‘क्वॉड’ गटातील देश सेमी कंडक्टर चीपचे उत्पादन करून सप्लाय चेन मजबूत करण्यात अनेक कारके महत्त्वाची आहेत. जसे की, जवळपास सर्वच तंत्रज्ञानाधारित क्षेत्रामध्ये सेमी कंडक्टर उद्योग महत्त्वाची भूमिका निभावतो. सेमी कंडक्टर जगातील सर्वाधिक उच्च मूल्याच्या सप्लाय चेनपैकी एक आहे व कोणताही देश यात संपूर्णपणे स्वावलंबी होऊ शकत नाही.
शांतताविषयक मुद्दा असो वा चीनला हिंदी-प्रशांत क्षेत्रात रोखण्याचा मुद्दा असो, ‘क्वॉड’ गटाने जगाच्या भूराजकीय अवकाशात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसते. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या जगातील चार महत्त्वाच्या देशांचा ‘क्वॉड’-राजकीय मंच आता तर लष्करी सहकार्यापर्यंतही पोहोचला आहे. तथापि, सप्लाय चेनमध्ये सुधारणा घडवून त्याचे केंद्र आपल्याकडे खेचून घेण्यातही ‘क्वॉड’ संघटनेची मुख्य भूमिका आहे. त्यातही सेमी कंडक्टर चीप निर्मितीच्या क्षेत्रात तर ‘क्वॉड’ गटातील चारही देश एकत्रितपणे जगाचे ऊर्जाकेंद्र होऊ शकतात, इतकी त्यांची क्षमता आणि शक्ती आहे. ‘क्वॉड’ गटातील देशात असलेली विपुल नैसर्गिक व खनिजसंपत्ती पाहता ती सेमी कंडक्टर चीपच्या उत्पादनासाठी अतिशय अनुकूल आहे. परिणामी, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया ‘क्वॉड’ गटाचा राजकीय-लष्करी सहकार्याच्या पलीकडे विस्तार करून अधिक उपयुक्त वापर करू शकतात. विशेष म्हणजे, ‘क्वॉड’ गटांच्या एकत्रित सहयोगाने केवळ सेमी कंडक्टरच्या सप्लाय चेनलाच जीवदान मिळणार नाही, तर चीनवरील अवलंबित्वदेखील कित्येक पटींनी कमी होईल. ‘क्वॉड’ गटातील देश सेमी कंडक्टर चीपचे उत्पादन करून सप्लाय चेन मजबूत करण्यात अनेक कारके महत्त्वाची आहेत. जसे की, जवळपास सर्वच तंत्रज्ञानाधारित क्षेत्रामध्ये सेमी कंडक्टर उद्योग महत्त्वाची भूमिका निभावतो. सेमी कंडक्टर जगातील सर्वाधिक उच्च मूल्याच्या सप्लाय चेनपैकी एक आहे व कोणताही देश यात संपूर्णपणे स्वावलंबी होऊ शकत नाही. तसेच ‘क्वॉड’ देश सेमी कंडक्टरच्या बळकट सप्लाय चेनसाठी आवश्यक घटकांमध्ये पूरक आहेत.
अमेरिकेला उच्च गुणवत्तेच्या चीप डिझाईनसाठी ओळखले जाते. जगातील अव्वल दहा फॅबलेस चीप निर्मात्यांपैकी चार निर्माते अमेरिकन आहेत. याव्यतिरिक्त चीप डिझायनिंगसाठी ‘इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन’ (ईडीए) टुल्सची आवश्यकता असते आणि उच्च दर्जाच्या रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटच्या गरजेमुळे ते एकाच ठिकाणी केंद्रित असते, म्हणूनच तीन प्रमुख ‘ईडीए’ कंपन्या अमेरिकेत स्थित आहेत. अशा परिस्थितीत ‘क्वॉड’ गटातील अमेरिका चीप डिझाईन क्षेत्रात मुख्य भूमिका बजावू शकते. तर जपान सेमी कंडक्टर उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. सेमी कंडक्टर चीप तयार करण्यासाठी उच्चस्तरीय कौशल्य, प्रावीण्य आणि भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता असते. जपानी कंपन्या ‘क्वॉड’ सप्लाय चेनच्या या आवश्यकतांची पूर्तता करू शकतात. जपानी कंपन्या उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांना सध्यातरी पर्याय नाही. भारत आपल्या ग्राहकशक्ती आणि कुशल मनुष्यबळासाठी ओळखला जातो. तथापि, सध्या चीप डिझाईनमधील प्रमुख जागतिक केंद्रांपैकी एक म्हणून भारत तयार होत आहे. भारतात सध्या प्रतिवर्षी सरासरी तीन हजार चीप डिझाईन केल्या जातात. बहुतांश अव्वल विदेशी सेमी कंडक्टर उत्पादक कंपन्यांनी भारतातील प्रतिभाशक्तीच्या उपलब्धतेमुळे आपल्या ‘डिझाईन आणि रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट केंद्रा’ची इथे स्थापना केलेली आहे. भारताने ‘इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड प्रॉडक्ट असेम्ब्ली’ क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. यामुळेच ‘फॉक्सकॉन’ने नुकतीच भारतात गुंतवणुकीची घोषणा केली होती, तर ‘सॅमसंग’ने यंदाच नोएडामध्ये जगातील सर्वात मोठे मोबाईलनिर्मिती केंद्र स्थापन केले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये सेमी कंडक्टर सध्यातरी महत्त्वाचा उद्योग नाही. पण, भविष्यातील उच्च-तंत्रज्ञानाधारित इलेक्ट्रॉनिक उद्योगात तो देशही महत्त्वाची भूमिका निभावेल, असे वाटते. कारण ऑस्ट्रेलिया आज जगातील लिथियमचा सर्वात मोठा उत्पादक असून, त्याचा वापर इलेक्ट्रिक वाहने, फोन आणि लॅपटॉपमधील रिचार्जेबल बॅटरीत होतो किंवा लिथियम बॅटरीतले सर्वात महत्त्वाचे तत्त्व आहे. मात्र, ‘क्वॉड’ गटातील कोणताही देश सध्या तरी सेमी कंडक्टरची एकट्याने संपूर्ण सप्लाय चेन विकसित करू शकत नाही. पण, एकत्रितपणे जगाचे ऊर्जाकेंद्र मात्र नक्कीच होऊ शकते. ‘क्वॉड’ची क्षमता पाहता, ही सप्लाय चेन सुरू होण्यासाठी व्यापारी-व्यावसायिक मुद्द्यांवर करार होण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर ‘क्वॉड’ गटातील देश संपूर्णपणे सेमी कंडक्टर निर्मितीक्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करू शकतात. भारताने यासाठी चर्चेच्या माध्यमातून नक्कीच पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून त्यासंबंधी धोरणांवर काम सुरू होऊ शकेल. उल्लेखनीय म्हणजे ते केवळ ‘क्वॉड’साठीच नव्हे, तर संपूर्ण लोकशाही जगासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.