
गुगलनेसुद्धा घेतली दखल
मुंबई: आज दि.२१ डिसेंबर रोजी होणाऱ्या अभूतपूर्व युतीचे तुम्ही देखील साक्षीदार होऊ शकता. एरवीही अनेक युती, महायुती होतच असतात; पण आज २१ डिसेंबर रोजी गुरू आणि शनि 'यांची' युती होणार आहे. म्हणजेच गुरू आणि शनि हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या खूप जवळ दिसणार आहेत. आणि हीच दोन ग्रहांची अनंत काळानंतर होणारी युती पाहण्यासाठी असंख्य खगोलप्रेमी उत्सुक आहेत.
जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. इंग्रजीत याला 'कंजक्शन' म्हणतात. गुरू आणि शनि आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठे दोन ग्रह आहेत. २१ डिसेंबर २०२० रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.१ अंश कोनीय (अर्थात ६ कला आणी ६ विकला) अंतरावर असतील. तुलनेने चंद्राचा सरासरी कोनीय व्यास हा ०.५ अंश आहे. दुर्बिणीच्या शोधानंतर दुसर्यांदा हे ग्रह इतके जवळ दिसणार आहेत. या पूर्वी १६ जुलै १६२३ रोजी हे ग्रह जेव्हा इतके जवळ आले तेव्हा त्यांच्यातील अंतर ०.०८६ अंश होते.
गुरू हा सूर्याची एक परिक्रमा ११.८७ वर्षांनी पूर्ण करतो, तर शनिला २९.५ वर्ष लागतात. या दोन्हीचा परिणाम असा होतो की, सुमारे १९ वर्ष आणि ७ महिन्यांनी या ग्रहांची महायुती होती. पण प्रत्येक महायुतीच्या वेळी या दोन्ही ग्रहामधील अंतर वेगवेगळे असतात. याच ऐतिहासिक घटनेची दाखल गूगलने सुद्धा घेतली आहे. तेव्हा या दोन ग्रहांची 'युती' पाहायला विसरू नका.