बेतिया : पश्चिम चंपारण जिल्ह्यातून सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरूद्ध निदर्शने सुरू करण्यासाठी आलेल्या जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कन्हैयाची सभा बेतियातील गांधी मैदानावर होणार होती, परंतु कायदा व सुव्यवस्था पाहता प्रशासनाने या सभेस परवानगी नाकारली होती. याचा निषेध म्हणून कन्हैया महात्मा गांधी स्मारकाबाहेर धरणे आंदोलनास बसला तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कन्हैयाच्या अटकेने कार्यकर्ते संतप्त झाले आणि गांधी आश्रमाबाहेर गोंधळ उडाला.
तत्पूर्वी कन्हैयाने गांधी आश्रमात महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी कन्हैयाचे शेकडो समर्थक तेथे उपस्थित होते. दुपारी एक ते संध्याकाळपर्यंत कन्हैया गांधी मैदान येथे सीएएविरोधी प्रचारसभेला संबोधित करणार होता. प्रशासनाचे म्हणणे आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था पाहता ही बैठक रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
‘कन्हैय्या गो बॅक’च्या घोषणा
सीएएविरूद्ध सभांची सुरुवात करण्यासाठी आलेल्या कन्हैयाला पश्चिम चंपारणमधील चनपटिया येथे विरोधाचा सामना करावा लागला. बॅनर-पोस्टर्स घेऊन शेकडो लोक रस्त्याच्या कडेला उभे होते. कन्हैयाचा काफिला जाताना लोकांनी कन्हैया गो बॅकच्या घोषणा दिल्या.