
‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत देशपातळीवर व्यापक स्वरूपात विविध माध्यमांतून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शासकीय पातळीवर तसेच अनेक सामाजिक संघटना स्वयंप्रेरणेने या अभियानासाठी आपले योगदान देत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरदेखील याबाबत जनजागृती होताना दिसत आहेत. याच धर्तीवर कडोंमपा ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०’ मोहीम व्यापकपणे राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्राने प्रेरित होऊन गेली १५वर्ष कल्याण पश्चिम परिसरात मिलिंदनगर येथे राहणारा सागर तोडकर हा तरुण संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता सप्ताह राबवित असतो. इयत्ता सातवी शिकलेला सागर ‘मिमिक्री शो’ करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पदरात एक अपंग मुलगा आणि दोन मुली या. त्याच्या संसारगाड्यात त्याची अर्धांगिनी दोन घरची घरकामं करून हातभार लावते.
मूळचा नांदेड जिल्ह्यातील माहूर किनवट तालुक्यातील असलेला सागर कीर्तनकार असलेल्या त्याच्या वडिलांबरोबर लहानपणापासूनच भजन कीर्तनात त्यांना साथ द्यायचा. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याला पोटापाण्यासाठी शिक्षण सोडून कामधंदा शोधावा लागला. पण, हाडाचा कलावंत असणारा सागर कलेच्या क्षेत्रातच आपली भाकरी शोधू लागला आणि त्याच्यातला नकलाकार घडत गेला. कुठलाही राजकारणी, कुठलाही अभिनेता आणि कुठलेही वाहन यांचा हुबेहूब आवाज काढणारा हा कलावंत...
पंधरा वर्षांपूर्वी गाडगेमहाराजांच्या एका भूमिकेसाठी त्याला विचारणा झाली
. ती भूमिका त्याने अगदी हुबेहूब वठवली. त्यानंतर त्याने संत गाडगेबाबांबद्दल अधिक माहिती मिळवली आणि त्यांचा स्वच्छतेचा वसा आपण काही अंशी का होईना चालवायचा, असा त्याने निर्धार केला आणि याच निर्धारातून कल्याण-डोंबिवलीतील सार्वजनिक ठिकाणी गाडगेबाबांसारखी वेशभूषा करून डोक्यावर मटक्याचे खापर, एका हातात झाडू आणि एका हातात काठी घेऊन महापुरुषांचे पुतळे, तसेच सार्वजनिक ठिकाणचा परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचे संदेश देत, संत गाडगेबाबा जयंती सप्ताह साजरा करत गेली तब्बल १५ वर्ष हा कलावंत स्वच्छतेबाबत जनजागृती करत आहे. त्याच्या या कार्याबद्दल त्याला अनेक पुरस्कार मिळाले असले तरी त्याच्या आयुष्याची परवड अजून थांबलेली नाही. स्वच्छ भारत अभियान हे आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत येऊन पोहोचले आहे. मात्र अद्याप म्हणावी तशी लोकांच्या मानसिकतेत सुधारणा झालेली नाही. महापालिका स्तरावर, ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छतेविषयी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून तसेच पथनाट्य अशा माध्यमांतून शहराशहरात स्वच्छतेचा जागर केला जात आहे. मात्र, गेली १५ वर्ष निःस्वार्थी भावनेने स्वच्छतेचा संदेश देणारा सागर हा या महापालिकेच्या सगळ्या खटाटोपांपेक्षा नक्कीच मोठा आणि प्रभावी ठरला आहे. अशा या स्वच्छतेचा जागर करणार्या सागर तोडकरची शासनदरबारी जर दखल घेतली गेली, तर पोटासाठी कलाकार म्हणून धडपडणारा मात्र त्यातही समाजभान जपून कलेच्या माध्यमातून समाजासाठी आणि स्वच्छ भारतअभियानासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देणार्या या कलाकाराच्या परिश्रमाचे मोल होईल. - अजय शेलार