विश्वास कसा ठेवणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2020   
Total Views |

Joe Biden_1  H
 
 
आपल्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जो बायडन यांनी मोदी सरकारवर नेहमीच टीका केली. भारत सरकारने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील धार्मिक अत्याचारग्रस्तांना देशात आसरा देण्यासाठी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू केला. मात्र, बायडन यांनी ‘सीएए’विरोधात विधाने केली. तसेच बायडन यांनी ‘एनआरसी’ आणि काश्मीर मुद्द्याच्या अनुषंगानेदेखील भारतविरोधी वक्तव्ये केली.
 
 
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ‘अर्ली व्होटिंग सिस्टिम’अंतर्गत मतदानाला प्रारंभ झालेला असून आतापर्यंत सुमारे सहा कोटी लोकांनी त्यात भाग घेतला. अशा परिस्थितीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकन मतदाते आणि प्रामुख्याने भारतीय वंशाच्या अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवल्याचे दिसते. नुकतीच अध्यक्षीय निवडणुकीतील चर्चेची फेरी पार पडली व त्यात विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वायूप्रदूषणाच्या मुद्द्यावरुन भारताचे नाव घेत टीका केली. याविषयी ट्विटरवर ते म्हणाले की, “अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख वाईट अर्थाने केला. तुम्ही तुमच्या मित्रांशी अशी चर्चा करु शकत नाही, तसेच असे करुन तुम्ही हवामान बदलाचा प्रश्नही सोडवू शकत नाही. कमला हॅरिस आणि मी भारत व अमेरिकेतील भागीदारीत आदर-सन्माला अधिकाधिक महत्त्व देणे सुनिश्चित करु.” अर्थातच जो बायडेन यांनी हे ट्विट भारतीय अमेरिकन मतदारांनी आपल्यामागे यासाठीच केल्याचे स्पष्ट होते. बायडेन भारतीय अमेरिकनांना आकर्षित करण्यासाठी शक्य ते सर्वच प्रयत्न करत आहेत आणि या कामात जागतिक माध्यमांतील वामपंथी गटही त्यांची पुरेपूर पाठराखण करत आहेत. परंतु, कित्येक भारतीय अमेरिकनांनी भूतकाळातील गोष्टी विसरलेल्या नाहीत. बायडन यांचा डेमोक्रेटिक पक्ष मोदी सरकार आणि त्यांच्या लोकप्रियतेने चिडल्याचे व त्याने मोदींना हीन लेखण्यात कोणतीही कसर बाकी न ठेवल्याचे भारतीय अमेरिकनांना चांगलेच आठवते.
 
 
आपल्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जो बायडन यांनी मोदी सरकारवर नेहमीच टीका केली. भारत सरकारने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील धार्मिक अत्याचारग्रस्तांना देशात आसरा देण्यासाठी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू केला. मात्र, बायडन यांनी ‘सीएए’विरोधात विधाने केली. तसेच बायडन यांनी ‘एनआरसी’ आणि काश्मीर मुद्द्याच्या अनुषंगानेदेखील भारतविरोधी वक्तव्ये केली. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ हटवले तर हा भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या परंपरेविरोधातील निर्णय असल्याचे ते म्हणाले. भारत सरकारने काश्मिरी नागरिकांच्या हक्क-अधिकारांना पुन्हा बहाल केले पाहिजे, शांततापूर्ण विरोध-निदर्शनांना बंदी घालणे किंवा इंटरनेटवरील बंदी लोकशाहीसाठी हानिकारक असल्याचे बायडन म्हणाले. इथेच जो बायडन यांची भारताबद्दलची नेमकी भूमिका काय ते स्पष्ट होते. सोबतच बायडन भारताच्या अंतर्गत विषयात थेट हस्तक्षेप करत असल्याचे किंवा त्यासाठी उतावीळ झाल्याचेही यातून समजते. परिणामी, जो बायडन यदाकदाचित सत्तेत आलेच तर ते भारतविषयक धोरणांमध्ये कसले कसले अडथळे निर्माण करतील, याचेच संकेत यातून मिळतात. तथापि, भारत व भारतीयांच्या जोरदार विरोधानंतर जो बायडन यांना आपली विधाने मागेदेखील घ्यावी लागली होती.
 
 
दरम्यान, जो बायडन यांनी भारतीयांना अधिकाधिक आकर्षिक करण्यासाठी आणखी एक आमिषही दाखवले, ते म्हणजेच ‘एच1बी’ व्हिसाचे. ‘एच1बी’ व्हिसावरील बंदी हटवणार असल्याचे ते म्हणाले. परंतु, वास्तवात जो बायडन ना भारताचे मित्र होते ना कधी होतील. याचे मूळ कारण १९९२ सालापर्यंत मागे असल्याचे दिसते. जो बायडन यांनी अमेरिकन सिनेटवर दबाव टाकला व रशिया आणि भारतादरम्यान होणारा 24 अब्ज डॉलर्स मूल्याच्या क्रायोजेनिक इंजिनाचा करार रोखून धरला. हा करार झाला असता तर आज अंतराळात भारत जे नवनवे पराक्रम करत आहे, ते २० वर्षांआधीच झाले असते. परंतु, जो बायडन यांच्या एका डावाने भारताला अंतराळ तंत्रज्ञानात २० वर्षे मागे पछाडले. दुसरीकडे भारतीय वंशाच्या असूनही कमला हॅरिस यांचे प्रामाणिकत्व भारताबद्दल जरा कमीच दिसते. काश्मीर धोरणावर सातत्याने केली जाणारी टीका असो वा अमेरिका आणि पाकिस्तानदरम्यानचे पूर्वीचे संबंध सुरळीत करण्याबद्दल असो, कमला हॅरिस यांनी सातत्याने भारतविरोधी बाजूला पाठिंबा दिला. इतकेच नव्हे, तर भारताने काश्मीरबाबत जो निर्णय घेतला तो अमेरिकेच्या मूल्य आणि निकषांविरोधात असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. डेमोक्रेट्स राजनेते भारतावर टीका करण्याची एकही संधी गमावत नाहीत, मात्र, चीन व पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर जो काही धिंगाणा घातला जातो, त्यावर चुप्पी साधतात. म्हणूनच जो बायडन किंवा कमला हॅरिस यांच्यावर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न भारतीय अमेरिकनांसमोरही उपस्थित झाला असेलच.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@