नवी दिल्ली : भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल या हॉकीपटूने 'वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर' पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार पटकावणारी ती जगातील पहिलीच हॉकीपटू ठरली. जगभरातील क्रीडा प्रेमींनी २० दिवस मतदान केल्यानंतर गुरुवारी वर्ल्ड गेम्स ऑफ अॅथलीट म्हणून तिची घोषणा करण्यात आली.
राणी रामपालने १ लाख ९९ हजार ४७७ मतांसह अॅथलीट ऑफ द इयरमध्ये बाजी मारली. जानेवारीमध्ये २० दिवस यासाठी मतदान घेण्यता आले होते. क्रीडा प्रेमींनी केलेल्या या मतदान प्रक्रियेत एकूण ७ लाख ५ हजार ६१० जणांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने राणीला वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे अभिनंदन केले आहे. राणीनंतर युक्रेनचा कराटेपटू स्टेनिसलाव होरूना दुसऱ्या तर कॅनडाची पॉवरलिफ्टर रिया स्टिन तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
या पुरस्कारानंतर राणी रामपाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, " मी हा पुरस्कार हॉकीला अर्पण करते. हे सर्व यश हॉकी प्रेमी, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि इतर सर्व हितचिंतकांच्या सपोर्टमुळे शक्य झाले. एफआयएचने माझे नामांकन केल्याबद्दल त्यांची आभारी आहे." वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर पुरस्कारासाठी वेगवेगळ्या खेळातील २५ जणांची निवड करण्यात आली होती. एफआयएचने राणी रामपाल यांच्या नावाची शिफारस केली होती. गेल्या वर्षी भारताने 'एफआयएच' मालिका जिंकली होती. यामध्ये राणीला मालिकावीरचा बहुमान मिळाला होता. राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होता.