मुंबई : आज बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी भारत बंद पाळण्यात येत आहे. या बंदवरून मनसेने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तीव्र शब्दांत टीकास्र सोडले आहे. आजचा बंद हा सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनसेने माध्यमांशी बोलतना केला आहे.
सांगली, धुळे या ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले आहे. तर मुंबईत कांजुरमार्ग स्थानकात रेलरोको करण्यात आला होता. काही ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या बंदवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाराष्ट्र व्यापारी संघटनांनी यापुढे कोणत्याही राजकीय बंदमध्ये शामिल न होण्याचा निर्णय घेतला असल्याने या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मनसेने मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील बंद हा सरकार पुरस्कृत आहे. राज्य सरकारच बंद पुकारत आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. भारत बंदबाबत नेमके तेच घडत आहे, असेही देशपांडे म्हणाले.