बँकांनी लिलावात काढलेली मालमत्ता विकत घेण्यापूर्वी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2020   
Total Views | 900

 


bank_1  H x W:

 
बँकांनी अथवा वित्तीय संस्थांनी लिलावात विक्रीसाठी काढलेल्या मालमत्ता तुलनेने कमी किमतीत मिळतात. या मालमत्ता खरेदी करण्यास तशी हरकत नाही, पण अशा मालमत्ता खरेदी केल्यानंतर काही अडचणी तर निर्माण होणार नाहीत ना, याची पूर्ण माहिती करुन घेणे गरजेचे आहे. तेव्हा, यासंबंधी खरेदीदारांनी नेमकी काय काळजी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
बरेच लोक स्थिर संपत्ती विकत घेण्यासाठी कर्जे घेतात व या कर्जातून तयार घर किंवा तयार बंगला किंवा जमीनजुमला विकत घेतात. कर्जदाराने ज्या संस्थेकडून कर्ज घेतले असेल ती बँक असो किंवा वित्तीय संस्था असो, त्यांचे कर्ज परत करण्यास तो कायमचा असमर्थ आहे, असे सिद्ध झाल्यास कर्जदार व कर्ज दिलेली संस्था यांच्यात झालेल्या करारांनुसार न्यायालय सदर मालमत्तेचा ताबा कर्ज देणार्‍या संस्थेकडे देते. मग कर्ज देणारी संस्था सदर मालमत्ता विकून आपले कर्ज वसूल करते व त्या मालमत्तेच्या लिलावात आलेली रक्कम जर कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त असेल, तर ती कर्जदाराला दिली जाते. परंतु, बँकांनी किंवा वित्तीय संस्थांनी विक्रीस काढलेली अशी मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्यायला हवी.

 

 


स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्ज थकविलेल्यांची एक हजार राहती घरे ‘ई-ऑक्शन’ (ऑनलाईन लिलाव प्रक्रिया) ने विक्रीस काढली आहेत. ही सर्व घरे ‘सेकंडहॅण्ड’ असतात. स्टेट बँकेने ‘ई-ऑक्शन’ प्रक्रिया ३० सप्टेंबरपासून सुरु केली असून, संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात हा लिलाव सुरु राहणार आहे. सध्याच्या देशाच्या एकूणच आर्थिक परिस्थितीचा व भारतीय नागरिकांच्या खिशाचा विचार करता, स्टेट बँकेला यात कितीसा प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकताच आहे. यात भूखंड, घरे, औद्योगिक व व्यापारी युनिट्स लिलावात काढण्यात आली आहेत. या लिलावात बोली लावणार्‍यांचे प्रमाण अधिक असते. कारण, या मालमत्ता तुलनेने कमी किमतीत मिळतात. या मालमत्ता खरेदी करण्यास हरकत नाही, पण खरेदी केल्यानंतर काही अडचणी तर निर्माण होणार नाहीत ना, याची पूर्ण माहिती करुन घ्यावी. तसेच सर्वच मालमत्तांच्या बाबतीत अडचणी निर्माण होतातच असेही नाही.

 

 


