‘अँटिफा’चा भारतातला अवतार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

antifa_1  H x W
 
 
 
 
अराजकता कधीही एखाद्या शासन प्रणालीला पर्याय होऊ शकत नाही. एखादी असंघटित व्यवस्था स्थानापन्न संघटित अव्यवस्था कधीही होऊ शकत नाही आणि जर असे झाले तर राष्ट्राचे पतन नक्कीच होणार, जे ‘अँटिफा’सारख्या विचारधारांचे लक्ष्य आहे.
 
 
 
शासकांना नागरिकांच्या सहमतीने सत्ता प्राप्त होते, अहिंसक कारवाई या सहमतीला परत घेण्याची एक प्रक्रिया आहे.

- जीन शार्प
(द पॉलिटिक्स ऑफ नॉन व्हायलंट अॅक्शन - १९७३)
 
 
 
 
अहिंसक पद्धतीने लोकशाहीतील परिवर्तनाला प्रोत्साहन देण्याची भलामण करणारे जीन शार्प यांचे वरील विधान सामान्य वाटू शकते. परंतु, या विधानाचे कितीतरी गहिरे अर्थ आहेत. जीन शार्प यांची ही संकल्पना आज काही सुधारणांसह जगभरातील घोर डाव्या आणि अराजकवाद्यांचे ध्येयवाक्य झाली आहे. तसेच जगभरात अहिंसक आंदोलनांच्या आडून सत्ताधारी सरकारांना पाडणे व व्यापक सत्तापालटासाठी केल्या जाणाऱ्या सशस्त्र संघर्षांच्या घटना आता मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.
 
 
नुकताच अमेरिकेमध्ये अशाच प्रकारच्या आंदोलनांचा प्रभाव अतिशय वेगाने वाढताना दिसला. मे २०२० मध्ये जॉर्ड फ्लॉईडच्या संशयास्पद मृत्यूला सरकारविरोधी आंदोलनातले हत्यार केले गेले आणि विवेकहीन पद्धतीने त्यातून गोरे विरुद्ध काळे या भूतकाळातील घृणास्पद भेदाला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर काहीच महिन्यांनी सप्टेंबर २०२० मधील एका घटनेने पुन्हा एकदा या आगीला जास्तच भडकाविले. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांबरोबरील चकमकीमध्ये ४८ वर्षीय मायकल फॉरेस्ट रिनोहेलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुन्हा एकदा ‘श्वेत सर्वोच्चता’ आणि ‘अत्याचारी शासनाचे उच्चाटन’ यांसारख्या वाक्प्रचारांचा जोरदार वापर सुरू झाला. या घटनेत जॉर्ज फ्लॉईडच्या प्रकरणाप्रमाणे मृताच्या संशयास्पद भूतकाळाला संपूर्णपणे दडवले गेले. निरीह रिनोहेल, ओरेगनच्या पोर्टलॅण्डमधील ट्रम्प समर्थक आरोन जे. डेनियलसच्या हत्येतील आरोपी होता. 29 ऑगस्ट रोजी परस्परविरोधी निदर्शनादरम्यान वादाचा अंत हत्येत झाला आणि या घटनाक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी आंदोलनाला सुरुवात झाली, ज्याचे नेतृत्व घोर डावी संघटना ‘अँटिफा’च्या हातात आहे. दरम्यान, ‘अँटिफा’ काही नवी संघटना नाही, तर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार झाल्यानंतर या संघटनेच्या हालचाली वेगवान झाल्या.
 
 
 
पार्श्वभूमी
 
 
 
