प्रिंटिंगमधलं वेगळं नाव म्हणून ‘प्रिंटकॉम’चा ब्रॅण्ड तयार झाला. आतापर्यंत दूरदर्शन, नेहरु सेंटर, पॅरॉगॉन सेंटर, आकाशवाणी अशा शासकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील ६०० हून अधिक ग्राहकांना सुरेश साळुंखे यांनी आपल्या सेवा दिलेल्या आहेत.
मनाच्या एका कप्प्यात अनेक घटना, प्रसंग, अविस्मरणीय कार्यक्रम सदैव आठवणीत असतात. मात्र, त्या आठवणी चिरकाल टिकून राहाव्यात, असं वाटत असेल तर त्याचं पुस्तक होणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र, हे पुस्तक वाचनीय असण्यासोबतच दर्शनीय असणंदेखील तितकंच आवश्यक आहे. ते जर दर्शनीय असेल तरच ते वाचलं जाईल. पुस्तकांना दर्शनीय करण्याचं काम एक हरहुन्नरी कलाकार गेली अनेक वर्ष करत आहे. खरंतर डिझाईन आणि प्रिंटिंग हा त्यांचा प्रांत. मात्र, त्यांनी डिझाईन केलेली पुस्तकं पाहिली की, अगदी त्या पुस्तकाच्या प्रेमात पडायला होतं. वाचनाचा कंटाळा येणारा माणूससुद्धा या प्रेमात गढून जातो. हे हरहुन्नरी कलाकार म्हणजे ‘प्रिंटकॉम’ या डिझाईन प्रिंटिंग संस्थेचे सर्वेसर्वा सुरेश साळुंखे होय.
सुरेश साळुंखेचे बाबा तुळशीराम साळुंखे हे पण कलाकारच, पण चर्मकलेतले. चप्पल तयार करण्यात वाकबगार. महाबळेश्वरमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला होता. अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी तयार केलेल्या चपला दिसतात. ‘हंटरवाली’ हा जुन्या काळातील अत्यंत गाजलेला चित्रपट. ‘फिअरलेस नादिया’ ही त्यातली नटी हातात ‘हंटर’ घेऊन घोडेस्वारी करायची. ४०च्या दशकात अशाप्रकारे स्त्री पात्र पाहणं भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीला एक धक्काच होता. या पुरुषी अवतारातील नादियाच्या पायात असलेले बूट हे तुळशीरामांनी तयार केलेले होते. एवढं सगळं असतानादेखील ते यश टिकले नाही. आर्थिक परिस्थिती खालावली. तुळशीराम, त्यांची पत्नी लक्ष्मी आणि सहा मुलांची आर्थिकदृष्ट्या ओढाताण सुरु झाली. या सहा भावंडांमधील एक म्हणजे सुरेश. यांचं मूळ गाव वाई तालुक्यातलं पसरणी, कर्मभूमी मात्र महाबळेश्वर.
सुरेश यांचे बालपण वरळीमध्ये गेले. काहीसे खडतर असेच ते दिवस होते. मराठा मंदिर शाळेत शालेय शिक्षण झाले. इथे शिकत असतानाच त्यांना नाटक-अभिनय-नेपथ्यकलेचा छंद जडला. उत्कृष्ट अभिनय व लिखाणासाठी त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली. नाटकासाठी लागणार्या टोप्या कागदाच्या लगद्यापासून बनवणे, नाटकातील पडदे सीन-सिनेरी रंगविणे वगैरे. एसएससीनंतर कलाशिक्षणाकडे त्यांची वाटचाल सुरु झाली. पुढे मॉडेल आर्ट स्कूलमधून ‘फाऊंडेशन कोर्स’ केला. त्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून ‘कला शिक्षक’ विषयात पदविका मिळवली. त्यानंतर वांद्रे येथील ‘स्कूल ऑफ आर्ट्स’मधून ‘अप्लाईड आर्ट’ विषयात पदविका मिळवली. हे सारं शिक्षण सुरेश यांनी काम करत आलेल्या पैशातून पूर्ण केलेलं आहे. आपल्या शिक्षणाचा कुठेही आपल्या कुटुंबावर ताण येऊ दिला नाही. १९७९ साली त्यांनी इम्पिरियल हायस्कूल येथे कला शिक्षक म्हणून नोकरी केली. कालांतराने त्यांनी एका प्रकाशकाकडे नोकरी केली. सुप्रसिद्ध अशा आर. एम. लालांच्या ‘टाटा बुक’च्या जडणघडणीत सुरेश साळुंखेंचा महत्त्वाचा वाटा आहे. मारिओ मिरांडा, कीट फ्रान्सिस, वसंत हळबे, राम वाईरकर या मुद्रणकलेतील गुरुंसोबत काम करण्याची संधी सुरेशना मिळाली. त्यांनी जवळपास ८१ पुस्तके येथे डिझाईन केली. यामध्ये व्यवस्थापन, कुकरी, व्यंगचित्र, लहान मुले याविषयांसोबतच सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे पुस्तक आदींचा समावेश होता.
