‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’चा पिरॅमिड- ‘गिफ्टबड्स’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2020   
Total Views |
page_1  H x W:
 
 
आज ‘गिफ्टबड्स’कडे भेटवस्तूंचे ५०० हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या चार वर्षांत ४० हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांना कॉर्पोरेट गिफ्ट्स अश्विनीच्या कंपनीने पुरवल्या आहेत, तर शेकडो ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार भेटवस्तू पाठवलेल्या आहेत. काही लाख रुपयांची उलाढाल ‘गिफ्टबड्स’ सध्या करत आहे.
 
संगमनेरमध्ये ती इंजिनिअरिंग करत होती. त्यावेळेस हॉस्टेलमध्ये राहायची. मुलींचं हॉस्टेल. हिच्या एकंदर बोलक्या स्वभावामुळे ती सगळ्यांची चांगलीच मैत्रिण झाली होती. सिनिअर असो वा ज्युनिअर, सगळ्या मुलींचं हिच्यासोबत खूप छान जमायचं. हिच्याकडे एक चांगला ‘सेन्स’ होता, तो म्हणजे कोणाला कोणती भेटवस्तू द्यावी आणि ती कशापद्धतीने द्यावी. या तिच्या गुणामुळे अनेक मुली तिच्याकडे यायच्या. मित्राचा वाढदिवस असो वा भावाचा, आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असो वा बाबांची रिटायर्डमेंटची पार्टी, त्यांना काय भेट द्यावी हा नेहमीच सगळ्यांना प्रश्न पडायचा. त्यावेळेसही त्या मैत्रिणींना मदत करायच्या. पण, तिला काय माहित तिचा हा गुण तिला त्या क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजिका म्हणून घडवेल. आज तिने विशेषत: ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’मध्ये स्वत:चं एक वेगळं वलय निर्माण केलं आहे. ही उद्योजिका म्हणजे ‘गिफ्टबड्स’ची संचालिका अश्विनी भावसार-शाह.
 
भुसावळच्या रमेश भावसार आणि दीपा भावसार या दाम्पत्यांना दोन अपत्ये. अश्विनी आणि जय. रमेश भावसार नाशिक येथील महिन्द्रा ऍण्ड महिन्द्राच्या संशोधन व विकास विभागात कार्यरत होते, तर दीपा भावसार या गृहिणी. या दोघांनी आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवलं. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. अश्विनीचं दहावीपर्यंत शिक्षण पेठे विद्यालयात झाले. पुढे नाशिकच्या के.के. वाघ वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयातून तिने माहिती-तंत्रज्ञान विषयात पदविका मिळवली. त्यानंतर अश्विनी संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाली. तिथे तिने माहिती-तंत्रज्ञान या विषयात अभियांत्रिकीची पदवी मिळवली. ही पदवी प्राप्त केल्यावर ती नाशिकच्या एका महाविद्यालयात व्याख्याता म्हणून शिकवत होती. मात्र, ‘शिकवणे’ हा आपला प्रांत नाही हे तिला उमजलं आणि एका वर्षातच तिथून तिने गाशा गुंडाळला. यानंतर अश्विनीने एमबीए करण्याचा निर्णय घेतला.
 
आपण विपणन अर्थात मार्केटिंग विषयात चांगले आहोत, हे तिला कुठेतरी कळलं. त्यामुळे याच विषयात एमबीए करण्याचा निर्णय तिने घेतला. ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च टेक्नॉलॉजी’ या संस्थेतून दोन वर्षांचा एमबीएचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. एमबीए शिकत असतानाच तिला एका बँकेमध्ये नोकरीचा प्रस्ताव आला. तिने तो प्रस्ताव स्वीकारला. एक वर्षे तिथे नोकरी केली. त्यानंतर एका माहिती- तंत्रज्ञान संस्थेत तिला नोकरी मिळाली. नोकरी अर्थातच मार्केटिंगची होती. तिथे तिचा बॉस होता, हर्षिल शाह. हर्षिल सोबत तिच्या उद्योग-व्यवसाय या विषयावर खूप चर्चा व्हायच्या.
 
एमबीएमध्ये असताना ती शिकली होती की पहिले नोकरी करावी, पैसा कमवावा, त्यानंतर व्यवसाय करावा. मात्र, हर्षिलचं मत वेगळं होतं. नोकरी करताना आपण त्या मानसिकतेत अडकतो. मग त्यातून बाहेर पडणं अवघड असतं. त्यापेक्षा नोकरीची वाट न पाहता, जेव्हा संधी मिळेल तेव्हा उद्योगात उतरावे असं हर्षिलचं स्पष्ट मत होतं. तसं पण अश्विनीला नोकरी करायचीच नव्हती. तिला उद्योजकतेचं स्वातंत्र्य अनुभवायचं होतं. तशी तिला वाचनाची प्रचंड आवड. अनेक कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत, प्रेरणादायी पुस्तके तिने वाचलेली आहेत. त्याचप्रमाणे कथा, कादंबर्‍या, प्रवास वर्णने, चरित्र-आत्मचरित्र ही पुस्तके सुद्धा तिने वाचली होती. ‘नोकरीच्या गुलामगिरीपेक्षा आपला छोटासा स्वतंत्र व्यवसाय कधीही चांगला’ हे तिने कोणत्यातरी पुस्तकात वाचलं होतं. या वाक्याला अनुसरुन तिने स्वत:चा उद्योग उभारण्याचा निश्चय केला.
 
