मुंबई : कोरोनामुळे यंदाच्या वर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता अनेकांनी घरीच थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करायचे ठरवले आहे. मात्र, आता या पार्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही, यावर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. यावेळी विशेषत: गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून ही नजर ठेवली जाणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे ३१ हजार पोलीस हे रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातूनही सगळ्यांवर पहारा ठेवला जाणार आहे.
३१ डिसेंबर म्हटलं की मुंबईतील पब, बार आणि रेस्टॉरंटसमध्ये उत्सवाचे वातावरण असते. मात्र, यंदा नाईट कर्फ्यूमुळे या पार्ट्या अकराच्या आतच आटपाव्या लागणार आहेत. रात्री अकरानंतर पब्ज आणि डिस्को बंद असतील. मुंबईत रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत जमावबंदीचे नियम लागू आहेत. त्यामुळे गेट वे, मरीन ड्राईव्ह, गिरगाव, दादर, जुहू चौपाटी येथे तुम्हाला संध्याकाळपासून जाता येईल. मात्र, चारपेक्षा कमी लोक असणे ही मुख्य अट आहे. राज्यात २२ डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण यूरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.