पश्चिम घाटामधून 'टाचणी'च्या तीन नव्या प्रजातींचा शोध

    01-Oct-2020   
Total Views | 106

dragonfly _1  H
टाचणांच्या प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या संख्येत भर

मुंबई (अक्षय मांडवकर) - जागतिक जैवविविधता हाॅटस्पाॅट असलेल्या पश्चिम घाटामधून 'टाचणी'च्या तीन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यात विस्तारलेल्या पश्चिम घाटामध्ये या नव्या प्रजाती सापडल्या. यामधील एक प्रजाती जमिनीवरचे कांदळवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'मायरिस्टिका स्वॅम्प्स'मध्ये सापडली आहे. त्यामुळे यासारख्या दुर्मीळ जंगल परिसंस्थेतील जैवविविधतेचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे. 
 
 

'टाचणी' ही चतुर प्रजातींमधील एक प्रकार असली तरी, तिचा समावेश स्वतंत्र गटात होतो. या टाचणीमधील'प्रोटोस्टिक्टा' अर्थात 'रीडटेल' या प्रकारातील तीन नव्या प्रजातींचा उलगडा झाला आहे. बुधवारी या शोधाचे वृत्त 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले. शंतनू जोशी, के ए सुब्रमणियन, आर बाबू, दत्तप्रसाद सावंत आणि कृष्णमेघ कुंटे यांनी या प्रजाती शोधल्या आहेत. या नव्या प्रजातींचे नामकरण 'प्रोटोस्टिक्टा स्यानोफिमोरा', 'प्रोटोस्टिक्टा मायरिस्टिकेन्सिस', 'प्रोटोस्टिक्टा शोलाई' असे करण्यात आले आहे. 'प्रोटोस्टिक्टा स्यानोफिमोरा' ही टाचणी शेंदुरणे वन्यजीव अभयारण्य, कोलम, केरळ आणि कलक्कड मुण्डनथुराई व्याघ्र प्रकल्प, तमिळनाडू येथून शोधण्यात आली. पायावर असणाऱ्या चमकदार निळ्या रंगावरून या टाचणीला 'स्यानोफिमोरा' हे नाव देण्यात आले. 'प्रोटोस्टिक्टा मायरिस्टिकेन्सिस' ही टाचणी कथलेकन, शिमोगा, कर्नाटक येथील मायरिस्टिकाच्या जंगलातून शोधण्यात आली. 'प्रोटोस्टिक्टा शोलाई' ही टाचणी मेघमलाई वन्यजीव अभयारण्य, तमिळनाडू येथील शोला गवताळ प्रदेशात सापडली.
 


dragonfly _1  H
 
पश्चिम घाटामध्ये या संशोधनापूर्वी 'प्रोटोस्टिक्टा' कुळातील नऊ प्रदेशनिष्ठ टाचण्या आढळत होत्या. या संशोधनामुळे त्यांची संख्या आता १२ झाली आहे. गेल्या पाच वर्षात पश्चिम घाटातून एकूण पाच 'प्रोटोस्टिक्टा' प्रजातींचा शोध लावला गेला आहे. या संशोधन पत्रिकेत घाटात आढळणाऱ्या सर्व 'प्रोटोस्टिक्टा' प्रजातींविषयीची महत्त्वाची माहिती आणि रेखाटने देण्यात आली आहेत. तसेच 'प्रोटोस्टिक्टा मोर्टनी' आणि 'प्रोटोस्टिक्टा रूफोस्टिग्मा' या दोन दुर्मीळ टाचण्यांची नवी नोंद करण्यात आलेली आहे. हा शोध पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या संख्येत भर घालणारा आहे. मात्र, पश्चिम घाट आणि हिमालय तसेच आग्नेय आशिया मधील 'प्रोटोस्टिक्टा' प्रजातींमध्ये असलेल्या दुव्याचा अभ्यास करण्यासाठी जनुकीय पातळीवर काम करणे गरजेचे आहे, असे 'झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'चे शास्त्रज्ञ के ए सुब्रमणियन आणि आर बाबू यांनी सांगितले. 
 
 
 
या संशोधनाची सुरुवात कर्नाटकमध्ये काही सर्वेक्षण करत असताना झाली. मी 'मायरिस्टिका' पाणथळ जागेत चतुर पाहत असताना मला ही अतिशय छोटी टाचणी 'मायरिस्टिका' झाडांच्या जवळ उडताना आढळली. त्यानंतर ही टाचणी एक नवी प्रजात असल्याचे मला आढळून आले. 'झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया'च्या शास्त्रज्ञाबरोबर आम्ही अजून दोन प्रोटोस्टिक्टा प्रजातींचा शोध लावला - शंतनु जोशी, संशोधक, एनसीबीएस
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121