इयत्ता नववीमध्ये शिकणारी व स्त्रियांच्या मासिक धर्माबाबत जागृती करणारी आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त पूनम निकम हिच्या कार्याविषयी...
परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता हा मानवी जीवनाचा जसा अविभाज्य घटक आहे, तसाच महिलांच्याबाबतीत मासिक धर्म काळातील शारीरिक निगा व स्वच्छता हा तितकाच महत्त्वाचा विषय. मात्र, भारतात अनेक महिलांना याविषयी पुरसे ज्ञान नसल्याने किंवा त्याबाबत उघडपणे वाच्यता टाळल्याने, बरेचदा कुचंबणा सहन करावी लागते. नाशिकमधील पूनम निकम ही इयत्ता नववीमधील विद्यार्थिनी मात्र धिटाईने या विषयी प्रबोधन करताना दिसते. त्यामुळेच तिचे नामांकन जगातील ४२ देशांमधून निवडल्या गेलेल्या १४२ मुलांच्या यादीत ‘बाल शांतता पुरस्कारा’साठी करण्यात आले आहे.
नाशिकमधील पाथर्डीगाव परिसरात वास्तव्यास असणारी पूनम निकम अगदी सर्वसाधारण परिस्थितीत वाढलेली. तिची आई एका रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करते, तर वडील एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतात. निकम कुटुंबामध्ये एकूण चार मुली आणि त्यात परिस्थिती साधारण. मात्र, पूनम आणि तिच्या बहिणी अभ्यास, घरकाम आणि इतर सर्वच कामांमध्ये अग्रेसर. पूनमही घरकामाबरोबरच वक्तृत्व आणि अभ्यासातही तितकीच निपुण. त्याचबरोबर पूनमला स्वच्छता राखायला खूप आवडते. मनपा शिक्षण विभाग, ‘सीवायडीए’ अर्थात ‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अॅण्ड अॅक्टिव्हिटी’ आणि ‘सेव्ह द चिल्ड्रेन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आरोग्यदायी शाळा वातावरण प्रकल्पाअंतर्गत स्थापित बाल समिती आणि किशोरवयीन गटामध्ये आल्यापासून पूनममध्ये बदल घडत गेला. मासिक पाळी म्हणजे काय, हे समजून घेऊन आपल्या आई-वडील, बहिणी आणि मैत्रिणी यांच्यासमवेत न लाजता मोकळेपणाने पूनमने संवाद साधण्यास सुरुवात केली. निकम कुटुंबात घरात कमविणारे दोघेजण व चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत सर्व गोष्टींचा खर्च वजा करून मुलींना शिक्षण दिले जाते. त्यामुळे स्त्रीजन्माकडे नकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या समाजातील काही घटकांसाठी हे नक्कीच पथदर्शक आहे. बाल समितीमध्ये पूनमच्या हजरजबाबीपणामुळे निवड करण्यात आली. तिला कोणतीही गोष्ट चटकन लक्षात येते. मासिक चक्राबद्दल सर्वांना माहिती सांगत असताना, तिच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले आणि तिने ते प्रश्न ‘सीवायडीए’ प्रकल्प कर्मचार्यांना विचारले आणि शंका दूर केल्या. त्यानंतर शांत न बसता, तिने आपल्या मैत्रिणींमध्ये मासिक पाळीबद्दल माहिती सांगण्यास सुरुवात केली. त्यात तिला काही अडचण आली, तर ती पुन्हा त्या कर्मचार्यांकडे धाव घेत असे. मासिक पाळी व्यवस्थापन कसे करावे, याबाबत आज पूनम अनेकांना मार्गदर्शन करते. मासिक पाळीबद्दल चारचौघात बोलणे म्हणजे पाप, असा समज असताना तिने आपल्या राहत्या घराच्या परिसरातच आई-वडील, बहीण तसेच मैत्रिणींना याविषयी माहिती सांगण्यास, त्यांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली. अशा या पूनमला नवनवीन गोष्ट शिकण्याची जिद्द आणि ज्ञानाचा प्रसार करण्याची मनोमन आवड.
विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य तो परिवेश निर्माण करून दिला, तर मोठी किमया साधली जाते, हेच पूनमच्या या कार्यावरून दिसून येते. पूनममध्ये जो काही सकारात्मक बदल घडला आहे, त्यास ‘आनंददायी शाळा वातावरण’ हा प्रकल्प व मनपा शाळा क्र. ८६च्या शिक्षकांनी घेतलेली अविरत मेहनत असल्याचे दिसून येते. सरकारी शाळा या शिक्षण देण्यात कायमच मागे असतात, तिथे मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही, अशी धारणा आपल्याला समाजात सर्वसाधारणपणे दिसून येते. मात्र, पूनमच्या या कर्तृत्वाने हा समज दूर होण्यास नक्कीच मदत होईल. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेली पूनम ही तिला मिळालेल्या संधीचा सदुपयोग करत आहे आणि त्यातून ती न केवळ स्वत:ला, तर समाजाला स्वच्छतेबाबत जागरूक करण्याचे कार्य करत आहे. भविष्यात याच दिशेने कार्य करण्याचा तिचा मानस असून आईवडिलांचा मोलाचा पाठिंबा तिला मिळत आहे. पूनमची आजीदेखील आता तिचे हे विचार समजून घेत आहे. त्यामुळे भूत-भविष्य आणि वर्तमानातील अशा तिन्ही पिढ्यांना पूनम स्वच्छतेबाबत सजग करताना दिसते. केवळ छायाचित्रासाठी स्वच्छता करणारे काही नागरिक समाजात दिसत असताना, खऱ्या अर्थाने कार्य करणारी पूनम ही नक्कीच ‘आदर्श स्वच्छतादूत’ म्हणून पुढे येत आहे. शहरी भागात मासिकपाळीच्या स्वच्छतेबाबत बऱ्यापैकी जागरुकता असल्याचे दिसून येते. मात्र, ग्रामीण क्षेत्रातील काही भाग विशेषत: वनवासीबहुल भागात याबाबत फारशी वाच्यताही केली जात नाही. अशावेळी तेथील किशोरवयीन मुलींना सुरुवातीपासूनच याबाबत जागरुक केले, तर आगामी काळात भारतीय समाज पूर्णत: या बाबतीत साक्षर झालेला पाहावयास मिळेल. पूनमचे हे कार्य समाजातील इतर विद्यार्थिनींसाठीदेखील नक्कीच पथदर्शक असेच आहे. आगामी काळातदेखील पूनमच्या हातून असेच कार्य घडत राहो, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!