विजयादशमीला मंदिरे खुली न केल्यास मोठा निर्णय घेणार !

    22-Oct-2020
Total Views | 163
Acharya Tushar Bhosale_1&
 
 


मुंबई : राज्यातील मंदिरे आता विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करावी, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. दि. १८ ऑक्टोबर रोजी आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून साधु-संतांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ मागितली होती, या पत्राला उत्तर न आल्याने आज पुन्हा एकदा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने पत्र पाठवून इशारा देण्यात आला आहे.
 
 
 
आपल्या पत्रात आचार्य म्हणतात, "महाराष्ट्रात गेल्या साडे सहा महिन्यांपासून मंदिरे व सर्वच प्रार्थनास्थळे बंद आहेत. कोरोना काळात मानसिकदृष्या खचलेल्यांना आणि भाविक भक्तांना आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घ्यायचे आहे. आपण सर्व व्यवहार सुरु केले असून मंदिरे मात्र बंद आहेत. विशेष करुन मदिरालये सुरु आणि देवालये बंद , हे काळे चित्र आपल्या संस्कृती आणि परंपरेला शोभणारे नाही. मंदिरांवर अवलंबून असलेल्या असंख्य छोट्या व्यावसायिकांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र शासनाच्या दि. ४ जून २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार देशातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, प. बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश यांसह २५ राज्यांतील व सर्वच केंद्रशासित प्रदेशांतील देवस्थाने आजपावेतो उघडण्यात आली आहेत."
 
 
 
"महाराष्ट्रातही देवस्थाने उघडण्याची मागणी अनेक संस्था व संघटनांनी शासन तसेच प्रशासनाकडे अनेकदा केली. मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील भाविक जनतेने राज्यभरात दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी १० हजार पेक्षा ही जास्त देवस्थानांसमोर घंटानाद आंदोलन केले तसेच दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले. मात्र तरीही महाराष्ट्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. यासंबंधी महाराष्ट्रातील विविध संप्रदायाचे प्रमुख साधु-संत, धर्माचार्य यांचे प्रातिनिधिक शिष्टमंडळ आपणांस भेटून त्यांच्या भावना व सूचना आपल्याकडे व्यक्त करु इच्छित होते, म्हणुन आपणांस दि. १८ ऑक्टोबर २०२० रोजी पत्र पाठवून भेटीची वेळ मागितली होती ; मात्र अद्यापही आपल्या भेटीची वेळ आम्हांस प्राप्त झाली नाही", अशी आठवण त्यांनी करून दिली.
 
 
"महोदय, आपणांस या स्मरणपत्राद्वारे पुन्हा विनंती करतो की, या साधु-संतांच्या शिष्टमंडळाला भेटून त्यांच्या भावना व सुचना समजून घ्याव्यात आणि नियमावली प्रसिद्ध करुन विजयादशमी (दसरा) च्या पवित्र मुहूर्तावर दि. २५ ऑक्टोबर रोजी मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर करावा तसेच अश्विन शु. एकादशी म्हणजेच दि. २७ ऑक्टोबर पासून मंदिरात दर्शन सुरु करावे. तसे न झाल्यास नाईलाजाने आम्हाला मोठा व वेगळा निर्णय घ्यावा लागेल व त्यास सर्वस्वी जबाबदार आपण रहाल.", असा इशाराही त्यांनी दिला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121