मैत्रीचा अरुणोदय!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2020   
Total Views |

india us relations_1 


अमेरिका आणि भारत यांच्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य गेल्या काही काळात जलदगतीने वाढलेले दिसते. भारताला आम्ही अत्याधुनिक यंत्रणा आणि शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. उभय देशांसाठी ही बाब महत्त्वाची आहे. भारताच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे करार पूर्ण होत आहेत. भारताचे सार्वभौमत्व अबाधित राहावे, यासाठीही हा मैत्रीचा अध्याय महत्त्वाचा आहे.



अरुणाचल प्रदेश... उगवत्या सूर्याचे पर्वतरांगांनी स्वागत करणारे भारताचे पूर्वेकडील एक महत्त्वाचे राज्य. मात्र, चीनच्या डोळ्यात कायमच ते खुपत राहिले. पण, हा प्रदेश कायम भारताचाच आहे आणि तो राहणारच! यासाठीच आता अमेरिकेने भारतासोबत उभे राहून ठाम भूमिका घेऊन ‘ड्रॅगन’च्या वळवळणार्‍या शेपटीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला. अरुणाचल प्रदेश... भारतातील एक सुंदर नयनरम्य आणि पर्यटकांना आकर्षित करणारे हे राज्य. दिल्लीपासून तसे दूर, त्यामुळे देशाच्या राजकारणातही तसे फारसे सक्रिय नाही. मात्र, स्वतःचे महत्त्व कायम अबाधित ठेवणारा हा प्रदेश आणि इथली माणसं. भौगोलिक सीमा पाहिल्या तर दक्षिणेकडे आसाम, पूर्वेला म्यानमार, पश्चिमेकडे भूटान आणि उत्तरेकडे तिबेट तर दक्षिणपूर्वेकडे नागालॅण्ड, असा विस्तार. १३ लाखांहून जास्त लोकसंख्या असलेले हे राज्य आपली प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारे राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यामध्ये इतर राज्यांप्रमाणे फुटीरतावादी संघटना सक्रिय नाहीत.
बोलीभाषा तरी प्रामुख्याने हिंदीच. नागरिकांचा राष्ट्राभिमान आणि देशाबद्दल प्रेम इतर कुणापेक्षाही तसूभर कमी नाही. पण, या राज्याच्या पूर्वेकडील काही भागांवर चीन सातत्याने दावा करत आला. त्यासाठी युद्धही केले. मात्र, भारताने तेव्हाही चीनचे मनसुबे खरे ठरू दिले नाहीत.आसामच्या विभाजनातून तयार झालेले हे नवे राज्य, त्यामुळेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे ठरते. अमेरिकेने नुकतेच याबद्दल भाष्य केले आहे. अरुणाचल प्रदेश हा संपूर्णपणे भारताचाच भाग आहे आणि त्यावर चीनने केलेला दावा हा संपूर्णपणे चुकीचाच आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या या दाव्यामुळे चीनविरोधात पाठबळ मिळाले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये कुठल्याही प्रकारे चीनने केलेली कार्यवाही घुसखोरीच मानली जाईल, अमेरिका याचा तीव्र विरोध करते, असेही त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ‘एलएसी’वर सुरू असलेल्या घुसखोरीविरोधातही चीनला अमेरिकेने सुनावले आहे. स्थानिक नागरिकांची घुसखोरी असो किंवा चिनी सैनिकांची घुसखोरी, अमेरिका याचा विरोध करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
भारत-चीनमध्ये लडाख येथे सुरू असलेल्या तणावात दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले. झटापट झाली. त्यावरही अमेरिकेने आपले म्हणणे मांडले आहे. अमेरिका परराष्ट्र विभागातर्फे एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. ‘भारत आणि चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावासंदर्भात आम्ही एक मत मांडू इच्छितो की, अरुणाचल प्रदेश ६० वर्षांपासून भारताचा अविभाज्य भाग आहे. तिथे होणार्‍या चीनच्या कुठल्याही प्रकारच्या कारवाईला आम्ही विरोधच करतो.’ मोदी सरकारच्या काळात ज्याप्रमाणे भारत-अमेरिका मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला, त्यादृष्टीने यात अमेरिका सातत्याने मांडत असलेले आपले मत चीनविरोधातील मुत्सद्दी खेळीसाठी भारताचे पारडे जड करणारे आहे. सोबतच अमेरिका पाठीशी असली तरीही अजून आव्हाने कायम आहेत हेदेखील अमेरिकेने अधोरेखित केले आहे.अमेरिका आणि भारत यांच्यात संरक्षण क्षेत्रातील सहकार्य गेल्या काही काळात जलदगतीने वाढलेले दिसते. भारताला आम्ही अत्याधुनिक यंत्रणा आणि शस्त्रास्त्रे पुरवली आहेत. उभय देशांसाठी ही बाब महत्त्वाची आहे. भारताच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे करार पूर्ण होत आहेत. भारताचे सार्वभौमत्व अबाधित राहावे, यासाठीही हा मैत्रीचा अध्याय महत्त्वाचा आहे.


भारत-अमेरिकेमध्ये मंत्रालय स्तरावर चर्चा सुरू आहे. चीनला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिका हिंदी महासागर व इतर सीमाभागातील वर्चस्व कायम ठेवण्याचाही प्रयत्न करणार आहे. कोरोनानंतर चीन हा आर्थिक, संरक्षण, राजकीयदृष्ट्या बलाढ्य देश बनत चालला आहे. त्यातच भारतासह जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांचीही डोकेदुखी चीन ठरत आहे. त्यासाठी कारणे वेगवेगळी असली तरीही या सर्व देशांची समस्या एकच मानली जात आहे, त्यामुळे चीनला नमवण्यासाठी पाश्चिमात्य देशांच्या मैत्रीचा हात जगातील नव्या राजकारणाचा आरंभ मानायला हवा. दुसरीकडे विस्तारवाद हा चीनच्या प्रमुख धोरणाचा भाग आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरपासून ते अरुणाचल प्रदेशच्या भागापर्यंतच्या सीमांची चीनपासून सुरक्षा ही भारताच्या दृष्टीने कायम महत्त्वाची राहिली आहे. त्यासाठी भक्कम संरक्षणासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा कायम असायलाच हवा.
@@AUTHORINFO_V1@@