नोकरी नाकारलेला तरुण बनला ब्रॅण्ड डिझाईन कंपनीचा मालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2020   
Total Views |

Anghya_1  H x W
 
"तुमच्याकडे डिझाईनरची डिग्री नाही, त्यामुळे तुम्हाला आम्ही येथून पुढे नोकरीवर ठेवू शकत नाही.” पुण्याच्या एका जाहिरात एजन्सीच्या संचालकाने सुजीतला दिलेले हे उत्तर सुजीतच्या जिव्हारी लागलं. सुजीत कोणत्याही डिझाईनरपेक्षा कमी हुशार नव्हता. किंबहुना, त्याच्यातील डिझाईनचं टॅलेंट पाहूनच मुंबईच्या एका मोठ्या कंपनीने त्याला डिझाईनर म्हणून काम दिलेलं. पुण्यातला अनुभव मात्र वेगळा निघाला. इथे अंगभूत कौशल्यापेक्षा कागदावरच्या डिग्रीला महत्त्व होतं. हा नकार सुजीतने सकारात्मक पद्धतीने घेतला. एक दिवस स्वत:ची ब्रॅण्ड डिझाईनर कंपनी सुरू करेन, असा मनाशी निश्चय केला. काही कालावधीनंतर याच सुजीतने ‘इट क्रिएटिव्हज ब्रॅण्ड डिझाईन’ नावाची कंपनी सुरू केली, तीसुद्धा पुण्यात. एक कागदी प्रमाणपत्र सुजीतच्या अंगभूत कौशल्याला थोपवू शकलं नाही. हा सुजीत म्हणजे सुजीत किर्दकुडे होय.
सुजीतचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातलं बिचुद. त्याच्या बाबांचं, रामचंद्र कृष्णा किर्दकुडे यांचं बिचुद जवळच्या भवानीनगरमध्ये टेलरिंगचं दुकान होतं. आर.के. टेलर या नावाने त्या भागात ते प्रसिद्ध होतं. सुजीतचे आजी-आजोबा, आई छाया, भाऊ अजित आणि सुजीत गुण्यागोविंदानं राहत होते. मात्र, नियतीचे फासे असे पडतात की, होत्याचं नव्हतं घडतं. सुजीत अवघा आठ वर्षांचा असताना त्याचे आजोबा आणि बाबा यांचं देहावसान झालं. किर्दकुडे कुटुंबाचं जणू आभाळच हरवलं. पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला. सुजीतची आई इतरांच्या शेतात शेतमजूर म्हणून रोजगार करू लागली. आईच्या कमाईमध्ये दोन वेळची भाकर आणि दोन पोरांचं शिक्षण शक्यच नव्हतं. अजितने आपलं शिक्षण थांबविलं. कारण तो शिकला असता तर सुजीतचं शिक्षण शक्य झालं नसतं. सुजीत शिकू लागला.
भवानीनगरच्या क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालयात तो सातवीपर्यंत शिकला. पुढील शिक्षणासाठी तो कासेगावच्या सर्वोदय वसतिगृहामध्ये राहू लागला. राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील आझाद विद्यालयात तो दहावीपर्यंत शिकला. आपली आई, भाऊ आपल्या शिक्षणासाठी राबराब राबतात, हे सुजीत पाहत होता. आपल्या घराला हातभार म्हणून तोसुद्धा शिक्षण घेत काम करू लागला. कधी शेतमजूर म्हणून जा, तर कधी बांधकामाच्या कामावर मजूर म्हणून जा, अशी त्याची कामं चालूच होती. ३० रुपये त्याला मजुरी मिळायची. कासेगावच्या वसतिगृहाचं हेच वैशिष्ट्य आहे. येथील जवळपास सगळेच विद्यार्थी काबाडकष्ट करून मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते, शासकीय अधिकारी, वकील, डॉक्टर, शिक्षक यांना त्यांच्या विद्यार्थीदशेत या कासेगावच्या वसतिगृहानेच आधार दिलेला आहे. दहावी झाल्यानंतर सुजीत महाविद्यालयीन शिक्षणासाठी बत्तीस शिराळ्यात आला. नागपंचमीच्या यात्रेसाठी जगभरात या गावाची ख्याती आहे. या गावातील वसंतराव नाईक महाविद्यालयात सुजीतने कला शाखेत प्रवेश घेतला. तिथल्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात तो राहू लागला. लेक्चर्स झाले की, सांगलीच्या फिनाईल कंपनीची तो सायकलवरून मार्केटिंग करायचा. दिवसभर सायकलवरून सांगलीचा रस्ता पायदळी तुडवलाय या पठ्ठ्यानं. पायाचे अक्षरश: लचके पडण्याची वेळ यायची. पण, काम केलं नाही तर पैसे कोण देणार होतं...? शिक्षण पूर्ण कसं करणार...? या सगळ्याची त्याला चिंता होती. काम करता करता सुजीत बी.ए. झाला. अर्थशास्त्र विषयात त्याने कलाशाखेची पदवी संपादन केली. आर्थिक प्रतिकूलता अनुभवणारा सुजीत अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवतो ही नियतीची कमालच म्हणायची.
