महाराष्ट्राची ओळख ही सह्याद्रीच्या पर्वत रांगांमुळेही आहे. सह्याद्रीच्या उंच शिखरांवर भ्रमंती करण्याची, त्याच्या कड्याकपारीत हिंडण्याची हौस अनेकांना असते. त्यामुळे तरुण, विद्यार्थी, काही वेळा ज्येष्ठ नागरिकही गिर्यारोहणाचा छंद जोपासताना दिसून येतात. मात्र, गिर्यारोहण क्षेत्राबाबत असणारी कमी माहिती, अपुरे ज्ञान, शास्त्रीय पद्धतीसंबंधीच्या तंत्रांची असलेली कमी माहिती यामुळे अनेकदा गिर्यारोहक किंवा हौशी गिर्यारोहक हे अडचणीत येताना दिसून येते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत गिर्यारोहण आणि त्याच्या संलग्न साहसी प्रकारांमध्ये असलेली प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन यासंबंधित अभ्यासक्रमाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे. ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊटेंरिंग’ (जेजीआयएम) या संस्थेच्या मदतीने हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. गिर्यारोहणात अभ्यासपूर्ण योगदान देण्यासाठी, तसेच या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, यासाठी गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्यामार्फत अभ्यासक्रमाचे संचालन करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, यांच्यासाठी मुख्यत्वे हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. गिर्यारोहण व इतर साहसी क्षेत्रातील अभ्यासक्रम हे लवकरच विद्यापीठामार्फत सुरू करण्यात येणार असून, यामुळे साहसी क्षेत्रात एका तंत्रशुद्ध अभ्यासक्रमास सुरुवात होण्यास प्रारंभ होणार आहे. याचबरोबर महराष्ट्रातील वनविभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठीही या माध्यमातून अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. विद्यापीठामार्फत अशाप्रकारे साहसी खेळांना उत्तेजन देण्याकामी घेण्यात आलेला पुढाकार हा निश्चितच स्वागतार्ह असाच आहे, तसेच साहसी खेळ आणि साहसी खेळ प्रशिक्षण या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या अनेकांसाठी हा अभ्यासक्रम नक्कीच वरदान ठरणारा आहे. गिर्यारोहणाची आवड असणारे आणि त्याबाबत कुतूहल असणारे अनेक नागरिक आपणास पाहावयास मिळत असतात. मात्र, बहुतांश हौशी गिर्यारोहक हे केवळ अनुभव ऐकून किंवा अनुभवून गिर्यारोहण करताना दिसतात. अशावेळी शास्त्रीय पद्धतीने प्राप्त होणारे हे प्रशिक्षण नक्कीच वरदान ठरणारे असणार आहे.
कार्यक्षेत्रासाठी अनुकूल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे नाशिक, अहमदनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांत आहे. या तिन्ही जिल्ह्यांचा भौगोलिक दृष्टीने विचार केल्यास नक्कीच लक्षात येते की, या भागात सह्याद्रीची रांग विस्तारलेली दिसून येते. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तर सह्याद्री पर्वताचे सर्वात उंच शिखर कळसूबाई हेदेखील विराजमान आहे. हरिश्चंद्र गडसारखे चढाई करण्यास अवघड असणारे दुर्गदेखील येथेच आपणास पाहावयास मिळतात. त्यामुळे साहजिकच विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या भागात पर्यटक आणि गिर्यारोहक यांचे दाखल होण्याचे प्रमाण हे जास्तच असणार. अशावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा निर्णय कार्यक्षेत्रासाठी नक्कीच अनुकूल असाच आहे. गिर्यारोहणाची हौस अनेकांना असते. अनेक जण प्रशिक्षणाअभावी गिर्यारोहणाचे धाडस करतात; परंतु अशा वेळी अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे अशांसाठीही हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. साहसी क्रीडा प्रकार, तसेच गिर्यारोहणाकडे वळणार्यांना या प्रशिक्षणाचा निश्चित लाभ होणार असल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली आहे. नाशिक शहरात मध्यंतरी पांडवलेणी परिसरात गिर्यारोहणास गेलेली काही मुले परतीचा मार्ग न सापडल्याने अडकल्याची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांच्या मदतीने या अडकलेल्या मुलांना सोडविण्यात यश आले होते. मात्र, अशा घटना या नित्याच्याच आहेत. अशावेळी प्रकर्षाने जाणीव होते ती गिर्यारोहणसंबंधी असलेल्या सुयोग्य माहितीचा अभाव असल्याची. त्यामुळे विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम नक्कीच फलदायी ठरणारा असणार आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात तीर्थक्षेत्र म्हणूनदेखील अनेक पर्यटक हे येत असतात. अशावेळी गोदावरी उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरही अनेक जण जाण्यास पसंती देत असतात. त्यावेळीही हा अभ्यासक्रम शिकलेले तरुण उपलब्ध असल्यास त्यामुळे पर्यटकांना मदत होण्याची नक्कीच शक्यता आहे. तसेच, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील भौगोलिक स्थिती आणि हा अभ्यासक्रम यांची सुयोग्य सांगड घातली गेल्यास रोजगारनिर्मिती आणि व्यावसायिक वृद्धी यासदेखील फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यापीठाचा हा निर्णय राज्यातील इतर विद्यापीठांसाठीही नक्कीच पथदर्शक असा आहे.