पाकी हिंदूंना वाली कोण?

    27-Jan-2020   
Total Views | 120
jagachya pathivar_1 

जगभरात मानवाधिकाराच्या गप्पा झोडणाऱ्या, पाकिस्तानात अल्पसंख्य हिंदू समाजाशी व्यवहार करताना मानवाधिकाराच्या कशा चिंधड्या उडवल्या जातात, हे दाखविणाऱ्या दोन घटना नुकत्याच उघड झाल्या. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील या घटना असून त्यापैकी एकात हिंदू मुलीला विवाहमंडपातून पळविण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत धर्मांध मुस्लिमांनी थारपरकर परिसरातील हिंदू मंदिरात घुसून तोडफोड केली. उल्लेखनीय म्हणजे, या दोन्ही घटना इकडे भारतात सुधारित नागरिकत्व कायद्यावरून डाव्या, काँग्रेसी, बुद्धीजीवी, विचारवंत, अभ्यासकांनी ओकाऱ्या काढत धिंगाणा घालायला चालू केले त्याचवेळी घडल्या. परंतु, मुस्लिमांच्यापुढे वाकण्यासाठीच ज्यांचा जन्म झाला, त्यांना सीमेपलीकडे हिंदूंवर होणारा अन्याय-अत्याचार दिसणार नाहीच. उलट इथे भारतात सुखाचे आयुष्य कंठणाऱ्या मुस्लिमांच्या कथित गळचेपीच्या खोट्यानाट्या कहाण्या रंगवून आपल्या तुंबड्या भरण्यातच ते मशगुल राहतील. नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्या तून लाखो हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणाऱ्या धर्मांध जिहाद्यांचा उल्लेख केल्यावर जसे यांच्या तोंडाला बूच लागते, तसेच ते पाकिस्तानातील हिंदूंविरोधातील शेकडो कृत्ये समोर आल्यावरही मूग गिळून गप्प बसणेच शहाणपणाचे समजतात. अर्थात त्यामागे भारतातलाच नव्हे, तर जगभरचा हिंदू प्रताडित व्हावा आणि त्याचे वाटोळे व्हावे, हा अविचार पाळणाऱ्यांचा कसला ना कसला स्वार्थ असतोच. तो कधी स्वयंसेवी संस्थांच्या रूपाने, कधी परदेशी देणग्यांच्या रूपाने तर कधी ऐशोआरामी जीवनशैलीच्या रूपाने पुरा केला जातो.


दरम्यान, रविवारी पाकिस्तानच्या मटियारी जिल्ह्यातील भारतीबाई कुमारी नामक मुलीचे दिवसाढवळ्या विवाहमंडपातून अपहरण करण्यात आले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला पळवून नेले त्यावेळी तिथे विवाहाचे विधी सुरू होते. त्याचवेळी शाहरुख गुल नावाच्या एका बदमाश युवकाने काही साथीदार आणि पोलिसांच्या मदतीने भारतीबाईचे अपहरण केले. नंतर भारतीबाईने इस्लाम धर्म कबूल केल्याचे आणि शाहरुख गुलशी निकाह लावल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांतून व्हायरल करण्यात आले. व्हायरल व्हिडिओतून दावा करण्यात आला की, “भारतीबाईने १ डिसेंबरला इस्लाममध्ये धर्मांतर केले आणि म्हणूनच तिचे अपहरण करण्याची वेळ आली. मुस्लीम झालेल्या भारतीबाईचे नवे नाव ‘बुशरा’ असे आहे.” परंतु, व्हायरल व्हिडिओतून भारतीबाईचा निकाह शाहरुखशी कधी लावला गेला, हे स्पष्ट होत नाही. आता मुलीचे आईवडील तिच्या परतण्याची मागणीही करत आहेत. भारतीबाईशी संबंधित हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग सिरसा यांनी एक व्हिडिओ जारी करत पाकिस्तान व स्थानिक प्रशासनावर शाहरुखसह अन्य गुंडांची मदत केल्याचा आरोप केला आहे. भारतीबाईच्या प्रकरणात तिने एक महिन्याआधीच इस्लाम स्वीकारल्याचे आणि निकाहाचे दस्तावेज तयार करून दिल्याचा आरोप त्यांनी तिथल्या प्रशासनावर केला. तसेच गेल्या ७५ दिवसांत धर्मांध कट्टरपंथीयांनी सुमारे ५३ हिंदू आणि शीख मुलींचे बळजबरीने धर्मांतर करून निकाह लावल्याचा दावा त्यांनी केला आहे.


दुसरीकडे पाकिस्तानात हिंदूंसह अन्य अल्पसंख्याकांच्या धर्मस्थळांच्या विटंबनेची मालिका सातत्याने सुरूच आहे. शीख समुदायाच्या नानकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता धर्मांधांनी सिंधमधील एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले. थारपरकरच्या चाचरो भागातील माता रानी भातियानी मंदिरातील पवित्र मूर्तीला धर्मांध मुस्लिमांच्या जमावाने काळे फासले, तसेच मूर्तीची तोडफोड करत ग्रंथांची नासधूस केली. मात्र, सिंध प्रांतात कट्टरपंथीयांच्या नंगानाचाचे तिथल्या पोलिसांना वा प्रशासनाला कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसते. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान तर दररोज काश्मीरवरून भारतावर टीका करताना, रडताना दिसतात. परंतु, स्वतःच्या देशात अल्पसंख्याकांच्या उत्पीडनाचे हे भयानक प्रकार त्यांना कधी दिसत नाही. अशा परिस्थितीत भारत सरकारने नागरिकत्व कायद्या सुधारणा करून पाकिस्तानसह बांगलादेश व अफगाणिस्तानातील हिंदूंना आश्रय देण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचेच स्पष्ट होते.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121