सुप्रजा भाग २४

Total Views | 84


asf_1  H x W: 0


लहान मुलांमध्ये (वय वर्षे १ ते ५) पचनशक्ती सुधारत असते. आधीच पचायला जड किंवा तिखट चमचमीत असे पदार्थ देऊन चालत नाही. दात येईपर्यंत घन आहार सहसा देऊ नये. पचायला सगळ्यात सुलभ म्हणजे तांदूळ आणि मूग. तेव्हा अन्नप्राशन सुरू करताना यानेच करावे. भात हातसडीच्या तांदळाचा असावा. सहसा बासमती, आंबेमोहर इ. प्रकारातील असू नये. कारण, हे भात प्रकार पचायला जड असतात. तांदूळ उगवायला जेवढा अधिक काळ लागतो तेवढा तो जड असतो. नवीन तांदळापेक्षा जुना तांदूळ वापरावा. तांदूळ बाजारातून आणलेला असल्यास तो धुवून वाळवावा आणि मग वापरावा. (त्यावर कृत्रिम Pesticidesचा परिणाम राहत नाही.)


शरीराचे भरणपोषण आहाराने होते. स्तन्यपानाची अवस्था संपून जेव्हा बाळ जेवू लागते, तेव्हा काय द्यावे, किती द्यावे, कधी द्यावे इ. बद्दल संभ्रम निर्माण होतो. बाळ रडू लागले की केवळ भुकेने रडते, असे नव्हे. 'पोट भरले नसेल मग स्तन्यपान द्या' असे केले जाते. या सवयीमुळे दीड-दोन वर्षांचीही मुले अंगावर पिताना दिसते, या अशा स्तन्यपानाने ना मातेच्या व ना बाळाच्या आरोग्याला फायदा होतो. मातेला कंबरदुखी, पाठदुखी, अत्याधिक केस गळणे, थकणे इ. लक्षणे उद्भवू शकतात. तसेच बाळाला चोखत बसण्याची सवय लागते. परिणामी, ते अधिक हट्टी आणि चिडके होते. बाळ मोठे झाल्यावर दातांमुळे मातेला व्रणही होऊ शकतात. म्हणून वेळीच स्तन्यपानावरून दूध व घन आहारामध्ये बाळाचा आहार रुपांतरित करावा. जोपर्यंत केवळ स्तन्यपान सुरू असते तेव्हा वेगळे पाणी पाजण्याची गरज नसते, पण गाईचे, म्हशीचे किंवा अन्य प्रकारचे दूध हे अधिक दाट असते. असे दूध देत असल्यासअधून-मधून थोडे पाणी अवश्य पाजावे. आहारासाठी व पाण्यासाठी शक्यतो प्लास्टिकची भांडी वापरू नयेत. पाण्यासाठी चांदीचे भांडे अथवा तांब्याचे पात्र वापरावे. मुलांना पाणी जर उकळून पाजत असाल, तर पाणी उकळवताना त्यात छोटासा सोन्याचा तुकडा (कॉईन किंवा वळ) जे १०० टक्के शुद्ध आहे, ते घालून उकळावे. असे केल्याने सोन्याचे गुण पाण्यात काही अंशी उतरतात. सोन्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते म्हणून सुवर्णप्राश ही बालकांना देण्याचा प्रघात आहे. शरीरातील उष्णता आटोक्यात ठेवण्यासाठी चांदी उत्तम परिणामकारक आहे. अशा पद्धतीने विचार करून आपल्या दिनक्रमात थोडे थोडे बदल केल्यास बाळाची प्रकृती उत्तम राहण्यास मदत होते. जसे उन्हात मऊ सुती कपडे घालतो आणि थंडीत उबदार लोकरीचे, तसेच आभ्यंतर शरीरातही दोषांची स्थिती बदललेली असते आणि त्या अनुषंगाने आहारातील बदल अपेक्षित आहे. आपण काही उदाहरणांनी समजून घेऊया. उन्हाळ्यात तहान खूप लागते. घाम अधिक येतो. म्हणून पाणीही जास्त प्यायले जाते. फळांचा रस, सरबते यांचाही मारा होतो. पण तेवढ्याच प्रमाणात थंडीत पाणी प्यायले जात नाही. तेवढी गरज भासत नाही. गरजेहून अधिक प्यायल्यावर तर मूत्रप्रवृत्ती वारंवार होते, पण घाम काही येत नाही. अजून एक उदाहरण बघूया. थंडीत स्वाभाविक भूक जास्त लागते. पचनशक्ती उत्तम असते. त्यामुळे पचायला जड अन्नही खाल्ल्यास ते पचते, पण या विरुद्ध उन्हाळ्यात आढळते. उन्हाळ्यात भूक मंदावलेली असते. जास्त खाल्ले जात नाही, तसेच खाण्याची इच्छा होत नाही म्हणजेच शरीर आपल्याला संकेत देत असते. ते जाणून त्याप्रमाणे वागल्यास आजार वारंवार होत नाही.

