मुरलीधरनवरील ‘८००’ वादात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2020   
Total Views |

Vijay Murali_1  
 
 
श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला कोण विसरू शकते? जगात जिथे जिथे क्रिकेट खेळले जाते आणि जिथे जिथे क्रिकेट शौकीन आहेत, तिथे तिथे मुथय्या मुरलीधरनचे फॅन्स असतातच. नुकतीच मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर एका चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली असून, त्याचे पोस्टरही प्रकाशित झाले. जगात सर्वाधिक कसोटी बळी घेणार्‍या मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावरील चित्रपटाचे नाव ‘८००’ असून त्यात तामिळ अभिनेता विजय सेतुपती मुख्य भूमिका साकारणार आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण होऊन हा चित्रपट प्रदर्शितही होईल. पण, त्याआधीच ‘८००’ चित्रपटाची चर्चा सुरू झाली. पण, त्याचे कारण जनतेच्या मनातली नाराजी हे आहे. चित्रपटाची घोषणा आणि पोस्टर प्रकाशित झाल्यानंतर विजय सेतुपतीला भारतातून व प्रामुख्याने तामिळ समुदायाकडून टीकेचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर सध्या ‘शेमऑन विजय सेतुपती’ सर्वाधिक ट्रेंडिंग विषय आहे. त्याचे कारण विजय सेतुपती स्वतः तामिळ आहे. पण, आपल्या सर्वांना माहिती आहे की, श्रीलंकेत तामिळींच्या वेगळ्या प्रदेशासाठी हिंसक आंदोलन उभे राहिले होते. ‘लिट्टे’नामक दहशतवादी संघटनेने तिथे उच्छाद मांडला होता व तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी या सर्व प्रकरणात हस्तक्षेपही केला, नंतर याच कारणामुळे त्यांची हत्याही झाली. मात्र, श्रीलंका सरकारने तामिळ बंडखोरांचा विद्रोह मोडून काढला आणि तामिळींच्या या नरसंहाराचे समर्थन मुथय्या मुरलीधरन याने केले होते. परिणामी, तामिळ विजय सेतुपती तामिळींच्या विनाशाला पाठिंबा देणार्‍या मुथय्या मुरलीधरनचा चित्रपट कसा करू शकतो, या मुद्द्यावरून त्याच्यावर मोठी टीका होत आहे. अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले आहे. परंतु, मुथय्या मुरलीधरन नेमके काय म्हणाला होता? तर २००९ साली श्रीलंकेतील तत्कालीन सरकारवर एक लाखांपेक्षा अधिक तामिळींची कत्तल केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यावर मुरलीधरनने, “हे सर्व विसरून पुढे जाण्यातच सर्वांचे भले आहे,” असे म्हटले होते. श्रीलंकेत तेव्हा महिंदा राजपक्षे यांचे सरकार होते आणि त्यांना खूश करण्यासाठी मुथय्या मुरलीधरनने असे विधान केल्याचे म्हटले जाते आणि तामिळ वंशसंहाराने ज्यांना जखमी केले, त्यांच्याकडून तेव्हापासून मुरलीधरनवर सातत्याने टीका केली जाते.
 
 
 
दुसरीकडे विजय सेतुपती तामिळ चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध अभिनेता असून रजनीकांत, कमल हसन, सूर्या शिवकुमार यांच्या रांगेत त्याची गणना होते. अशावेळी एका प्रसिद्ध तामिळ अभिनेत्याने एका तामिळ विरोधी क्रिकेटरचा चरित्रपट करणे तामिळ समुदायाला पसंत पडत नसल्याचे दिसते व ते विजय सेतुपतीवर टीकेचा भडीमार करत आहेत. सिंहली सरकारने दोन लाख तामिळींची हत्या केली, आता या नरसंहाराचे समर्थन करणार्‍यावर आधारित चित्रपटात अभिनय करण्याचा निर्णय घेऊन विजय सेतुपतीने आपल्याला तामिळ समुदायाच्या वेदनांची जाणीव नाही हे दाखवून दिले, अशी टीका केली जात आहे. तसेच ‘आम्ही या चित्रपटाला आमच्या भूमीतून हटवू, आम्ही त्या लोकांचे दुःख चांगल्या प्रकारे समजतो, ज्यांनी तामिळ नरसंहारात आपल्या जवळच्यांना गमावले. अशावेळी विजय सेतुपती तामिळसंहाराचे समर्थन करणार्‍यांची भूमिका कशी करू शकतो, विजय सेतुपतीला लाज वाटली पाहिजे,’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी तर विजय सेतुपतीला चरित्रपटासाठी मुथय्या मुरलीधरनच सापडला का, असाही प्रश्न विचारला. मरियप्पन थंगवेलुसारख्या लोकांवरील चरित्रपट अजूनही सुरू झालेला नाही. दुसरीकडे एका श्रीलंकन क्रिकेटपटूच्या चरित्रपटाला महत्त्व का? तामिळनाडू आणि उर्वरित भारतात चरित्रपटासाठी पात्र कोणीही नाही का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. ‘८००’ चित्रपट व विजय सेतुपतीवर केली जाणारी ही टीका पाहता, त्याचा पुढचा मार्ग अवघड असल्याचे दिसते. तसेच तामिळींच्या विनाशाचा कथित समर्थक असलेल्या मुथय्या मुरलीधरनवरील चित्रपटात काम करून विजय सेतुपती केवळ तामिळींच्या भावनेशी खेळत नसून आपल्या करिअरवरही प्रश्नचिन्ह लावत आहे. कारण, जनतेच्या बहिष्काराने काय होऊ शकते, हे बॉलीवूडमध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपट, वेबसीरिज वा त्यांच्या ट्रेलरची काय अवस्था झाली, यावरूनच समजते. तसेच काहीसे ‘८००’ आणि विजय सेतुपतीबद्दलही होऊ शकते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@