अविरत ध्येयासक्ती!

    17-Nov-2020   
Total Views | 234
Dattatray Pawar_1 &n

भावीपिढीला पोहण्याच्या क्रीडाप्रकारात तरबेज करण्यासाठी पदरमोड करून कार्य करणारे मनमाड येथील दत्तात्रय पगार यांच्याविषयी...
 
 
जीवनात काही काम करण्यास आवड किंवा परिस्थिती ही नेहमीच प्रेरणास्रोत म्हणून काम करत असते. क्रीडा क्षेत्रात भारतीय आजही त्यांच्यातील नैसर्गिक गुणवत्तेपेक्षा जागतिक व्यासपीठावर मागे आहेत. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. याला कारण म्हणजे, खेळांकडे आपला सर्वांचा बघण्याचा असलेला दुय्यम दृष्टिकोन आणि उपलब्ध सोयी-सुविधांची असणारी वानवा.
त्यातच जलक्रीडा हा तर आपल्याकडे आज अतिशय दूरचा विषय ठरला आहे. पोहणे हा प्रकार नवीन पिढीला फारसा येत नाही. त्यामुळे अपघात होऊन मृत्यू होण्याच्या घटनादेखील घडत असतात. हीच गरज ओळखून मनमाडजवळील चांदवड तालुक्यातील वाघदर्डी येथे दत्तात्रय पगार हे तरणतलाव साकारत आहेत.
 
मनमाड हा तसा दुष्काळी भाग. तिथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याचा किमान कालवधी हा महिनाभर असतो. अशा भागातील नागरिक आणि तरूण, लहान मुले यांच्यासाठी तरणतलाव साकारला जात आहे, हे विशेष. पगार हे ‘आर्मी एअर डिफेन्स’मधून ‘नायक’ या पदावरून निवृत्त झाले आहेत. जम्मू-काश्मीर, भूज येथे त्यांनी राष्ट्रसेवा केली आहे. भूज येथे ते आपल्या २००५ ते २०११ या सेवाकाळात तेथील सैन्याच्या तरणतलावावर प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. अनेकदा धरण, विहीर, डोह यात तरुण मुले, लहान मुले पोहण्यासाठी जात असतात. तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडून मृत्यमुखी पडतात. या घटना घडू नये आणि आपल्या भागातील प्रत्येकाला पोहता यावे, यासाठी पगार यांनी २००८ मध्येच आपल्या भागात तरणतलाव बांधण्याचा ध्यास मनी बाळगला. त्यासाठी स्वतःच बचत केली.
 
 
निवृत्तीपश्चात प्राप्त झालेले सर्व पैसे खर्ची घातले आणि एक सेमी ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव त्यांनी साकारला आहे. 92 बाय ४० फूट रुंद आणि ४ व ६ फूट खोली असलेला तरणतलाव त्यांनी साकारला आहे. पगार हे शेतकरी आहेत. त्यांच्या विहिरीला असणारे पाणी ते या तरण तलावात सोडणार आहेत. त्यानंतर तिथे वापरलेले पाणी ते शेतात सोडणार आहेत. यामुळे एकाच पाण्यात पोहण्याचे प्रशिक्षण व शेतीला पाणी असा दुहेरी उपयोग ते करणार आहेत. त्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा कोणताही अपव्यय होणार नाही. याचे नियोजन त्यांनी केले आहे. नवीन पिढी ही जर उत्तम पोहायला शिकली, तर ती स्वतःबरोबरच इतरांच्यादेखील जीविताचे रक्षण करू शकेल, हीच धारणा पगार यांची या कार्यामागे आहे.
 
 
सध्या मनमाडवासीयांना पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी शिर्डी, नाशिक येथे यावे लागते. मात्र, वाघदर्डी येथे साकारण्यात येणारा हा तरणतलाव मनमाडवासीयांच्या वेळ व पैशाची बचत करणारा ठरणार आहे. तसेच, आपल्या भागातील प्रत्येकाला पोहता आलेच पाहिजे, हा ध्यास पगार यांचा असल्याने ते येथे प्रशिक्षक, सुरक्षारक्षकही नेमणार आहेत. भूज येथे कार्यरत असताना पगार यांनी आपण जी राष्ट्रसेवा केली, तशी सेवा समाजातील इतर नागरिकांनादेखील करण्याची संधी मिळावी, हा ध्यास मनी बाळगला होता. त्यामुळे आगामी काळात सैन्यभरती प्रशिक्षण अकादमी सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.
 
 
व्यक्तीला त्याचे जीवन व्यतीत करत असताना पोहता येणे हे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यात जे गुण आहेत, ते गुण इतरांच्या व्यक्तिमत्वाचे अविभाज्य घटक बनावेत, यासाठी आपल्यातील गुणांचे परिवर्तन होण्यासाठी पगार यांनी हा तरणतलाव साकारण्याचे ठरवले. पदवीधर असलेले पगार हे लष्करातील निवृत्तीनंतर सहजरित्या इतर नोकरीत रमू शकत होते. मात्र, त्यांचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता, म्हणून गाठी असलेली पुंजी खर्ची करून सामजिक जाणिवेतून त्यांनी हे कार्य हाती घेतले आहे.
 
 
“केवळ पैसे कमविणे हा आपला हेतू नसून पोहायला शिकविणे हाच माझा ध्यास आहे,” असे पगार सांगतात. त्यामुळे माफक दारात ते येथे पोहण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच, व्यक्तीला संधी मिळाल्यास प्रत्येक व्यक्ती ही प्रगतीची शिखरे पादाक्रांत करू शकते, यावर पगार यांचा विश्वास आहे. त्यामुळे या तरणतलावाच्या माध्यमातून आगामी काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. स्वतःची शेती विकून पगार हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
“आधुनिक काळात पोहायला शिकणे ही काळाची गरज आहे. जागतिक तापमानवाढीमुळे पुराचे ऋतुचक्र बदलत आहे. अशावेळी पुराची स्थितीदेखील बदलत आहे. तसेच, नदीपात्रदेखील खनन होत असल्याने खोल होत आहे. अशावेळी जीविताच्या रक्षणासाठी पोहता येणे आवश्यक आहेच. आधुनिक जीवनशैलीत पोहणे हा एक उत्तम व्यायाम आहे,” असे पगार यांचे स्पष्ट मत असून त्यासाठी ते अविरत कार्यरत आहेत. पदरमोड करून समाजाला जलक्रीडेत निपुण करण्याचे ध्येय पगार यांनी बाळगले आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
खर्गे, राहुल गांधी, शरद पवार सर्वांनीच केलं ऑपरेशन सिंदूरचं समर्थन... वाचा काय म्हणाले विरोधी पक्ष नेते?

खर्गे, राहुल गांधी, शरद पवार सर्वांनीच केलं ऑपरेशन सिंदूरचं समर्थन... वाचा काय म्हणाले विरोधी पक्ष नेते?

पाहलगाम येथील क्रुर हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या निर्णायक कारवाईला देशातील सर्वच पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. विरोधी पक्षांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), शिवसेना (उ.बा.ठा), आम आदमी पार्टी आणि इतर प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कर आणि वायुदलाने एकत्रित पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद आणि मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले केले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121