोटे यांनी केला आहे.
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर अनिल गोटे यांनी नाराजी व्यक्त केली. हा निकाल आपल्याला अपेक्षित होता. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फुटली याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी या निवडणुकीत ३३२ तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना ९८ मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी २३४ मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी २००९, २०१५ आणि आता २०२०मध्ये विजय मिळवला.
विधान परिषद निवडणुकीतील निकालांचा महाविकास आघाडीच्या भवितव्यावर परिणाम होणार का, असे विचारले असता अनिल गोटे म्हणाले की, भाजपाचे नेते पहिल्या दिवसापासून हे सरकार पडेल म्हणून सांगत आहेत. मात्र असं सांगता सांगता एक वर्ष निघून गेलं. अशीच चार वर्षे जातील. सत्तेच्या सिमेंटने पक्ष एकत्र झालेले असतात, असे सरकार पडत नाही, असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या सरकारला तीन पक्षांचं सरकार काय म्हणता. केंद्रात अटलबिहार वाजपेयींचं २३ पक्षांचं सरकार होतं, पण ते पडलं नाही. मग हे तीन पक्षांचं सरकार का पडणार. भाजपाचे नेते काहीही म्हणतील. मी भाजपात राहिलोय. संघ, जनसंघ, भाजपा सर्व पाहिलंय. हे सरकार शरदचंद्र पवार यांनी आणलं आहे. जोपर्यंत त्यांची इच्छा आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी त्यांची इच्छा नसेल तेव्हा हे सरकार कोसळेल, असे विधान त्यांनी केले.