संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग- पूनम महाजन
तेजस्वी यांची कारकिर्द देदीप्यमान ठरेल
नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) : संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, राजकारणात आल्यापासून मीदेखील संघर्षाला कधी घाबरले नाही. कारण संघर्षातूनच खऱ्या अर्थाने नेतृत्वाची घडण होत असते. संघर्ष करण्याची तयारी असलेल्या तेजस्वी यांचे नेतृत्व नावाप्रमाणेच देदीप्यमान ठरले, असा विश्वास भाजपा युवा मोर्चाच्या मावळत्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी सोमवारी व्यक्त केला.
संघर्षाशिवाय राजकारणात नेतृत्वाची घडण होत नाही, राजकारणात आल्यापासून मी संघर्ष करीत आहे. मात्र, संघर्षाची कधीही भिती मला वाटली नाही. राजकारणात सुरूवातीला मी नकारात्मक टप्प्यांचाही सामना केला, प्रमोद महाजनांनतर त्यांच्या कुटुंबातील कोणी राजकारणात येईल की नाही, असा प्रश्नही अनेकांना पडला होता. मात्र, अशा गोष्टींचा विचार न करता मी राजकारणात वाटचाल सुरू केली. सुरुवातील निवडणुकीमध्ये पराभवांचाही सामना केला, मात्र २०१४ साली अतिशय अवघड अशा मतदारसंघातून मी विजय मिळविला. त्यानंतर अनपेक्षितपणे २०१६ साली भाजयुमोच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि पक्षसंघटनेच्या कामात स्वत:ला झोकून दिले. त्यानंतर तेजस्वी सूर्या यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देताना माझ्या अध्यक्षपदाच्या काळात सकारात्मक काम केल्याचे समाधान आहे, असे पूनम महाजन म्हणाल्या.
तेजस्वी सूर्या यांच्या सारख्या तरुण आणि ओजस्वी नेत्यामध्ये मोठ्या क्षमता असल्याचे महाजन यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, भाजयुमो ही नेतृत्व घडविणारी संस्था आहे. तेजस्वी सूर्या यांचे काम मी मोठ्या बहिणीच्या नात्याने अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्यामध्ये काम करण्याची, संघर्ष करण्याची क्षमता आहे. तेजस्वी सूर्या यांच्या नावातच मोठी उर्जा सामावलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या रुपात कर्नाटकमधून प्रथमच भाजयुमोला राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भाजयुमो वेगळ्याच उंचीवर जाईल, असा विश्वासही पूनम महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.