पाकिस्तानचा अनावश्यक गोळीबार

    20-Dec-2020   
Total Views | 101
PAK_1  H x W: 0
 
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तान हा संघर्ष सातत्याने पाहावयास मिळत आहे. भारतीय सीमेवर गोळीबार करणे आणि सीमेवर अशांतता पसरविणे हेच कायम पाकिस्तानचे धोरण राहिले आहे. पाकिस्तानमार्फत भारतीय सीमेवर करण्यात येणार्‍या गोळीबारामुळे कधीना कधी पाकिस्तान नक्कीच अडचणीत येणार आहे.
 
 
 
पाकिस्तानच्या कृत्यावरून अनेक वेळा असे दिसून येते की, सीमेवर भारताला त्रास देणे आणि चिथावणी देणे हे पाकिस्तानचे धोरणात्मक लक्ष्य आहे. हे समजणे महाकठीण आहे की बर्‍याच वेळेस पाकिस्तानकडून विनाकारण कोणत्या कारणास्तव गोळीबार करण्यात येत असतो. या गोळीबारात भारतीय सैन्यदेखील भरडले जात असते. पाकिस्तानच्या या गैरकृत्यामुळे भारतीय सैन्यालादेखील नाहक त्रास सहन करावा लागत असतो.
 
 
मात्र, भारतीय सैन्याच्या शौर्यापुढे पाकिस्तानलादेखील त्यांच्या या कृष्णकृत्यांची मोठी किंमत मोजावी लागत असते. हे इतके निश्चित आहे की, पाकिस्तानच्या सैन्यामार्फत अनावश्यकपणे सीमेवर होणार्‍या गोळीबारामागे नक्कीच तेथील उच्च स्तरावरून जारी होणारे आदेश आहेत. अन्यथा एखाद्या देशाची सीमा अशी संवेदनशील जागा आहे जिथे कोणी किरकोळ बेजबाबदार कृत्येदेखील करत नाही. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे दोन्ही बाजूंनी युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे असूनही पाकिस्तानकडून अशी प्रक्षोभक कृत्ये बर्‍याचदा केली जातात.
 
 
प्रश्न असा आहे की, अनावश्यकपणे गोळीबार करून करारांचे उल्लंघन करण्याची सवलत किंवा अप्रत्यक्ष आदेश देताना, पाकिस्तानमधील उच्च अधिकारी हे लक्षात घेत नाहीत की, अशी घटना वेळेत हाताळली गेली नाही तर कोणत्या प्रकारची किंमत दोन्ही देशातील नागरिकांना चुकवावी लागू शकते.
 
 
वस्तुतः जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन सामान्य झाले आहे. याच अनुषंगाने बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तानी सैनिकांनी सुंदरबनी सेक्टरमध्ये अचानक घुसखोरी करत गोळीबार सुरू केला. पाकिस्तानकडून होणारे असे कृत्य हे भारतीय सैन्यास मोठी डोकेदुखी ठरत आहे. भारतीय सैन्य अशावेळी घाईगडबडीत कोणतेही कृत्य करत नाही. परंतु, अशा प्रकारच्या क्रियांना प्रतिसाद देणेदेखील आवश्यक आहे. साहजिकच, पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारानंतर भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले.
 
 
यामध्ये ‘बोफोर्स’ तोफ व टॅँकविरोधी क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात चार पाकिस्तानी सैनिक मारले गेले. त्यांच्या दोन पोस्ट आणि पाच बंकर नष्ट झाले. त्यानंतर पाकिस्तानकडून होणारा गोळीबार थांबला. इतका तोटा सहन करून पाकिस्तानला उपरती का येत नाही, हाच मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या गोळीबाराने मोठे नुकसान झाल्याचे बर्‍याचदा प्रसंग उद्भवतात.
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे २००३ मध्ये दोन्ही देशांमधील युद्धविराम कराराच्या इतक्या वर्षानंतरही पाकिस्तानला त्याचे महत्त्व का समजले नाही. यावर्षी सप्टेंबरपर्यंतच पाकिस्तानने नियंत्रण रेषेच्या बाजूने संघर्षाचे तीन हजार, १६५ वेळा उल्लंघन केले होते, जे अतिशय जास्त आहे. यामुळे जम्मू सीमेच्या बाधित भागात राहणार्‍या नागरिकांसाठी सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र, त्यांचे जगणे हे नक्कीच कठीण झाले आहे.
 
 
खराब हवामान असूनही, ते अशा प्रकारे होणार्‍या अनाहूत गोळीबारासाठी सदैव तयार असतात. पाकिस्तानच्या या अशा आगळीकीमुळे येथील नागरिकांच्या जीवनात प्रत्येक वेळी उद्भवणारी परिस्थिती ही अवघ्या मानवजातीसाठी नक्कीच हानिकारक अशीच आहे. पाकिस्तानमार्फत होणारे हे कृत्य इतके अमानवीय आहे की, त्यांच्या या कृतीमुळे बर्‍याच वेळा एखाद्याला अचानक त्याच्या घरातून पळ काढावा लागतो. ही समस्या सीमावर्ती घुसखोरी व्यतिरिक्त आहे, ज्यामुळे बर्‍याच स्तरांवर समस्या उद्भवत आहेत.
 
 
विडंबनाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान अनेकदा सीमेवरच्या त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास असमर्थ असतो आणि बर्‍याचदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरचा भडका उडवितो. भारत हा लोकशाही असलेला देश असल्याने आपल्यावर जास्तीत जास्त संयम राखला जातो. परंतु, सार्वभौम देश म्हणून अशा प्रकारचे गैरकृत्य सहन करण्याचीदेखील मर्यादा असेल याचे भान आता आंतरराष्ट्रीय समुदायाने राखणे आवश्यक आहे. केवळ लोकशाही राष्ट्रांना विरोध करायचा म्हणून पाकिस्तानसारख्या दहशदवाद पोषक राष्ट्रांना पाठबळ देणे हे नक्कीच संयुक्तिक नाही.



प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121