एव्हाना हर्षिल एक चांगला मित्र झाला होता. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पुढे काहीच दिवसांत अश्विनी आणि हर्षिल विवाहबंधनात अडकले. विवाहानंतर नाशिकची कन्या डोंबिवलीकर झाली. उद्योजक होण्यासाठी हर्षिलचा मोठाच पाठिंबा होता. आपण कॉलेजमध्ये असताना कोणती भेटवस्तू द्यावी, याविषयी माहिती द्यायचो. त्यामुळे अनेकजण खूश व्हायचे. आपण आपलं हे कौशल्य उद्योगासाठी वापरलं तर... हा मनात विचार आल्यानंतर तीनच महिन्यात ‘गिफ्टबड्स’ ही कंपनी आकारास आली. कंपनी सुरु केल्यानंतर ती शांत बसली नाही. तिने आपल्या वर्तुळातील नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना आपल्या या नवीन उद्योगाविषयी सांगण्यास सुरुवात केली. खरंतर हे प्रत्येक उद्योजकाने पहिल्या दिवसापासून करणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा असे होते की, उद्योजकाच्या घरातील लोकांना सुद्धा ठावूक नसते की आपला माणूस नेमका कोणता व्यवसाय करतो.
 
अश्विनीच्या या मौखिक जाहिरातीमुळे तिला पहिले ग्राहक तिच्या वर्तुळातूनच मिळाले. त्यांनी अश्विनीला भेटवस्तूंची ऑर्डर दिली. यानंतर अश्विनीला कळले की, काही उद्योजकीय संस्था अशा आहेत, ज्यांच्या वेळोवेळी बैठका होतात. फक्त उद्योजकच अशा बैठकांना जाऊ शकतात. तिथे आपापल्या व्यवसायाची माहिती द्यायची. त्यातून एकमेकांना संदर्भ द्यायचे व आपापला उद्योग-व्यवसाय वाढवायचा. मात्र, या संस्थेचे सदस्य होण्यासाठी शुल्क आकारले जाते. हे शुल्क आपल्या व्यवसायातूनच उभे करायचे, हे तिने निश्चित केले. वार्षिक शुल्क भरण्याइतपत पैसा आल्यानंतर ती या संस्थेची सदस्य बनली. त्यानंतर या ‘बिझनेस नेटवर्किंग’चा तिला चांगलाच फायदा झाला. मार्केटिंगचं कौशल्य अगोदरच असल्याने ती अनेक उद्योजकांपर्यंत आपला व्यवसाय सहज पोहोचवू शकली.
 
सुरुवातीला ती वेडिंग गिफ्टिंग, पर्सनलाजज्ड गिफ्टिंग, बर्थडे गिफ्टिंग, कॉर्पोरेट गिफ्टिंग असं सगळंच करायची. नंतर तिने फक्त ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’वरच लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं. त्यासाठी तिने खोलवर अभ्यास केला. या क्षेत्रातील अन्य कंपन्या कशाप्रकारे काम करतात, हे जाणून घेतले. या क्षेत्रातील संधी, आव्हानी तपासली. त्यानंतर तिने ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’ हेच निश्चित केले. आज ‘गिफ्टबड्स’कडे भेटवस्तूंचे ५०० हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या चार वर्षांत ४० हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांना कॉर्पोरेट गिफ्ट्स अश्विनीच्या कंपनीने पुरवल्या आहेत, तर शेकडो ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार भेटवस्तू पाठवलेल्या आहेत. काही लाख रुपयांची उलाढाल ‘गिफ्टबड्स’ सध्या करत आहे. दसरा, दिवाळी, नववर्ष, आर्थिक नववर्ष असे औचित्य साधून अश्विनी ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करते. भविष्यात भेटवस्तू तयार करणारा स्वत:चा उत्पादन कारखाना उभारणे हे अश्विनीचे ध्येय आहे.
 
मीना प्रभूंचे ‘इजिप्तायन’ वाचल्यानंतर इजिप्तला भेट देण्याचं तिने मनोमन ठरवलेलं. मात्र, त्यासाठी लागणारा पैसा आपला आपणचं उभारायचा हे सुद्धा तिने मनाशी पक्कं केलेलं. तब्बल आठ वर्षांनंतर तिचं हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. कदाचित नोकरी करताना हे स्वप्न इतक्या लवकर पूर्ण झालं नसतं. ती उद्योगात आली आणि हे स्वप्न लवकर पूर्ण झालं. तशी ती शिक्षणाने इंजिनिअर. पण, उद्योग जणू रक्तात असल्यासारखा ती करते. कोणत्याही उद्योगात आवश्यक असते ती ओळख. आज ती ओळखीच्या खाणीवर बसलीय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. इजिप्तचा उत्तुंग पिरॅमिडसुद्धा तिच्या चिकाटी अन् मेहनत करण्याच्या गुणामुळे तिच्यापुढे जणू खुजा झाला होता. अश्विनी भावसार-शाह या ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’ क्षेत्रात कर्तृत्वाचा पिरॅमिड उभारतील यात तिळमात्र शंका नाही.


@@AUTHORINFO_V1@@