नवी दिल्ली : दिल्ली हिंसेप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद विरोधात युएपीएअंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे. दिल्ली सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने उमर खालिद विरोधात युएपीएअंतर्गत हा खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे खालिदच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांना एक आठवड्यापूर्वीच खालिद विरोधात खटला चालविण्यास परवानगी मिळाली होती. त्यामुळे दिल्ली पोलीस लवकरच दिल्ली हिंसेप्रकरणी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या विरोधात यूएपीए अंतर्गत कोर्टात आरोपपत्र दाखल करणार आहे. त्याशिवाय गुन्हे अन्वेषण विभागही खालिद विरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात उत्तरपूर्व दिल्लीत हिंसाचार झाला होता. दिल्ली पोलिसांनी दिल्ली हिंसेप्रकरणी उमर खालिदला युएपीएकायद्यांतर्गत १४ सप्टेंबर रोजी अटक केली होती. कडकड्डुमा कोर्टाने खालिदच्या न्यायलयीन कोठडीत २० नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. दिल्ली पोलिसांनी ही न्यायालयीन कोठडी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. न्यायालयीन कोठडी वाढवण्यास खालिदच्या वकिलाने विरोध केला होता. तर पोलिसांनी खालिद चौकशीला सहकार्य करत नसल्याचा दावा केला होता. दिल्ली विशेष न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर उमरला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.दिल्ली पोलिसांनी उमर खालिद विरोधात ६ मार्चला चार्जशीट दाखल केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावेळी नागरिकांनी रस्त्यावर येऊन रास्ता रोको करण्याचे आवाहन उमर खालिदने केले होते. त्यावेळी उमरने दोन ठिकाणी प्रक्षोभक भाषण केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.