सुरेश खूप मेहनती होते. दिवस-रात्र काम करण्याची तयारी. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जे मिळेल ते कलात्मक व आव्हानात्मक काम ते करत राहिले. यानंतर सुरेश साळुंखे औद्योगिक प्रदर्शनांमध्ये आवश्यक असणारे पॅनेल तयार करणार्या कंपनीत रुजू झाले. ही भारतातील क्रमांक एकची या क्षेत्रातील कंपनी होती. त्याकाळी बरेचसे पेंटिंगची कामे हाताने केली जायची. यामुळे बर्याच मर्यादा असायच्या. अशावेळी मोठमोठे प्रदर्शन, स्टॉल, पॅनल, स्क्रीन प्रिटिंग करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक रंग असलेले हजारो कापडी बॅनर स्क्रीन प्रिंटिंग माध्यमाद्वारे रातोरात छापून सकाळी सर्व मुंबईभर झळकायचे ही करामत सुरेश यांची. याचदरम्यान साळुंखे स्क्रीन प्रिंटिंगची कंत्राटेसुद्धा घेऊ लागले होते. दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई अशा महानगरांमध्ये ही कामे चालत. २० हून अधिक कर्मचारी त्यांच्यासोबत कार्यरत होते. दिवस-रात्र काम असल्यामुळे ताण प्रचंड होता. याचा काही प्रमाणात फटका बसला. लोक काम सोडून गेले. चार-पाच दिवस झोपच नसायची. १० वर्षे ‘एल अॅण्ड टी’, ‘बॉम्बे डाईंग’, ‘भारत बिजली’, ‘आयटीसी’, ‘ग्लॅक्सो’ अशा नामांकित कंपन्यांना सेवा दिल्या. ‘युव्ही प्रिंटिंग’ किंवा ‘स्पॉट लॅमिनेशन’ त्यावेळी हे माध्यम नव्हते. सुरेश त्यावेळेस कामात अशा प्रकारचे अद्भुत इफेक्ट्स निर्माण करत असे. एकदा तर झोपेमुळे कामात एक चूक झाली. यापुढे झेपेल इतकंच आणि झोप पुरेशी घेता येईल एवढंच काम घ्यायचं असं साळुंखेंनी निश्चित केले. मात्र, याचवेळी ‘ग्लॅक्सो’चं काम आलं. त्यांचं औद्योगिक प्रदर्शनात दालन होतं. त्यामुळे अवघ्या २४ तासांत त्यांना काम पूर्ण करुन द्यायचं होतं. सुरेशरावांनी ते अवघड काम दिलेल्या वेळेत पूर्ण केलं. या कामाबद्दल ‘ग्लॅक्सो’ कंपनीने साळुंखेचे कौतुक केले होते.