‘अँटिफा‘ची सुरुवात इटलीमध्ये बेनिटो मुसोलिनीच्या सरकारविरोधातील संघटनेच्या रूपात सर्वप्रथम झाल्याची माहिती आहे. मरियम-वेबस्टर शब्दकोशानुसार ‘अँटिफा’ शब्दाचा पहिला ज्ञात उपयोग नाझी जर्मनीच्या काळात झाला होता आणि त्याचा सद्यःस्थितीतील आधार जर्मन अँटिफा हा आहे, जे ‘अँटिफासिस्टिस्क’ या जर्मन शब्दाचे संक्षिप्त रूप आहे. हे एक असे उग्रवादी राजकीय आंदोलन आहे, जे स्वतःला फासीवादविरोधी म्हणते आणि याचे सदस्य स्वतःला भांडवलशाहीविरोधी आणि सरकारविरोधी विचारांच्या क्रांतिकारकांच्या रूपात प्रस्तुत करतात. प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धादरम्यान फासीवादी हुकूमशहाचा विरोध करण्यासाठी संघटित युरोपीय कार्यकर्त्यांच्या समूहाच्या रूपात अस्तित्वात आलेले व युरोपातून सुरू झालेले हे आंदोलन जर्मनी आणि इटलीमध्ये नाझीवाद व फासीवादाच्या अंतानंतर समाप्त झाले नाही, तर त्याने आपल्या प्रसारासाठी नवे प्रदेश निवडले. अमेरिकेमध्ये मार्टिन ल्युथर किंग यांच्या काळ्यांच्या अधिकारांसाठी चालविल्या गेलेल्या आंदोलनांच्या समांतर १९७० आणि १९८० च्या दशकात श्वेत वर्चस्व आणि स्किनहेडचा विरोध करण्याच्या नावाखाली हे आंदोलन संपूर्ण अमेरिकेत पसरले. तथापि, त्यांचे नाव कित्येक प्रकारच्या हिंसक गतिविधी आणि सरकारविरोधी धोरणांमध्ये चर्चेत आले. परंतु, २००० सालापर्यंत हे संघटन शीतनिद्रेत गेले आणि नंतर रिपब्लिकन्सकडून डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाचे उमेदवार केले गेले, त्यावेळी हे संघटन पुन्हा सक्रिय झाले आणि सद्यःस्थितीत हे संघटन आपल्या कार्यपद्धतीवरून प्रसिद्धी माध्यमांत दिसून येत आहे.
 
 
 
‘अँटिफा’ची कार्यपद्धती
 
 
 
जर्मनी आणि इटलीमध्ये फासीवादी शासनाच्या पतनानंतर या संघटनांचे अस्तित्व आणि त्यांची कार्यप्रणाली त्यांच्या वास्तविक मनसुब्यांना प्रकट करते. ‘अँटिफा’मध्ये परस्परविरोधी भूमिका विद्यमान आहेत. ‘इतिहासकार आणि ‘अँटिफा ः द अँटिफॅसिस्ट हॅण्डबुक’चे लेखक मार्क ब्रे यांच्यानुसार ‘अँटिफा’ एक विकेंद्रीकृत-क्रांतिकारी-आत्मरक्षात्मक प्रकृतीचे सैल आंदोलन आहे. तर दुसरीकडे अमेरिकन अॅटॉर्नी जनरल विल्यम बर यांच्या म्हणण्यानुसार, ‘अँटिफा’वर सातत्याने लक्ष ठेवून असलेल्या अमेरिकन न्याय विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे, हे संघटन देशभरात झालेल्या हिंसेच्या केंद्रस्थानी काम करत आहे. जर ब्रे यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर इतक्या संघटित आणि कुशल समन्वयाने प्रत्यक्षात आणलेल्या हिंसक गतिविधी, एका कथित सैल संघटनेकडून निष्पादित केल्या जाऊ शकत नाहीत; अर्थात कोणाच्या तरी मागे लपून आपल्या कारस्थानांना वास्तवात उतरविणे डाव्या अतिरेकी संघटनांचा ऐतिहासिक वारसा आहे आणि हे आधीच्या सोव्हिएत संघ आणि आजच्या चीनमध्ये स्पष्टपणे पाहता येते. दिखाव्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना कशाप्रकारे जगभरात साम्यवादी विचारधारा पसरविण्यासाठी न केवळ प्रचारक तर हिंसक उत्पीडक कामेही करत आल्यात. ‘अॅँटिफा’ म्हणायला अनेक समान विचारधारेच्या संघटनांचे सैल संघटन आहे, परंतु, डाव्यांची ही जुनीच रणनीती राहिली की, ते आपली वास्तविक ओळख लपवून एखाद्या फ्रंट ऑर्गनायझेशनचा आधार घेतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की, कोण्या केंद्रीय संघटनेचा अभाव आहे.
 
