मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विद्यार्थ्यांनी देशभरात सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवी नियमावली जारी केली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील आंदोलनातील वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रविरोधी आणि समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होऊ नका , असा इशारा आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना दिला आहे.
समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य करण्यात येऊ नये, तसेच परिसरात प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पत्रके वाटण्यात येणार नाही. कॅम्पसमध्ये असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करण्याची मुभादेखील देण्यात आली आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना साम्ज्विघात्क आणि राष्ट्रविरोधी कृत्यांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
'अँटी नॅशनल' शब्दावर विद्यार्थ्यांची नाराजी
हॉस्टेलच्या या नियमावलीत 'अँटी नॅशनल' शब्दाचा वापर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे राजकीय विचार कँम्पसच्या बाहेर व्यक्त करावेत, असे आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशीष चौधरी यांनी म्हंटले होते. त्यानंतर ही नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही तीन हजार शब्दांचे एक पत्र लिहून संचालकाच्या या विधानावर आक्षेप घेतला होता.