सदर मालमत्तेचे ‘टायटल’ ‘क्लिअर’ आहे ना, याचा आधी तपास करावा. यासाठी कायदेशीर सल्लाही घ्यावा. बँका जेव्हा लिलावाची नोटीस वर्तमानपत्रांमध्ये किंवा अन्य ठिकाणी प्रसिद्ध करतात, त्यात त्या असे म्हणतात की, ‘बेस्ट ऑफ द बँक्स नॉलेज’ नुसार ‘टायटल’ ‘क्लिअर’ आहे. या शब्दरचनेमुळे मालमत्ता खरेदी करणार्‍याला १०० टक्के ‘टायटल’ ‘क्लिअर’ आहे, याची ग्वाही मिळत नाही. आमची माहिती अपुरी होती, अशी भूमिका बँक अथवा वित्तीय संस्था नंतरही घेऊ शकते. त्यामुळे नोटीसमधल्या शब्दांचा अर्थ कायदेविषयक तज्ज्ञांकडून नीट समजून घ्यावा. या नोटिसीत बँका असाही एक ‘क्लॉज’ समाविष्ट करतात तो म्हणजे, भविष्यात या मालमत्तेवर कोणी दावेदार हक्क सांगू लागला, तर बँक किंवा वित्तीय संस्था त्याला जबाबदार नसेल. हा ‘क्लॉज’ तर खरेदीदाराच्या मनात भीती निर्माण करु शकतो. हा ‘क्लॉज’ असला तरी या प्रकारात मालमत्तेचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. विमान उंचावरुन कोसळू शकते, याची पूर्ण कल्पना असूनही प्रवासी विमानातून प्रवास करतातच. बँक नोटीसमध्ये आणखी एक ‘क्लॉज’ समाविष्ट करते. तो म्हणजे, मालमत्ता आहे तशा स्थितीत विक्रीस काढलेली आहे. समजा, एखाद्या घराची पडझड झालेली असेल, तर त्या स्वरुपातच खरेदीदाराला ताबा दिला जातो. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून जुने घर विकत घेतले, तर ते विकण्यापूर्वी घरमालक त्या घराची डागडुजी करुन, त्याला रंगरंगोटी करुन तुम्हाला विकतो. ‘लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स’ करारानुसार घर देतानाही घरमालक रंग काढून घर देतो. त्यामुळे या लिलावात घर घेण्यार्‍यांना घरदुरुस्ती, रंगरंगोटी यावर अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. लिलावात ज्याची बोली स्वीकारली जाईल, तो भविष्यात येणार्‍या सर्व अडचणींना जबाबदार राहणार. तसेच ज्या मालकाची मालमत्ता लिलावात काढली आहे, त्या मालकाने बँकेत लिलाव करु नये, अशी ऑर्डर न्यायालयाकडून मिळविलेली नाही ना, हेही पाहणे गरजेचे ठरते.
न्यायालयाच्या निर्णयानुसार, मालमत्ता विक्रीची बोली लावण्यात येते. ती विकली जाते, पण ‘सबरजिस्ट्रार’ काही कायदेशीर निविदांमुळे मालमत्ता नावावर करुन देत नाही, असे प्रकारही घडलेले आहेत. अशा मालमत्ता विकत घेताना खरेदीदार पूर्ण सावध हवा व त्याने सर्व तर्‍हेची काळजी घेऊनच अशी मालमत्ता विकत घ्यावी. वित्तीय संस्था मालमत्तेचा स्टेटस लपवून ठेवूनही ती विकतात, असे प्रकारही घडले आहेत. बँक व वित्तीय संस्था ‘ई-ऑक्शन’च्या नोटिसीमध्ये संपत्तीचा पूर्ण तपशील देतात. स्टेट बँकेत दिलेल्या नोटिसीत मालमत्तेचा पत्ता, मालकाचे नाव-पत्ता व अन्य काही संबंधित माहिती वेबसाईटवर उपलब्ध केली आहे. उत्सुक खरेदीदार बँकेत कळवून बँकेच्या प्रतिनिधीबरोबर जाऊन मालमत्तेची पाहणीही करु शकतो. पण, बँकेत किंवा वित्तीय संस्थेेने दिलेल्या माहितीवर पूर्ण अवलंबून राहू नका. तुम्ही मालमत्ता विकत घेतल्यानंतर, कोणीही तो स्वत: या मालमत्तेचा मालक आहे, असा दावा करु लागला, तर बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या मदतीला येणार नाही. खरेदीदाराने बोलीची रक्कम दिल्यानंतर कायदेशीर व अन्य देणी, कर काही शुल्क जे काही भरायचे असेल, ते बोली जिंकलेल्याला भरावे लागते. अगोदरच्या मालकाने काही रकमा भरलेल्या नसल्यास, त्याही नव्या खरेदीदाराला भराव्या लागतात. बर्‍याच वेळा या रकमा दंडासहित भराव्या लागतात. त्यामुळे मालमत्ता कमी रकमेत मिळाल्याचा आनंद यात निघून जाऊ शकतो. जर घर सोसायटीत असेल तर सोसायटीच्या सचिवाकडून अगोदरच्या मालकाची काही देणी आहेत का, याची माहिती घ्यावी. सोसायटीतली घरे ट्रान्सफर करताना नैसर्गिक ट्रान्सफर व्यतिरिक्त सोसायटी रु. २५ हजार शुल्क मागते. जर बँक किंवा वित्तीय संस्था ते शुल्क भरणार नसेल, तर त्यांच्यावतीने नव्या खरेदीदाराला ते भरावे लागते. बहुधा अशा घरांमध्ये वीजपुरवठा बंद असतो. विजेची किती थकबाकी आहे, हेदेखील जाणून घ्यावे. बंगला असो की सदनिका असो, मालमत्ता कर भरला आहे ना, हेदेखील तपासून पाहावे. कधी कधी बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला भरायच्या शुल्कांचा तपशील देतात, पण खरेदीदाराने स्वत:ही त्याची योग्य तपासणी करावी. जी बँक किंवा वित्तीय संस्था ती मालमत्ता विकत आहे, ती बँक किंवा वित्तीय संस्था खरेदीदार कर्ज देण्याच्या नियमात बसत नसल्यामुळे, त्याला या मालमत्तेच्या खरेदीसाठी कर्ज देणार नसेल, तर दुसरी कुठलीही बँक किंवा वित्तीय संस्था या लिलावातील मालमत्ता खरेदीसाठी कर्ज देणार नाही. यामुळे खरेदीदाराकडे, खरेदीसाठीची पूर्ण रक्कम हवी किंवा अन्य मार्गे तो रक्कम उभारु शकला पाहिजे.