 
 
काल आणि आज
 
 
 
दुसऱ्या महायुद्धानंतर हे संघटन लोकशाही देशांमध्ये जनतेने निवडलेल्या सरकारांना अस्थिर करणे आणि हिंसक सत्तापालटाचे जोरदार समर्थक राहिले. अमेरिकन सुरक्षा एजन्सीनुसार गेल्या काही वर्षांत ‘अँटिफा’चे सदस्य विरोधासाठी कित्येक प्रकारच्या रणनीतींचा वापर करत आहेत, जे त्यांच्याद्वारे दक्षिणपंथी मानल्या जाणाऱ्या समूहांद्वारे आयोजित कार्यक्रमांना बळाने रोखण्यापर्यंत विस्तृत आहे. या घोर डाव्या गटांद्वारे हिंसक साधनांचा वापर करणे सामान्य बाब आहे आणि अमेरिकेच्या कित्येक प्रांतांच्या पोलीस नोंदींनुसार समजते की, त्यांच्या सदस्यांसाठी मिरची स्प्रे, चाकू, विटा आणि साखळदंडासारख्या कित्येक साधनांचा वापर करणे सामान्य बाब आहे. साधनांची निवड इथेच थांबत नाही. अमेरिकन ऑनलाईनच्या एका अहवालानुसार अँटिफा फासीवादी ताकदींचा सामना करण्यासाठी हिंसक साधनांच्या वापराचा बचाव करत आली आणि याला ट्रम्प यांच्या अभूतपूर्व स्तराच्या निगराणी, अतिक्रमण, निर्वासन आणि पोलिसी बर्बरता तथा अमेरिकी जनतेविरोधातील हत्यांविरोधातील योग्य रणनीती म्हटले आहे.
 
 
 
परंतु, एका बाजूला जगातील सर्वाधिक जुन्या लोकशाही देशात जनतेच्या अधिकारांबद्दल संवेदना बाळगणारे समूह जगभरातील साम्यवादी शासनांतर्गत येणाऱ्या पूर्वाश्रमीचा सोव्हिएत संघ, चीन, पोलंड, क्युबा यासारख्या देशांत जिथे मानवाधिकाराचे हनन तर दूरची गोष्ट तसा काही अधिकारही दिला जात नाही, त्या ठिकाणी या तथाकथित रक्षकांचे अस्तित्वही दिसत नाही. रशिया आणि चीनमध्ये ‘ग्रेट पर्ज’ आणि ‘कल्चरल रिव्हॉल्युशन’सारख्या कार्यक्रमांच्या नावावर लाखो निःशस्त्र लोकांचा जीव घेतला गेला, तिथे या संघटनांचे मौन त्यांचे वास्तविक रूपच दाखविते. वास्तव हेच आहे की, फासीवादाचा विरोध करता करता ही डावी मंडळी एकप्रकारची संकरित प्रजाती झाले आहेत आणि डाव्या विचारांच्या आड एका नव्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी कामाला लागले आहेत. मात्र, ते पाहण्यासाठी केवळ स्टॅलिन आणि माओच नव्हे, तर मुसोलिनी आणि हिटलरही जीवंत असते, तर तेदेखील आश्चर्यचकित झाले असते.
 
 
 
भारतात ‘अँटिफा’!
 
 
 
