‘विवेक विचार मंच’कडून तीव्र निषेध
औरंगाबाद : ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) आणि ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’(एनआरसी) प्रक्रियेला विरोध करण्यासाठी ‘बहुजन क्रांती मोर्चा’च्यावतीने पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनादरम्यान जमावाकडून पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे घडला.
या प्रकाराचा ‘विवेक विचार मंच’ मराठवाडा प्रांतच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. याबाबत ‘विवेक विचार मंच’च्यावतीने शहरातील पोलीस आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले असून याप्रकरणी कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
‘विवेक विचार मंच’च्या पत्रात लिहिले आहे की, “ ‘भारत बंद’ची हाक देणार्या ‘बहुजन क्रांती मोर्चा’ आणि इतर सहभागी संघटनांच्या जमावाने बुधवारी औरंगाबाद शहरात बळजबरीने वाहनांची अडवणूक करून गुंडगिरी केली. इतकेच नव्हे, तर पोलिसांनादेखील मारहाण केली. तसेच त्यांचे कॅमेरेही फोडण्यात आले. या घटनेच्या बातम्यादेखील विविध संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक असलेल्या पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीयदेखील आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या घटनेत सहभागी व्यक्ती, संघटना याच्यांवर कडक कारवाई करावी,” अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. या पत्रावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, कार्यवाह, महेश पोहनेरकर, औरंगाबाद जिल्हा संयोजक अप्पासाहेब पाटील पारदे आणि समन्वयक सागर शिंदे यांच्या स्वाक्षर्यादेखील आहेत.
नेमके काय घडले?
‘बहुजन क्रांती मोर्चा’ने आयोजित ‘भारत बंद’दरम्यान एक जमाव शहरातील विविध भागात फिरून ‘बंद’चे आवाहन करीत होता. दुपारी १ ते सव्वा वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक येथून बाहेरगावी निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला जमावाने अडविले. यावेळी समजावून सांगणार्या पोलीस कर्मचार्यांशी जमावाने अरेरावी केली. तसेच या घटनेचे चित्रीकरण करणार्या पोलीस कर्मचारी संतोष जोशी आणि संजय भोटकर यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातातील कॅमेरा हिसकावून घेत फोडून टाकला.