न्यायालयीन अवमानप्रकरणी ६ आठवड्यात बाजू मांडण्याचे आदेश
मुंबई: प्रसिद्ध कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी सुप्रीम कोर्टासंदर्भात केलेल्या वादग्रस्त ट्वीटप्रकरणी सुनावणी झाली. कुणाल कामरा सोबतच व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे. यामध्ये 'न्यायालयीन अवमानप्रकरणी दोघांवर खटला का चालवू नये' याचं उत्तर देत येत्या सहा आठवड्यात बाजू मांडण्यास सांगितले आहे. मात्र, कुणाल कामरा आणि रचिता तनेजा यांनी स्वत: कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत कोर्टाने याबाबत दोघांनाही सूटही दिलीय.
रिपब्लिक न्यूजचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर स्टॅंडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी न्यायालयाचा तीव्र शब्दात निषेध केला. कुणाल कामरा यांनी सुप्रीम कोर्टाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात मोठा वाद सुरु झाला.
याप्रकरणी के. के. वेणुगोपाल यांनी तातडीने कुणाल कामरा यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्याची परवानगी दिली. तसेच "अशा पद्धतीचं भाष्य म्हणजे सुप्रीम कोर्टाची अखंडता, स्वातंत्र्य आणि नि:पक्षपातीपणा यावर उपस्थित करण्यात आलेले चुकीचे प्रश्न आहेत. न्यायमूर्तींवर आरोप करणारी ही टिप्पणी आहे. यावरून असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे की न्यायालय फक्त एका पक्षासाठी काम करतं," असे मत वेणुगोपाल यांनी व्यक्त केले.