पेन विकणारा मुलगा ते बिझनेस सेंटरचा मालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020   
Total Views |
ramesh_1  H x W


साधारणत: १९७५चा काळ. ‘पेन ले लो, पढ लो, किस्मत लिख लो...’ अठरा वर्षांच्या रमेशचं बोलणं ऐकून दादरच्या पुलावरची माणसं थांबायची. त्याच्याकडे कौतुकाने पाहायची. हा मात्र वेगवेगळे हेल काढून पेन विकायचा. अंगात एकच शर्ट-पँट, जी तो धुवून आलटून पालटून घालायचा. जर कोणी त्यावेळी सांगितलं असतं की, या मुलाचं याच दादर स्टेशनच्या बाजूला ‘बिझनेस सेंटर’ होईल, तर लोकांनी त्याला कदाचित वेड्यात काढलं असतं. मात्र, रमेशच्या मेहनतीने, चातुर्याने हे खरं ठरलं. जिथे पेन विकलं, त्याच दादरसारख्या ठिकाणी त्याने ‘बिझनेस सेंटर’ उभारलं. ‘रंगकौशल्य बिझनेस सेंटर’चे संचालक रमेश मेश्राम यांची ही यथोगाथा जरा हटकेच आहे.

विदर्भातला वर्धा जिल्हा. या जिल्ह्यातला पुलफैल भाग. याच भागातून रेल्वेचा रुळ जातो. या रुळाजवळ एक वस्ती. काही अंशी बदनाम. कारण, दिवसाढवळ्या येथून मालगाडी जाताना ग्रीस लावून मालगाड्या थांबवल्या जायच्या. काही कळायच्या आत मालगाडीतला माल, मग ते अन्नधान्य असेल, कपडे असतील किंवा आणखी काही सामान, ते फस्त व्हायचं. ही वस्ती एवढी खतरनाक की दिवसासुद्धा पोलीस वस्तीत जायला घाबरत. याच बदनाम वस्तीत श्रीरंग मेश्राम, पत्नी कौशल्या आणि त्यांची आठ मुलं राहत होती. श्रीरंग मेश्राम फळविक्री साखळीतील मधला दुवा म्हणून काम करायचे, तर कौशल्या भाजी विकायच्या. या आठ भावंडांमधलं शेंडेफळ म्हणजे रमेश. शेंडेफळ असल्याने खोडकर. आईसोबत भाजी विकायला गेल्यावर दोन तासांत तो भाजी विकायचा. वेगवेगळे आवाज काढत भाजी विकल्याने लोक याच्याकडचीच भाजी घ्यायचे. ‘बोलणार्‍याची माती पण खपली जाते’ ही म्हण रमेश शब्दश: जगला.

जिल्हा परिषदेच्या शाळेतून सातवीपर्यंत तर पुढे मॉडेल हायस्कूलमधून त्याने दहावी पूर्ण केली. वर्ध्याच्या यशवंत महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण झालं. मोठ्या भावाने पाहिलं की,हा इथे राहिला तर बिघडून जाईल. त्याने रमेशला मुंबईला जायला सांगितले. रमेशने घरातला रेडिओ विकला. त्यातून आलेले ४० रुपये घेऊन घरातून निघाला. वर्धा-दादर रेल्वेगाडीचे ३२ रुपयांचे तिकीट काढले. ५ ऑगस्ट, १९७५ साली फलाटावर उतरला तेव्हा अवघे ८ रुपये खिशात होते. दुसर्‍या क्रमांकाचा भाऊ राधेश्याम जे ’शाम-ए-बंबई’ नावाचं नियतकालिक चालवायचे, त्यांच्याकडे राहू लागला. दादरला पेन विकू लागला. १९७९ पर्यंत त्याने पेन विकले. एके दिवशी राधेश्यामने रमेशला एका पोलीस अधिकार्‍याची मुलाखत घ्यायला पाठविले. काहीसा घाबरतच तो पोहोचला. मात्र, त्या अधिकार्‍याने पत्रकार म्हणून दिलेल्या सन्मानाने रमेश भारावला. पुढे तो पत्रकारितेत रमला.

