विस्तारवादाविरोधात मोदीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2020   
Total Views |
Narendra Modi_1 &nbs
 



 
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाच्या वार्तेने जगातील अनेक देश आनंदित झाले असतील आणि त्यापैकीच एक म्हणजे आपला शेजारी चीन. डोनाल्ड ट्रम्प गेल्याने भारतासह संपूर्ण जगावर आता आपल्याला एकहाती वर्चस्व गाजवता येईल, असे मनसुबेही चीनने केले असतील. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांघाय सहकार्य परिषदेच्या मंचावरुन संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षीय निवडणूक जिंकले नाही तरी भारत चीनच्या कारस्थानी फुग्यातली हवा फुस्स करण्यात सक्षम असल्याचे दाखवून दिले. 




तसेच भारत यापुढेही जागतिक स्तरावर चीनचा विरोध करत राहील, हा संदेशही मोदींनी यावेळी दिला. नरेंद्र मोदींनी चीनच्या विस्तारवादी धोरणावर त्याचे नाव न घेता, अनेकदा जागतिक व्यासपीठांवर हल्लाबोल केलेला आहे, तसेच चीनच्या कुटिल कारवायांकडे जगाचे लक्षही वेधलेले आहे. आताच्या ‘एससीओ’च्या आभासी परिषदेतही मोदींनी तेच केले व चीनच्या विस्तारवादी धोरणाची पोलखोल केली.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एससीओ’तील आपल्या संबोधनात म्हटले की, “भारताने कधीही विस्तारवादी धोरणाचे पालन केले नाही. आम्ही आमच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचा विचार करतानाच इतरांच्या हितांचाही विचार करतो. आम्ही द्विपक्षीय मुद्दे जागतिक मंचांवर आणत नाही आणि तसे करणार्‍या देशांचे क्रिया-कलाप दुर्दैवी आहेत.” मोदींनी या वाक्यांतूनच चीनला स्पष्ट संदेश दिला की, आमच्या धैर्याची परीक्षा पाहू नका, आपल्या विस्तारवादाला आवर घाला. तसेच मोदींनी यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या सैल भूमिकेवरुन त्या संस्थेलाही आरसा दाखवला.
 
 
 
कारण, संयुक्त राष्ट्रांची स्थापना विस्तारवादाला थोपवण्यासाठी झाली होती, पण आज ही संस्था आपल्या मूळ उद्देशापासून भरकटल्याचे दिसते. मोदींनी आपल्या संबोधनातून केवळ भारताची आक्रमकताच दाखवली नाही, तर आमचा देश शांततेचे पालन करणारा आहे, हेही सांगितले. सोबतच पंतप्रधानांनी यावेळी पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील जागतिक एकजुटीच्या आपल्या अजेंड्यावर जोर दिला. फ्रान्सच्या धर्मांध इस्लामी दहशतवादविरोधी अजेंड्याच्या काळात मोदींनी केलेले हे आवाहन अधिकच महत्त्वाचे ठरते.
 
 
दरम्यान, अमेरिकेत ट्रम्प सरकार पायउतार होणार हे समजल्यापासून चीन आपल्या षड्यंत्रकारी धोरणांवर पुन्हा एकदा सक्रियपणे काम करु लागल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियासह कितीतरी देशांना आर्थिकदृष्ट्या दुबळे करण्याच्या धमक्या आता चीन देऊ लागला आहे. डोनाल्ड ट्रम्प गेल्याने आपल्याविरोधात उठणारा प्रत्येक आवाज दाबता येईल, असे चीनला वाटते, पण नरेंद्र मोदींच्या ‘एससीओ’तील संबोधनाने त्याला चांगलाच झटका बसला.
 
 
आता तर चीनविरोधात कठोर पावले उचलणारे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत न राहिल्याने नरेंद्र मोदीच चीनविरोधी जागतिक अजेंड्याचे सर्वात मोठे नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात. कारण, मोदी सातत्याने चीनच्या विस्तारवादाविरोधात बोलत आहेत आणि मोदींच्याच परराष्ट्र धोरणाच्या प्रभावामुळे जगातील बहुसंख्य देश भारताच्या बाजूने उभे राहत आहेत.
 
 
तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने चिनी सरकारच्या मुखपत्रांनी मात्र ऑस्ट्रेलियाला धमकी दिली आहे. पण, चीनला समजत नाही की, ‘क्वाड’ गटाला एकटा भारतही जोरदार पाठिंबा देऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील बार्ली आयातीच्या मुद्द्यावर भारताने त्याचे याआधीच समर्थन केलेले आहे आणि भारत यापुढेही ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक मुद्द्यांवर त्याच्याबरोबर उभा राहू शकतो, तसेच यात जपानची भूमिका महत्त्वाची असेल.
 
 
दरम्यान, दक्षिण आशियातील बहुतेक सर्वच देश कर्ज देऊन जमिनी हडपण्याच्या चिनी सापळ्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अशावेळी या देशांनी चीनला धक्का देत भारताबरोबर काम करण्याची धोरणे आखली आहेत. संपूर्ण दक्षिण आशिया चीनविरोधाचा बळकट गड झाला असून त्याचे नेतृत्व सध्याच्या घडीला तरी केवळ भारतच करु शकतो. याव्यतिरिक्त ‘क्वाड’ गटातील भारताची वाढती सक्रिय भूमिका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पटलावरील मोठ्या चीनविरोधी नेत्याच्या रुपात समोर येऊ शकतात.
 
 
चिनी अध्यक्ष शी जिनपिंग डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदावरुन सत्ताच्युत झाल्याने आपण पुन्हा एकदा विस्तारवादाची दहशत माजवू शकतो, या आनंदात असतील, पण तो त्यांचा केवळ भ्रम असेल. कारण, पंतप्रधान मोदींनी ‘एससीओ’ संबोधनातून सिद्ध केले की, ट्रम्प यांच्यानंतर चीनला जागतिक स्तरावर वेगळे पाडण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावू.


@@AUTHORINFO_V1@@