मुंबई कुणालाही निराश करत नाही, असं म्हणतात. या मायानगरीत आपल्याला नोकरी मिळेल, या आशेने सुजीत मुंबईला आला. एका कंपनीत मुलाखत होती. मुलाखतीसाठी बायोडाटाची प्रिंट लागते हे त्याला माहीत नव्हतं. हाताने लिहिलेला बायोडाटा त्याच्या हातात होता. कोणीतरी त्याला सांगितलं कीजवळच झेरॉक्सचं दुकान आहे तिथे प्रिंट काढून मिळेल. सुजीत दुकानात गेला. पण, नेमका त्याच दिवशी तो ऑपरेटर आला नव्हता. सुजीतने दुकानदाराला विनंती केली की, मी माझा बायोडाटा टाईप करून घेतो. दुकानदाराने परवानगी दिली. सुजीतचा टायपिंग स्पीड पाहून दुकानदाराने त्याला थेट नोकरी देऊ केली. मुंबईमध्ये इतक्या झटपट नोकरी मिळत नाही, हे मित्राकडून त्याने ऐकलेलं. त्याने ती नोकरी स्वीकारली. ८०० रुपये पगार निश्चित झाला. तिथेच तो डिझायनिंगची कामं पण करू लागला. हळूहळू तो ग्राफिक डिझायनिंगची कामे करू लागला. त्याच्या कौशल्यापोटी मालाडमधील एका फॅशन डिझाईन स्टुडिओमध्ये त्याला ग्राफिक डिझाईनरची नोकरी मिळाली. काही काळ काम केल्यानंतर त्याला एका प्रसिद्ध ब्रॅण्ड डिझाईन कंपनीत नोकरी मिळाली. दरम्यान, त्याच्या राहण्याचा प्रश्न होताच. तो कंपनीच्या गोदामात राहायचा. आपल्यामुळे आपला मोठा भाऊ शिक्षणापासून वंचित राहिला. ही सल सुजीतला होती. अजितची दहावी झाली होती. अजितने इंटिरिअर डिझाईनरचा अभ्यास करावा, यासाठी सुजीतने त्याला गळ घातली. अजित इंटिरिअर डिझाईनर झाला. दोघा भावांनी पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुजीत पुण्यात आल्यानंतर काही छोट्या-मोठ्या कंपनीत त्याने डिझायनिंगची कामे केली. एका कंपनीत निव्वळ डिग्री नाही म्हणून त्याला नाकारले गेले. ही बाब सुजीतच्या जिव्हारी लागली. एक दिवस आपण आपलं कौशल्य निश्चित सिद्ध करू हे त्याने मनोमन ठरवलं होतं. एक जुना लॅपटॉप घेऊन २०१७ साली त्याने कंपनीची सुरुवात केली. कंपनीचं नाव ठरलं, ‘इट क्रिएटिव्ह ब्रॅण्ड डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट!’
