‘ऑस्कर’ पुरस्कारावर पहिल्यांदा भारतीय मोहर उमटवणार्या कोल्हापूरच्या वेशभूषाकार भानू अथैय्या यांचे गुरुवारी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख.
जगभरामध्ये मनोरंजन म्हणून चित्रपट नावाचा प्रकार कित्येक वर्षांपूर्वी दाखल झाला. आयुष्यातील प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा लोकांना विसर पडावा, म्हणूनही काही लोक चित्रपट पाहतात. मात्र, हळूहळू चित्रपट बनवताना थोर महान व्यक्तींचा जीवनपटदेखील आपल्यासमोर ठेवण्यात आला. चित्रपटांना व्यावसायिक रूप मिळाल्यानंतर मग प्रेक्षकांच्या पसंतीने काही चित्रपटांचा सन्मान करण्यात आला, तर काही चित्रपट हे परीक्षकांच्या पसंतीचे पडले. चित्रपट आणि या कृतीला उभे करणारे मनुष्यबळ यांचादेखील सत्कार करण्यात आला. जगभरामध्ये तसेच भारतातही अनेक पुरस्कार सोहळे होतात, ज्यामध्ये काही खासगी सोहळ्यांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले तर सरकारतर्फे परीक्षकांच्या पसंतीस पडलेल्या चित्रपटांचा सन्मान केला जातो. मात्र, ‘ऑस्कर’ म्हणजेच ‘अकादमी’ पुरस्कार पटकावणे हे सर्वच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांचे स्वप्न असते. परदेशाप्रमाणे भारतातही या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. परंतु, अकादमी पुरस्कारांवर भारताची छाप पडावी, असे क्षण काही क्वचितच. असाच सर्व भारतीयांच्या आयुष्यात एक अभिमानाचा क्षण आला होता, जेव्हा पहिल्यांदा एका भारतीयाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तोही भारतीयांच्या मनामनात बसलेल्या बापूंच्या; अर्थात महात्मा गांधींच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटासाठी. १९८३ मध्ये रिचर्ड टनबरो दिग्दर्शित आणि बेन किंग्स्ले अभिनित महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गांधी’ या चित्रपटाला तब्बल आठ ‘अकादमी’ पुरस्कार भेटले. विशेष म्हणजे, यामध्ये सर्वोत्कृष्ट वेशभूषा म्हणून भानू अथैय्या यांना ‘ऑस्कर’ मिळाला. हा पुरस्कार पटकाविणार्या त्या पहिल्याच भारतीय ठरल्या होत्या. १५ ऑक्टोबर, रोजी वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल...
भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये यांचा जन्म हा २८ एप्रिल, १९२६ रोजी ब्रिटिशपूर्व काळात कोल्हापूरमध्ये झाला. आई शांताबाई आणि वडील अण्णासाहेब राजोपाध्ये यांना सात आपत्ये होती. यापैकी भानुमती या तिसर्या होत्या. विशेष म्हणजे, कलेची आवड ही त्यांना वडिलांकडूनच मिळाली होती. त्यांचे वडीलदेखील चित्रकार होते, शिवाय ते छत्रपतींचे पुरोहितही होते. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत भानुमती यांनीदेखील चित्रकला अवगत केली. विशेष म्हणजे, वडिलांनी त्यांची ही कला हेरल्यानंतर लहान असतानाच चित्रकलेचे धडे घेण्यासाठी एका चित्रकला शिक्षिकेची व्यवस्थाही केली. याशिवाय वडिलांनी कलेमध्ये शालेय शिक्षण घेण्यासाठी ‘जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये प्रवेश मिळवून दिला. त्या अवघ्या नऊ वर्षांच्या असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईंनी शिक्षणासाठी मुलांना प्रोत्साहन तर दिलेच, शिवाय स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळही दिले. तसेच एवढा मोठा धक्का बसल्यानंतरही त्यांनी कलेची वाट सोडली नाही. चित्रकलेची आवड असलेल्या भानुमतींनी बालकलाकार म्हणूनदेखील चित्रपटांमध्ये काम केले आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर भानू यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ‘फाईन आर्ट्स’ शाखेत प्रवेश घेतला आणि चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी काही मासिकांमधून ‘फॅशन इलस्ट्रेटर’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अनेक फॅशन बुटीकसाठी त्यांनी काम केले होते.
‘एव विकली’ या साप्ताहिकामध्ये काम करत असताना अनेक कलाकारांनी त्यांच्या डिझाईनचे कौतुक केले. यामुळे त्यांना कपडे डिझाईन करण्याच्या ऑफर येऊ लागल्या. एखाद्या चित्रपटामध्ये कथेचा तो काळ उभा करण्यासाठी वेशभूषादेखील तेवढीच महत्त्वाची मानली जाते. वेशभूषाकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट १९५३ मध्ये आलेला ‘शहेनशाह’ हा होता. त्यानंतर त्यांना १९५४ मध्ये ‘चालीस बाबा एक चोर’ या चित्रपटाचा प्रोजेक्ट मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी.’मध्ये केलेल्या त्यांच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले आणि पुढे मोठमोठ्या निर्मात्यांकडून त्यांना ऑफर येऊ लागल्या. ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चाँद’, ‘प्यासा’, ‘साहब, बिबी और गुलाम’, ‘वक्त’, ‘तिसरी मंजिल’, ‘गाईड’, ‘लीडर’, ‘गंगा-जमुना’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘खिलौना’सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी योगदान दिले होते. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल १०० हून अधिक चित्रपटांसाठी काम केले आहे. भारतामध्ये काही अजरामर चित्रपट जे लोकांच्या आत्ताही लक्षात राहतात, ते म्हणजे आमीर खानचा ‘लगान’ आणि आशुतोष गोवारीकरचा ‘स्वदेस.’ या चित्रपटांमध्ये वेशभूषाकार म्हणून भानू अथैय्या यांनीच काम पाहिले होते. महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट बनविण्याचा विचार दिग्दर्शक रिचर्ड टनबरो यांच्या मनात आल्यानंतर वेशभूषेसाठी त्यांना एखादा भारतीय वेशभूषाकारच हवा होता. अखेर त्यांचा शोध भानू अथैय्या यांच्यावर येऊन थांबला आणि भारतीय इतिहासात भानू अथैय्या यांनी ‘ऑस्कर’ पटकाविणार्या पहिल्या भारतीय महिला म्हणून नावलौकिक कमावले. त्यांच्या कामासाठी त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. परंतु, ‘ऑस्कर’ने त्यांनाच नव्हे, तर भारतीय इतिहासाची दखल घेण्यास संपूर्ण जगास भाग पाडले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!