गेल्या काही वर्षांपासून भारतातील काही वर्गांमध्ये एक विशेष व्याकुळता पसरत आहे. ज्याचे मुख्य कारण त्यांच्या राजकीय अवकाशाचे आकुंचन पावणे हे आहे. तसेच त्यांना याची जाणीव आहे की, भारतासारख्या लोकशाही देशात केवळ राजकीय आघाडीवर मुकाबला करणे, त्यांच्यासाठी फार चांगले परिणाम देऊ शकत नाही, अशा परिस्थितीत ‘अँटिफा’ मॉडेलचे अनुसरण करणे, त्यांच्यासाठी उपयुक्त वाटत असेल. या घोर डाव्या संघटनांमध्ये कार्यकर्त्यांच्या विकेंद्रीकृत मिश्रणाचा समावेश आहे. या संघटनांतर्गत घोर अराजकवादी आणि सरकार तसेच व्यवस्थेच्या घनघोर विरोधी लोक सामील आहेत आणि त्यांनी दीर्घ काळापासून सरकार, भांडवलवादी आणि वैश्विकरणाच्या प्रक्रियेविरोधातील षड्यंत्रांची रचना केली आणि प्रत्यक्षात हल्ले घडवून आणले. यासाठी त्यांनी काही छद्म संघटनांचाही आडोसा घेतला, जसे अमेरिकेत अनेक पर्यावण व प्राणी अधिकार समूह, उदा. ‘अर्थ लिबरेशन फ्रंट’ आणि ‘अॅनिमल लिबरेशन फ्रंट’, याच्या मागे राहून ते मोठ्या व्यापारी संस्था, नागरी समाज आणि सरकारांविरोधात हल्ले करत आले. आता हीच प्रक्रिया भारतातही निर्माण होत आहे. सुरुवातीला मुस्लिमांचे तथाकथित मॉब लिंचिंग, कथित दलित उत्पीडन, सीएए, एनआरसीदरम्यान देशातील कथित धार्मिक आधारावर विभाजनाचा विरोध आणि आता कृषी कायद्यांवरून देशातली तथाकथित भांडवलशहांच्या वर्चस्वाला रोखण्याच्या नावाखाली चालणारे आंदोलन वास्तवात पूर्णतः मिथ्या आणि निराधार तथ्यांवर आधारित आहे, ज्याचा वास्तवाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. सोव्हिएत संघाच्या प्रभावाच्या दिवसांची यावरून आठवण येते, ज्यावेळी जगभरात पसरलेले त्याचे प्रज्ञादुर्बल किंवा निर्बुद्ध अनुयायी पॉलिट ब्यूरोच्या आदेशांचे अंधानुकरण करण्यासाठी तत्पर असत आणि सोव्हिएत संघाने स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या धोरणांना १८० अंशापर्यंत फिरविल्यानंतरही तितक्याच श्रद्धेने विपरीत धोरणांचेही पालन करत असत, जसे दुसरे महायुद्ध जे आधी केवळ भांडवलशहांचा सत्तेसाठीचा संघर्ष मानले गेले. परंतु, सोव्हिएत संघाने यात उडी घेताच ते अचानक जनयुद्ध झाले आणि भारतातील इंग्रज त्यांचे सर्वात मोठे मित्र. भारत विविधतेने नटलेला देश असून इथे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधता जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक आहे आणि शेकडो वर्षांपासून परस्पर सामंजस्याने सर्वच सौहार्दाने राहत आहेत. परंतु, या देशविरोधी तत्त्वांसाठी ही विविधता त्या ट्रिगरसारखी आहे, जे या सौहार्दाला छिन्न-भिन्न करण्यासाठी उपयुक्त साधन सिद्ध होऊ शकते.
 
 
 
आज डावी मंडळी जनहितैषी असल्याचा दावा करतात आणि जगभरातील गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या हिताचे ढोल पिटतात. परंतु, त्यांचे हात त्याच शेतकरी आणि कामगारांच्या रक्ताने रंगलेले आहेत. आपण साम्यवादी हिंसेने पिडलेल्या लोकांची आकडेवारी पाहिली, तर ती महायुद्धात मरण पावलेल्या लोकांच्या संख्येशी स्पर्धा करताना दिसते. परंतु, निलाजरेपणा इतका की ते कोणत्याही सीमेच्या बंधनाला स्वीकारत नाहीत आणि हेच कारण आहे की, हे उत्पीडक आज स्वतःला रक्षकाच्या रूपात प्रस्तुत करत आहेत. मात्र, हे एवढ्यापर्यंतच मर्यादित नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये जर विरोधक आपले राजकीय हिशोब पूर्ण करण्यासाठी अशा प्रवृत्तींशी हात मिळवत असतील, तर ही स्थिती लोकशाहीच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते. अराजकता कधीही एखाद्या शासन प्रणालीला पर्याय होऊ शकत नाही. एखादी असंघटित व्यवस्था स्थानापन्न संघटित अव्यवस्था कधीही होऊ शकत नाही आणि जर असे झाले तर राष्ट्राचे पतन नक्कीच होणार, जे ‘अँटिफा’सारख्या विचारधारांचे लक्ष्य आहे. हेच कारण आहे की, राष्ट्रवाद या लोकांना प्राणांतिक पीडा देतो.
 
 
 
 
(अनुवाद - महेश पुराणिक)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@