नवी दिल्ली : देशद्रोहाचा आरोप असलेला आरोपी शरजील इमाम पाच दिवसांच्या पोलिस रिमांडवर असून चौकशीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 'तो कट्टरतावादी विचारसरणीकडे झुकलेला असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावे असे मानणाऱ्यांपैकी एक आहे,' अशी कबुली त्याने पोलिसांना कबुली दिल्याचे पोलिसांनीकडून समजते. तसेच त्याने दिलेल्या व्हिडिओमध्ये कोणतीही छेडछाड झाली नसल्याची कबुलीही त्याने दिली आहे. मात्र, ते भाषण अपूर्ण आहे. त्याने तब्बल तासभर भाषण केले होते. त्यावेळी बोलण्याच्या ओघात आसाम देशापासून तोडण्याचे वक्तव्य केले असल्याची कबुली त्याने दिली.
यासोबतच शरजीलने असेही म्हटले आहे की, मला अटक झाल्याचे थोडेही वाईट वाटत नाही. इस्लामिक युवा महासंघ आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी त्याचा काही संबंध आहे की नाही याचा पोलिस सध्या तपास करत आहेत. पोलिसांनी त्याचे सर्व व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत आणि त्याच्या सोशल मीडिया अकाउंटचीही चौकशी करत आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, २५ जानेवारी अलीगड मुस्लिम विद्यापीठात त्याने वादग्रस्त भाषण केले होते. आसामला भारतापासून तोडण्याचा इशारा त्याने दिला होता. या वक्तव्याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या शर्जीलला बिहारच्या जहानाबाद येथून अटक करण्यात आली होती. सध्या तो दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे. अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. त्यात त्याने अनेक गोष्टींची कबुली दिली आहे.