पत्रकारितेत असताना मुख्यत: गुन्हे वार्तांकन तो करू लागला. त्यामुळे मुंबईच्या अनेक कुख्यात डॉनच्या रमेशने मुलाखती घेतल्या. अगदी करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन, बाबू रेशीम ते अरुण गवळीचा त्यात समावेश आहे. जे. एफ. रिबेरो, अरविंद इनामदार, जयवंत हारगुडे, मन्या सुर्वेचा एन्काऊंटर करणारे इसाक बागवान, राजन तांबट, विष्णू कुंभार, फत्तेसिंग गायकवाड या नावाजलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्यादेखील मुलाखती त्यांनी घेतल्या. ‘मनोहर कहानियाँ’, ‘सच्ची दुनिया’, ‘नूतन कहानियाँ’, ‘ग्लोब डिटेक्टिव्ह’सारख्या विविध नियतकालिकांमधून ४०० पोलीस चातुर्यकथा त्यांनी लिहिल्या.

मार्च १९७९ साली रमेश मेश्राम यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. भूमी अभिलेख खात्यात ‘सर्व्हेअर’ म्हणून त्यांना शासकीय नोकरी मिळाली. पुढे १९८३ साली मालू या सोज्वळ तरुणीसोबत त्यांचा विवाह झाला. पुढे मालूची ‘कविता मेश्राम’ झाली. या दाम्पत्याला तुषार आणि तृप्ती अशी मुले आहेत. पत्रकारितेत काम केल्यामुळे राजपत्रित महासंघाने त्यांना २००५ साली ‘जनसंवाद सचिव’ म्हणून नियुक्त केले.

दरम्यान, १९९२ साल मेश्रामांसाठी कलाटणी देणारे ठरले. दादरच्या पुलावर पेन विकताना भूपेश दवे यांच्यासोबत त्यांची मैत्री झाली, जी आजसुद्धा घनिष्ट आहे. भूपेश दवे आणि रमेश मेश्राम यांनी दादरमध्ये एक जागा विकत घेतली. तब्बल १२ लाख रुपये त्यासाठी त्यांनी व्याजाने काढले. त्या जागेवर छोट्या-छोट्या अशा २५ केबिन्स तयार केल्या. या केबिन्स लघु-मध्यम स्वरूपाचे उद्योजक, व्यावसायिक, नव-उद्यमी उद्योजक यांना भाड्याने दिल्या जातात. गेल्या २८ वर्षांत साडेतीन हजारांहून अधिक उद्योजकांनी याचा लाभ घेतला आहे. एकप्रकारे ‘रंगकौशल्य बिझनेस सेंटर’ हे उद्योग व्यवसाय वाढविणारे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. पेन विकणारा मुलगा दादरसारख्या ठिकाणच्या ‘बिझनेस सेंटर’चा मालक होतो, हे खरंच अभिमानास्पद आहे.

‘रंगकौशल्य’ हा मेश्रांमासाठी फक्त एक शब्द नाही, तर ते एक व्रत आहे. कारण, वडील ‘श्रीरंग’ यांच्या नावातलं ‘रंग’ आणि आई ‘कौशल्या’ या दोहोंच्या नावाचं ते मिश्रण आहे. ‘रंगकौशल्य’ नावाने ते मुलुंडमध्ये एक कट्टा चालवतात. या कट्ट्याच्या माध्यमातून ते गोरगरिबांना, पीडितांना, गरजूंना, अपंगांना यथाशक्ती मदत करतात, विविध सामाजिक कार्ये करतात. चैत्यभूमीवर येणार्‍या आंबेडकरी अनुयायांसाठी त्यांनी ‘रंगकौशल्या’च्या नावाने एक अभिनव उपक्रम राबविला. २००८ साली त्यांनी आलेल्या अनुयायांसाठी फोन उपलब्ध करून दिले. घरच्यांसोबत संपर्क साधण्यासाठी ही विनामूल्य सेवा त्यांनी दिली. त्यानंतर मोफत मोबाईल रिचार्ज सेंटर उभारले होते.

रमेश मेश्रांमांना अभिनयाची आवडदेखील आहे. हिंदीतील ‘जोधा-अकबर’, मराठीतील सुपरहिट मालिका ‘माझ्या नवर्‍याची बायको’, ’असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, अशा विविध मालिकेतून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. या संपूर्ण प्रवासात आपले कुटुंब, मित्र परिवारातले जयवंत हारुगडे, भूपेश दवे यासारख्या अनेक मित्रांचा मोलाचा वाटा असल्याचे ते मान्य करतात. पेन विकणारा एक मुलगा ते ‘बिझनेस सेंटर’चा मालक हा रमेश मेश्रामांचा प्रवास मराठी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
@@AUTHORINFO_V1@@