 

लहान मुलांमध्ये (वय वर्षे १ ते ५) पचनशक्ती सुधारत असते. आधीच पचायला जड किंवा तिखट चमचमीत असे पदार्थ देऊन चालत नाही. दात येईपर्यंत घन आहार सहसा देऊ नये. पचायला सगळ्यात सुलभ म्हणजे तांदूळ आणि मूग. तेव्हा अन्नप्राशन सुरू करताना यानेच करावे. भात हातसडीच्या तांदळाचा असावा. सहसा बासमती, आंबेमोहर इ. प्रकारातील असू नये. कारण, हे भात प्रकार पचायला जड असतात. तांदूळ उगवायला जेवढा अधिक काळ लागतो तेवढा तो जड असतो. नवीन तांदळापेक्षा जुना तांदूळ वापरावा. तांदूळ बाजारातून आणलेला असल्यास तो धुवून वाळवावा आणि मग वापरावा. (त्यावर कृत्रिम Pesticides चा परिणाम राहत नाही.) तांदूळ पचायला अजून हलका करायचा असल्यास तो भाजून घ्यावा. या पद्धतीने तांदळाचा भात केल्यास तो बाधत नाही. तांदूळ शिजवताना उघड्या भांड्यात शक्यतो कल्हई लावलेल्या पितळेच्या भांडात करावा. अ‍ॅल्युमिनिअमचा वापर करू नये. कुकरमध्ये आत एका भांड्यात तांदूळ असल्यास चालेल, पण थेट कुकरमध्ये भात शिजवू नये. भात पचायला हलका हवा असल्यास तो कुकरमध्ये बंद भांड्यात शिजवू नये. अशा पद्धतीने तयार केलेला भात पचायला हलका, चवीने चांगला आणि तृप्तीकर, समाधान देणारा ठरतो. दात येण्यापूर्वी भाताची कांजी किंवा पेज द्यावी. त्यात भाताची शिते नसावीत. या पेजेत लोणकढं तूप (गाईचे तूप) घालावे. किंचीत सैंधव आणि थोडे हिंग/जिरेपूड घालावी. फळांचा रस जर द्यायचा झाला तर दिवसा द्यावा म्हणजे सकाळी ११ च्या आधी. सायंकाळी ५ नंतर देऊ नये. फळांचा रस जेवणानंतर देऊ नये. तसेच, त्यात साखर घालू नये. सर्दी-खोकला असल्यास रस देऊ नये. बाळाला मलबद्धतेचा त्रास होत असल्यास सफरचंदाचा रस देऊ नये. बाळ जरा मोठे झाले, चार दात आले, बसून खायला लागले की फळांचा फक्त रस न देता गर द्यावा. फोडी करून भरवाव्यात, यातील फायबरमुळे शौचास साफ होण्यास मदत होते.

 

भाज्यांचे सूप देताना लाल भोपळा, गाजर, बीट इ.पासून सुरुवात करावी. बाळाला स्तन्यव्यतिरिक्त बाहेरचे अन्न सुरू करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. एकच आहारीय घटक एका वेळेस खाण्यास द्यावे. हे आहारीय घटक सलग चार-पाच दिवस द्यावे. ते नीट पचले, त्याचा त्रास झाला नाही की, त्या बरोबरीचे दुसरा घटक सुरू करावा. असे हळूहळू एक-एक आहारीयघटक समाविष्ट करावे. म्हणजे उदा. आधी पातळ पेज द्यावी. आठवड्याभराने फक्त मुगाचे कढण द्यावे. फळांच्या बाबतीतही असेच करावे. एखादे फळ द्यायला सुरुवात केल्यावर चार-पाच दिवस इतर कोणतेही फळ देऊ नये. एकदा ते पचले, त्रास झाला नाही, असे लक्षात आल्यावर आठवड्याभराने दुसरे फळ द्यावे. पावसाळ्यात सर्दी असतेवेळी केळं, पेरु, सीताफळ देऊ नये. उन्हाळा असतेवेळी पपई टाळावी. बरेचदा 'फ्रूट प्लेट' खायला दिली जाते. म्हणजे आंबट-गोड, उष्ण-थंड असा विचार न करता सगळे एकावर एक खाल्ले जाते वा भरविले जाते. असे करू नये. पोटाला याचा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदशास्त्रात दुधाबरोबर फळ खाणे वर्ज्य सांगितलेले आहेत. म्हणजेच मिल्कशेक घेऊ नये. फळ आणि दूध जर एकत्र करुन खाल्ले, तर पुढे जाऊन विविध त्वचेच्या तक्रारी सुरू होतात. याला फक्त एक फळ अपवाद आहे आंबा. आंब्याच्या रसात थोडे दूध, तूप आणि मिरी घालूनच खावे. नुसता रस पचायला जड तर आहेच, पण त्याचबरोबर तो बाधू शकतो. बाळाला नवीन अन्नाची चव आवडली, तर ते मिटक्या मारत खातं. लहान वयात अतिखाणं सहसा होत नाही. पण, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपवर कार्टून, व्हिडिओज, चित्रे, गाणी दाखवत जर भरविले गेले, तर 'ओव्हर इटिंग' होते (बहुतांशी वेळेस) आणि मग उलटी, पोटदुखी, शौचास होणे, बेचैन वाटणे अशी लक्षणे उद्भवू शकतात. तेव्हा नवीन जिन्नस भरवताना या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करावा. दूध जसे दर दोन-तीन तासांनी पाजावे लागते, तसे आहाराबाबतीत नाही. घन आहार पचायला साधारण चार-पाच तास लागतात. ऋतूनुसार, बाळाच्या प्रकृतीनुसार थोडा फरक असू शकतो. दात येणे, रांगणे, धरुन उभे राहणे, बसणे इ. अवस्थांपर्यंत भरवावे. पण कोणत्याही आधाराशिवाय बाळ बसायला लागले, चालू लागले की हळूहळू स्वत:च्या हाताने थोडे थोडे खाण्यास द्यावे. त्याने जास्त समाधान मिळते. अन्न सुरुवातीस तिखट, मसालेदार, चमचमीत नसावे. मांसाहारी अन्न लवकर सुरू करू नये. आहाराबद्दल अजून विस्ताराने पुढील लेखात जाणून घेऊया.

वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द. 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121