हैदराबाद : हैदराबादच्या महापालिका निवडणुकांमध्ये विजयासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कंबर कसली असल्यामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपाकडून या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला आहे.
'तेव्हा मुख्यमंत्री केसीआर आणि असदुद्दीन ओवेसी कोठे होते?' : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनीदेखील हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेत सत्ताधारी टीआरएस आणि एमआयएम पक्षावर जोरदार हल्लाबोल केलाय. हैदराबादमध्ये पूरस्थिती तयार झाली, पाणी साठलं तेव्हा जनता अडचणीत असताना मुख्यमंत्री केसीआर आणि असदुद्दीन ओवेसी कोठे होते? असा सवाल अमित शाह यांनी विचारला आहे. तसेच हैदराबादच्या जनतेने एकदा भाजपला संधी द्यावी, आम्ही हैदराबामधील सर्व बेकायदेशीर बांधकामं हटवू, परत कधी पाणी साचणार नाही, असे आश्वासन शाह यांनी दिले.आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी हैदराबादमध्ये शक्तिप्रदर्शन केले. तसेच हैदराबादमधील प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनाही अमित शाहा यांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. ओवेसी यांनी एकदा लिहून द्यावे, नंतर रोहिंग्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल, असे आव्हान अमित शाहा यांनी दिले. तसेच घुसखोरांवर कारवाई केल्यानंतर विरोधी पक्ष गोंधळ घालायला सुरुवात करतात, असेही अमित शाह म्हणाले.रोहिंग्यांच्या प्रश्नावर भाष्य करताना अमित शाह म्हणाले की, ओवेसींनी एकदा लिहून द्यावे की बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढा म्हणून. त्यानंतर मी काहीतरी करतो. मात्र आम्ही जेव्हा कायदा करतो तेव्हा हे लोक संसदेमध्ये गोंधळ घालतात. काही दिवसांपूर्वी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून ओवेसींनी अमित शाहांना टोला लगावला होता. जर हैदराबादमध्ये अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या राहत असतील तर अमित शाह कारवाई का करत नाहीत. ओवेसींच्या याच टिप्पणीलाअमित शाहांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर केले पाहिजे' : योगी आदित्यनाथ
शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबादमध्ये आले होते. त्यांनी इथे रोड शो केला. तसेच संध्याकाळी एका सभेला संबोधित केले होते. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी हैदराबादमध्ये रोड शो केला होता. या अभियानादरम्यान, आदित्यनाथ यांनी सांगितले की, काही लोक त्यांना विचारतात की, हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर केले पाहिजे का, यावर मी सांगितलं की, का नाही. एवढेच नव्हे तर आदित्यनाथ यांनी यावेळी प्रयागराजचे उदाहरणही दिले.
तर विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फायदा
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत चार प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यात टीआरएस, एमआयएम, काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. मात्र, मुख्य लढत ही भाजप आणि एमआयएममध्ये सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तेलंगनामध्ये तेलंगण राष्ट्र समिती मजबूत असली तरी चंद्राबाबू नायडू यांच्यावर लोकांची नाराजी पाहायला मिळतेय. तर इथं काँग्रेस कमजोर आहे. हैदराबादेत भाजप ओवेसींची ताकद कमी करण्यात यशस्वी ठरली तर विधानसभा निवडणुकीत भाजपला त्याचा मोठा फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.