 

 


जर कर्ज मिळाले नाही, तर आयकर सवलतही मिळणार नाही, हादेखील एक तोटा ठरु शकतो. लिलावात भाग घेण्यापूर्वी इच्छुकांनी मालमत्ता रकमेच्या १० टक्के रक्कम विक्रेत्याकडे (बँक किंवा वित्तीय संस्था) अनामत म्हणून ठेवावी लागते. जर खरेदी इच्छुकाची बोली अयशस्वी ठरली, तर ही अनामत रक्कम त्याला परत मिळते. स्टेट बँकेने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे बोली लावणार्‍याला २५ टक्के रक्कम अनामत म्हणून भरावी लागते व बोली जिंकलेल्या दिवसापासून १५ दिवसांच्या आत उरलेली ७५ टक्के रक्कम भरावी लागेल. जर तुम्ही ही रक्कम ठरवून दिलेल्या वेळेत भरु शकला नाहीत, तर तुमची ठेव रक्कम जप्त केली जाते. बोली जिंकणार्‍याने कर्जासाठी अर्ज केला असेल, तर अशा प्रकारच्या व्यवहारांतील कर्जे संमत होण्यासाठी जास्त कालावधी लागतो, तोपर्यंत खरेदीदाराला तितकी रक्कम उभारावी लागते. बँका पैसे भरण्याबाबत थोडीही सवलत देत नाहीत. कारण, त्यांना लवकरात लवकर कर्ज खाते बंद करावयाचे असते. त्यामुळे जे खरोखरच इच्छुक व आर्थिकदृष्ट्या समर्थ आहेत, अशांनीच या बोली प्रक्रियेत भाग घ्यावा. तुम्ही बोलीत जिंकलेली मालमत्ता नियमानुसार नाही, असे तुमच्या लक्षात आले व तुम्हाला ती बँकेला परत करून तुमचे पैसे परत मिळवायचे असतील, तर त्यासाठी बरेच कमी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत, हा महत्त्वाचा मुद्दाही लक्षात घेऊन मगच अशा मालमत्ता खरेदीचे निर्णय घ्यायला हवे.

 

 
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121