अवेळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली
रत्नागिरी : सोमवारी सकाळी पडलेला अवेळी पाऊसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. असा पाऊस पिकाला घातक असल्याचे बोलले जात असल्याने चक्रीवादळ, अतिवृष्टी, कोरोना आता आणखी मोठे संकट बळीराजावर येत नाही ना, अशी भीती सर्वांना आहे. कोकणचा राजा, नगदी पिक मानला जाणारा हापूस दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरत आहे. त्यामुळे बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हापुसला पोषक अशी अचानक थंडी गायब होऊन वरुणराजाचे झालेले आगमन यंदाचे बागायतदारांचे अर्थकारण बिघडवणार की काय, अशी भीती भिती व्यक्त केली जात आहे.
कोकणच्या हापूसची जगभरात वेगळी विशेष ओळख आहे. देश-परदेशात हापुसला मोठी मागणी असल्याने हापूस व्यवसायात मोठे अर्थकारण दडलेले आहे. मात्र गेली काही वर्षे या अर्थकारणाला निसर्गाची लागलेली दृष्ट या शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे. अवेळी कोसळणारा पाऊस हापुस पिकाला हानीकारक असल्याने हापूसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागले आहे, अशी माहिती स्थानिक बागायतदारांनी दिली आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणारी थंडी हापूस पिकासाठी अतिशय पोषक असते. या दोन महिन्यात चांगली थंडी असेल तर पिक चांगले येते मात्र गेले काही वर्षे कोकणातून थंडीच गायब झाली आहे. हे कमी की काय म्हणून अवेळी पाऊसही पडू लागला असल्याने हापूसची पुरती वाट लागली आहे.
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने थंडीही चांगली पडेल आणि हापुसला पोषक वातावरण तयार होईल, अशी अपेक्षा आंबा बागायतदारांना होती. मात्र नोव्हेंबर संपून डिसेंबर महिन्याचे १५ दिवस उलटले तरी थंडीचा पत्ता नसल्याने हापुससाठी पोषक वातावरण अद्याप तयारच झालेले नाही. त्यातच आता रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली असल्याने हापुस पिकाबाबतच्या साऱ्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.