कल्याण : मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात वाचनसंस्कृती वाढावी यासाठी ‘ग्रंथ आपल्या दारी’या फिरत्या वाचनालयांच्या माध्यमातून पुस्तकांना वाचकांच्या दारी नेण्याच्या अनोख्या उपक्रमाची कल्याणमध्ये आज मुहुर्तमेढ रोवली गेली. या उपक्रमांमुळे साहित्यांच्या विविध अंगाना स्पर्श करणारी तब्बल २२८ पुस्तके वाचकांच्या भेटीला येणार आहे.
कल्याणमधील युवा उद्योजक मिलिंद चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भिवंडी लोकसभेचे भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात आणि आता ही लोकांनी सोशल मिडीया, वेबसिरीज आदींचा पुरेपुर वापर केला आहे. आपल्याकडे वाचनाची मोठी परंपरा आहे. मोठा वाचक वर्ग ही आहे. अनेक दिग्गज व्यक्तींनी मोठेमोठे ग्रंथ , कांदब:यांची पुष्कळ ग्रंथसंपदा आपल्यासाठी उपलब्ध आहे. अनेक दिग्गज व्यक्तींनी मोठेमोठे ग्रंथ, कादंब:यांची पुष्कळ ग्रंथसंपदा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. याचा लोकांना काहीसा विसर पडत चालला असून लोकांना त्यांची माहिती होण्यासाठी आणि वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी हा उपक्रम राबवल्याची माहिती मिलिंद चव्हाण यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबा जोशी, जयवंत भोईर, भाजपा शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, वरूण पाटील, वैशाली पाटील, चव्हाण प्रतिष्ठानचे साहेबराव चव्हाण, सुनील चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कपिल पाटील म्हणाले, पुस्तकांची सर दुसऱ्या कशालाही येणार नाही. जीवनात वाचन खूप महत्त्वाचे आहे. मी सुध्दा लहानपणापासून स्वत:ला पुस्तके वाचण्याची सवय लावून घेतली आहे. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या. मला खासदार असण्यापेक्षा एक वाचक आहोत ही ओळख खूप मोठी आणि महत्त्वाची वाटते, असे त्यांनी सांगितले.‘ग्रंथ आपल्या दारी -फिरते वाचनालय’ उपक्रमांतर्गत महापुरूषांची आत्मचरित्र, सत्यकथा, कादंबरी, प्रेरणाकथा अशा विविध प्रकारची तब्बल २२८ पुस्तके आहेत. वाचकांना ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये कुसुमाग्रज यांचे वादळवेल, रणजित देसाई यांचे गंधाली, प्रविण दवणे यांचे तिचं आकाश, मंगेश पाडगावकरांचे शर्मिष्ठा , बाबा भांड यांचे आनंदघन, नागनाथ कोतापल्ले यांचे मध्यरात्र, प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा, वि.वा. शिरवाडकरांचे कौंतेय, स्वामी विवेकानंदाचे यशशिखर, बाबासाहेब पुरंदरेचे जाणता राजा, प्रा. नामदेवराव जाधव यांचे शिवाजी द मॅनेजमेंट गुरू आदी पुस्तकांचा समावेश आहे. सध्या हा उपक्रम केवळ कल्याण पश्चिमसाठी राबविण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी ८८६६३८८१८१या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहान मिलिंद चव्हाण विचार मंच आणि चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.