१९८९ साली सुरेश साळुंखेंनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. संगणक युगाची नुकतीच नांदी झाली होती. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांकडेसुद्धा संगणक नसताना प्रिंटिंग क्षेत्रातला पहिला संगणक साळुंखेंकडे होता. ग्राफिक डिझाईन, एक्झिबिशन पॅनेल, पुस्तकांचे डिझाईन, ऑफसेट प्रिंटिंग आदी सेवा ही कंपनी देऊ लागली. कालांतराने ‘प्रिंटकॉम’ असं गोंडस नामकरण कंपनीचं झालं. प्रिंटिंगमधलं वेगळं नाव म्हणून ‘प्रिंटकॉम’चा ब्रॅण्ड तयार झाला. आतापर्यंत दूरदर्शन, नेहरु सेंटर, पॅरॉगॉन सेंटर, आकाशवाणी अशा शासकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील ६०० हून अधिक ग्राहकांना आपल्या सेवा त्यांनी दिलेल्या आहेत. या संपूर्ण प्रवासात सुरेशना त्यांची पत्नी दमयंती आणि दोन कन्यांनी मोलाची साथ दिली. लक्ष्मी ‘कमर्शियल आर्टिस्ट’ असून अनुया लेखापाल आहे.
आजही डिझायनिंग आणि फॅब्रिकेशनद्वारा एक्झिबिशनच्या क्षेत्रांमध्ये सुरेश साळुंखे काम करीत असून आव्हानात्मक आणि नावीन्यपूर्ण असलेले काम हे त्यांचे पॅशन आहे. वॉर्निशिंग, युव्ही प्रिटिंग, स्पॉट युव्ही, ग्रेनिंग, एम्बॉसिंग, युव्ही लॅमिनेशन या आधुनिक तंत्रज्ञानाचा ते वापर करतात. फ्लेक्स, व्हिनायल प्रिंटिंग, सन बोर्ड, अॅक्रेलिक, तांब्याच्या-चांदीच्या प्लेट्स या घटकांचा वापर करुन त्यावर नक्षीकाम करणे हेदेखील त्यांचे आवडीचे काम. अशा प्रकारे विविध धातूंचा वापर करुन कित्येक पारितोषिक, सन्मान चिन्हे त्यांनी तयार केली आहेत. ही पारितोषिके, सन्मान चिन्हे दूरदर्शन, नेहरु सेंटरमार्फत विविध कलाकारांना देऊन गौरविण्यात आलेले आहे. त्यांचा स्वत:चा डिझाईन स्टुडिओ आहे. लक्ष्मी ही त्यांची कन्या उत्तम कमर्शियल आर्टिस्ट असून सुरेशरावांना मदत करते.
दूरदर्शन वाहिनीवरील पुरस्कार सोहळे, ५० वी राष्ट्रीय कॅरम असोसिएशन स्पर्धा, दिल्लीच्या प्रगती मैदानावरील प्लास्ट इंडिया-२००३, कॉमनवेल्थ गेम्स-२००४ या सर्व कार्यक्रमांमध्ये सुरेशरावांच्या कामाचा मोठा वाटा होता. कार्यक्रमाची योजना, मांडणी, प्रसिद्धी सामग्री, भोजन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदींचा विचार करुन निमंत्रण पत्रिका तयार करण्यापासून ते फलक, स्टॅडिज, बॅजेस, पार्किंग पासेस, फेटे फूड कूपन्स, स्मरणिका प्रकाशन, स्मृतिचिन्ह या सार्या सेवा एका छताखाली ते देत. ऑफसेट प्रिंटिंग सोबतच ‘एक्झिबिशन आणि ब्रॅण्डिंग’ हे त्यांचे प्रमुख विषय आहेत. आपल्या कलेचा वारसा पुढील पिढीला देण्याचा सुरेश साळुंखेंचा विचार आहे. यासाठी एक सामाजिक संस्था निर्माण करुन समाजातील होतकरु, पण आर्थिक परिस्थितीमुळे कलेचं शिक्षण घेऊ न शकणार्या तरुण कलाकारांना घडविण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच या माध्यमांवर पुस्तके लिहिण्याची त्यांची इच्छा आहे. दुसर्याचं पुस्तक तयार करणार्या या अवलियाचं स्वत:चं जीवनरुपी पुस्तक कोणत्याही रोमहर्षक कादंबरीपेक्षा कमी नाही, हे नक्की!