‘डिझाईन इझ फूड’ असं बोधवाक्य असलेली ही कंपनी जाहिरात क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. ब्रॅण्डला नाव देण्यापासून ब्रॅण्ड आयडेंटिटी, कॉर्पोरेट प्रोफाईल, प्रॉडक्ट डिझाईन, प्रॉडक्ट पॅकेजिंग, प्रॉडक्ट फोटोग्राफी, इंडस्ट्रियल फोटोग्राफी, ब्रॅण्ड लँग्वेज, ब्रॅण्ड गाईडलाईन बुक, स्टोअर ब्रॅण्डिंग, ऑफिस ब्रॅण्डिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट आणि इव्हेंट एक्झिबिशन पर्यंत सर्व प्रकारच्या क्रिएटिव्ह सेवा ही कंपनी पुरवते. कोहलर इंडिया, फिनोलेक्स, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रीमियर कारसारख्या कॉर्पोरेट कंपन्यांनी खास त्यांच्या उत्पादनाच्या प्रॉडक्ट फोटोग्राफीसाठी ‘इट क्रिएटिव्ह’ला पाचारण केले होते. पुणे, दिल्ली, मुंबई, झारखंड, छत्तीसगढ, नागालँड (कोहिमा), बंगळुरू, बेळगाव, नाशिक, सांगली, इस्लामपूर असा भारतभर कंपनीचा ग्राहकवर्ग आहे. नागालँड शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ अंडरडेव्हलपमेंट एरिया अर्थात विकसनशील परिसर विभागासोबत काम करणे, हे कंपनीचे मोठे यश आहे. यामध्ये रिचर्ड बेलो यांनी खूप मोठे सहकार्य केले. नागालँड राज्यातील जमाती आणि तेथील संस्कृतीचा पूर्ण अभ्यास करून तयार केलेल्या ‘अन्घ्या’ (Anghya) या ब्रॅण्डचे नागालँड सचिवालयाच्या प्रांगणात २०१९ च्या प्रजासत्ताकदिनी राज्यपाल पी. बी. आचार्य आणि मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्या हस्ते अनावरण झाले. हा ब्रॅण्ड ग्रामीण भागातील लोकांच्या प्रगतीसाठी बनवला आहे. सेंद्रिय आणि औषधी उत्पादनांना जगभर घेऊन जाणे, हा नागालँड शासनाचा उद्देश आहे. ‘इट क्रिएटिव्हज’ने या ब्रॅण्डसाठी स्ट्रॅटेजी, स्टोरी डिझाईन, ब्रॅण्ड स्टडी, ब्रॅण्ड आयडेंटिटी, ब्रॅण्ड लँग्वेज, प्रॉडक्ट फोटोग्राफी, प्रॉडक्ट पॅकेजिंग, अ‍ॅपरेल डिझाईन, ब्रॅण्डिंग, ब्रॅण्ड लॉन्च इव्हेंट आदी सेवा पुरविल्या. कोहलर इंडिया, फिनोलेक्स, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रीमियर कार या अशा नामांकित कॉर्पोरेट आणि शासकीय संस्थेसह ५० हून अधिक कंपन्याना ब्रॅण्ड डिझाईनच्या सेवा ‘इट क्रिएटिव्हज’ने दिलेल्या आहेत. आता जगात आपल्या ब्रॅण्ड डिझाईनचा ठसा उमटविण्यास कंपनी सिद्ध झालेली आहे. स्टार्ट-अप्स, लघु-मध्यम उद्योजकांना त्यांचा ब्रॅण्ड शून्यातून प्रस्थापित करण्यासाठी मदत करणे, हा कंपनीचा हेतू आहे.
“‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ अर्थात ‘डिक्की’ या संस्थेचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांचा आपल्या व्यावसायिक जडणघडणीत मोलाचा वाटा आहे,” असे सुजीत किर्दकुडे प्रांजळपणे नमूद करतात. “त्यांच्यामुळे आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या,” असे त्यांचं मत आहे. २०१२ साली सुजीत यांचा रोशना या सुविद्य तरुणीसोबत विवाह झाला. त्या पुण्यातील इस्पितळात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्यास वरद नावाचा गोंडस मुलगा आहे. कालांतराने सुजीत यांनी निवेदिता कांबळे आणि नितीन संतोश्वर या उद्योजक मित्रांसोबत एकत्र येऊन नवीन व्यवसायाची उभारणी केली. ‘बिझबर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ असं या संस्थेचे नामकरण केले. या संस्थेअंतर्गत कंपनीच्या नोंदणीपासून ते ब्रॅण्डिंग आणि जाहिरातीपासून ते मार्केटिंगपर्यंत सर्व काही सुविधा पुरवल्या जातात. नव उद्योजकांसाठी ही संस्था सर्वार्थाने साहाय्यभूत ठरत आहे. ही संस्था निव्वळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा या तिघांचा मानस आहे. आपलं अंगभूत कौशल्य हे कागदी प्रमाणपत्रापेक्षा खूप महत्त्वाचं आहे. किंबहुना, तेच तुम्हाला जगावेगळं बनवू शकतं. सुजीत किर्दकुडे यांचा ग्राफिक डिझाईनर ते ब्रॅण्ड डिझाईन कंपनीचा मालक व्हाया क्रिएटिव्हज डायरेक्टर हा प्रवास नेमकं हेच अधोरेखित करतो.
@@AUTHORINFO_V1@@