इमरान खान जे बोलले, त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाहीच. नशेत माणूस मनातलं बोलतो, असं म्हणतात. मग ती नशा दारूची असो, अमली पदार्थांची अथवा भूल देणाऱ्या औषधांची. खान बोलले त्यावर कोणाला आक्षेप घ्यावासा वाटत नाही. सगळ्या ‘फेमिनिस्ट’ शांत आहेत. कारण, त्यांनीही कोणाच्यातरी द्वेषाची नशा करून ठेवलेली असतेच. ती नशा त्यांना शत्रूच्या शत्रूचे लांगूलचालन करायला भाग पाडते. एका मुस्लीम मूलतत्त्ववादी देशाच्या पंतप्रधानाने एका परिचारिकेला चक्क ‘हूर’ म्हटले. आता त्यात आपल्याकडील स्त्रीमुक्तीवाल्यांना काही वावगेही वाटले नसावे. परिचारिकेला ‘हूर’ म्हणून संबोधताना इमरान खान म्हणे पेनकिलर्सच्या प्रभावाखाली होते. इमरान खान यांना व त्यांची भाषा बोलणाऱ्यांना भरभरून पेनकिलर्स खाण्याची गरजही आहेच म्हणा. कारण, त्यांची दुखणीही अवघड जागेची झाली आहेत. प्रश्न काश्मीर, कलम ३७०चा असो, नागरिकता कायद्याचा असो किंवा सर्जिकल स्ट्राईकचा, आपल्या हिंदूद्वेषाची विषारी दारू विकून स्वतःच्या राजकीय हातभट्ट्या चालवणाऱ्या सगळ्यांची दुखणी सारखीच आहेत.
आपल्याकडल्या फेमिनिस्टांची हयात मंदिराच्या दरवाजावर केलेल्या बंडात धन्यता मानण्यात जाते. अधूनमधून तिहेरी तलाक बंदीसारखे महिला सबलीकरणाचे निर्णय घेतले जातात. त्यावेळी अशा स्त्रीमुक्तीवाल्या मंडळींना उघडपणे भूमिकाही घेणे शक्य होत नाही. त्यांचे दुखणे व इमरानचे दुखणे सारखेच. अशा असह्य वेदनांनी गलितगात्र झालेल्या पंतप्रधानाने पेनकिलर्स घेऊ नयेत का? सगळी चूक त्या पेनकिलर्सचीच. त्यांच्या नशेत इमरान खान एका परिचारिकेला ‘हूर’ म्हणाले. त्यामुळे दोष कुणाचा असेल तर तो त्या पेनकिलरचा आहे.
इमरान खान यांना इस्पितळात भरती करण्यात आले होते. ते स्टेजवरून पडले व दुखापत झाली. तेव्हा त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता, हादेखील संशोधनाचा विषय असू शकतो. कदाचित भारतद्वेषाच्या नशेतच ते असावेत. इमरान खान त्याऐवजी दुसरे काय बोलू शकणार व त्यांना ऐकणारे श्रोतेही त्याशिवाय काय पचवू शकतात? इस्पितळात औषधपाणी होऊन बरे झाल्यावर आपले मनोगत मांडताना त्यांनी परिचारिकेला ‘हूर’ म्हणण्याचा प्रकार केला आहे. इमरान यांच्या मते, आजारातून बरे झाल्यावर समोर आलेली परिचारिका त्यांना ‘हूर’ दिसत होती. इस्लामच्या मानण्यानुसार, जन्नतमध्ये ‘हूर’ असतात. त्यांना तुम्ही उपभोगू शकता व त्या अत्यंत देखण्या असतात. जितक्या वेळा तुम्ही त्यांच्याकडे पाहाल, तितके त्यांचे सौंदर्य वाढत जाते, असे इस्लामचे म्हणणे आहे. याच हुरांच्या कथा त्यांचे अनेक धर्मगुरू मशिदीतून ओरडून ओरडून सांगत असतात. याच प्रेरणेने लाखो तरुण ‘जिहाद’ करण्यासाठी हाती बंदुका घेतात. जगण्याच्या केंद्रस्थानी असलेल्या या एकमेव प्रेरणेला ‘जन्नत’ म्हटले गेले आहे.
तसा स्त्रीत्वाचा अपमान इस्लामसाठी नवा नाही. कदाचित तीच त्यांची ‘मजहब’ संकल्पना आहे. इमरान यांच्या या वक्तव्यावर कोणतीच भूमिका भारतातील ‘फेमिनिस्ट’ म्हणून मिरवणार्यांपैकी कोणालाच घ्यावीशी वाटत नाही. शेहला रशीद, बरखा, इंदिरा जयसिंग यांना याविरुद्ध अवाक्षरही काढावेसे वाटले नाही. पाकिस्तानच्या दूतावासासमोर पोस्टर्स घेऊन उभे राहिलेले कोणी दिसले नाही.
प्रश्न इमरान खान यांचे प्रबोधन करण्याचा नसून स्त्रीमुक्तीच्या नावाखाली चालवलेल्या फसवणुकीचा आहे. कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ठराव मंजूर करण्याचे सोपस्कारही करून झाले. इस्पितळातील एका महिला कर्मचाऱ्याविषयी एका देशाचे प्रमुखच अशी टिप्पणी करतात. यावरून त्या देशातील परिस्थिती किती भीषण असेल, याचा अंदाज लावता येऊ शकतो.
पेनकिलर प्रकरणाच्या निमित्ताने झालेली ही एका गुन्हेगाराची नार्को-चाचणीच म्हटली पाहिजे. त्यांच्या कलुषित मनाला काय वाटते, ते बोलून इमरान खान मोकळे झालेत. अजून त्यांनी माफी मागितलेली नाही. स्त्रीमुक्तीचे दावे ठोकणाऱ्यांना अजूनही भूमिका घेण्यास वाव आहे. इमरान खान यांना सवाल करण्यासाठी कुणीतरी पुढे येईल, इतकीच आशा आपण बाळगू शकतो.