गुगल ‘पेटीएम’सारख्या भारतीय स्टार्ट-अप अॅप्सवर अनैतिक, बेकायदेशीर कृती केल्याचा आरोप करत असून एकेकाळी भारतीय स्टार्ट-अप अॅप्ससाठी फायदेशीर ठरलेली गुगल आता त्यांनाच बंद-ठप्प करण्यासाठी काम करत असल्याचे दिसते. नुकतीच भारतीय पेमेंट स्टार्ट-अपने पेमेंट कमिशनची रक्कम ३० टक्क्यांपर्यंत वाढवली.
जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन म्हणून गुगलचा नावलौकिक आहे, तर ‘अॅण्ड्रॉईड’ ही सर्वाधिक वापरली जाणारी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमही गुगलचीच व त्यातले प्ले स्टोअर हे विविध अॅपच्या लिस्टिंगसाठीचे तंत्रही गुगलनेच आणलेले. तसेच गुगलने आपल्या नावाने मोबाईल बाजारपेठेत स्मार्टफोनदेखील लॉन्च केले होते. मात्र, आता गुगलची चर्चा भारतात तरी निराळ्याच मुद्द्यावर होत असून त्याला कारण ठरले ते गुगलचे ‘भारतीय स्टार्ट-अप अॅप्स’विषयीचे धोरण. आपल्या पॉलिसीचे किंवा धोरणांचे उल्लंघन केल्याच्या नावाखाली गुगल भारतीय स्टार्ट-अप अॅप्सवर सातत्याने कारवाई करत असून, यामुळे ‘पेटीएम’सारख्या मोठ्या कंपन्यांनादेखील प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. त्यातून ‘पेटीएम’ने गुगलविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचीदेखील तयारी केली आहे. गुगल ‘पेटीएम’सारख्या भारतीय स्टार्ट-अप अॅप्सवर अनैतिक, बेकायदेशीर कृती केल्याचा आरोप करत असून एकेकाळी भारतीय स्टार्ट-अप अॅप्ससाठी फायदेशीर ठरलेली गुगल आता त्यांनाच बंद-ठप्प करण्यासाठी काम करत असल्याचे दिसते. नुकतीच भारतीय पेमेंट स्टार्ट-अपने पेमेंट कमिशनची रक्कम ३० टक्क्यांपर्यंत वाढवली. परंतु, यामुळे गुगल संतापली आणि तिने अशा अॅप्सवर कारवाई केली. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी गुगलने ‘पेटीएम’सारख्या भारताच्या मोठ्या पेमेंट अॅपलादेखील गुगल प्ले स्टोअरवरून हटवले होते. तथापि, काही तासांनंतर ‘पेटीएम’चे अॅप प्ले स्टोअरवर पुन्हा लिस्ट झाले. पण, या संपूर्ण प्रकाराने मोठाच गहजब माजला होता.
गुगलच्या याच कारवायांविरोधात आता भारतीय स्टार्ट-अप कंपन्यादेखील एकजुट होत असून, त्यांनी एक नवी स्टार्ट-अप असोसिएशनदेखील तयार केली आहे. जेणेकरून एकजुटीने सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवता येईल. ‘इंडिया मार्ट’चे सीईओ दिनेश अग्रवाल यांनी या प्रकारावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “नक्कीच, ही लढाई मोठी आहे आणि या लढाईत गुगलचाच पराभव होईल,” तर ‘पेटीएम’चे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणाले की, “जर आपण वेळीच एकत्र आलो नाही, तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही.” दरम्यान, गुगलच्या कारवाईविरोधात एका व्हर्च्युअल बैठकीचेदेखील आयोजन करण्यात आले होते. त्यात ‘भारत मॅट्रिमोनी’, ‘अपग्रेड’, ‘ड्रीम इलेव्हन’सारख्या भारतातील मोठ्या स्टार्ट-अप कंपन्या सहभागी झाल्यावर त्यांच्या सीईओंनी सरकारकडे गुगलविरोधातील आक्षेप नोंदवले. ‘पेटीएम’ने तर बाजारातील अस्थिर स्थिती व वापरकर्त्यांना वाटणारी चिंता लक्षात घेऊन एक नवीन अॅप स्टोअर लॉन्च करणार असल्याचेही जाहीर केले. ‘पेटीएम’च्या या अॅप स्टोअरमध्ये सर्वप्रकारच्या भारतीय स्टार्ट-अप अॅप्सला लिस्ट केले जाणार असून त्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
दरम्यान, भारतात पेमेंट अॅप्स आणि गुगलच्या ‘गुगल पे’ या अॅण्ड्रॉईड अॅप्सचाही वापर केला जातो, तर गुगलवर आधीपासूनच अविश्वासाबाबत एक खटला सुरू आहे, ज्यात गुगलवर सातत्याने अॅण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. गुगलने मात्र या सर्व गोष्टी नाकारल्या आहेत. वस्तुतः गुगलने ‘पेटीएम’ला काही तासांसाठी का होईना, प्ले स्टोअरवरून हटवले, त्यावेळेपासून भारतात पेमेंट अॅप्ससंबंधाने अस्थिरतेची स्थिती तयार झाली आणि यामुळेच लोक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी या अॅप्समधून पैसे काढत आहेत आणि ही या सर्वच अॅप्ससाठी एक मोठी समस्या झाली आहे. गुगलबाबत आता असेही म्हटले जाते की, ही कंपनी भारतीय स्टार्ट-अपविरोधात काम करायला लागली असून, अशा अॅप्सवर गुगलच्या धोरणांच्या नावावर बंधने लादली जात आहेत. विशेषज्ज्ञांच्या मते, गुगल आपल्या पेमेंट अॅपला प्रमोट करण्यासाठी आपल्या धोरणांच्या उल्लंघनाच्या सबबीखाली भारतीय अॅप्सना लक्ष्य करत आहे, जेणेकरून गुगलच्या मालकीच्या पेमेंट अॅपचा बाजारातील वाटा वाढेल. मात्र, गुगल ज्याप्रकारे भारतीय स्टार्ट-अप अप्सवर निशाणा साधत आहे, ते पाहता असे समजते गुगल भारतीय स्टार्ट-अप अॅप्सचे कंबरडे मोडण्यासाठी उतावळी झाली आहे. परिणामी, भारतीय अॅप्सने गुगलच्या धोरणांना किंवा अॅण्ड्रॉईडमुळे मिळालेल्या एकाधिकारशाहीला विरोध करणे स्वाभाविक म्हटले पाहिजे, तसेच केंद्र सरकारनेदेखील गुगलविरोधात कडक कारवाई करणे गरजेचे आहे.