ऑस्ट्रेलियातील जंगलात एका ठिकाणी नव्हे, तर १०० ठिकाणी वणवे पेटले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि अग्निशमन विभागाच्या महत्प्रयासाने त्यावर नियंत्रण मिळवता आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, जंगलातील वणव्यामुळे ऑस्ट्रेलियातील कोआला या प्राण्याच्या एक तृतीयांश संख्येचा बळी घेतला.
साधारणतः महिन्या-दोन महिन्यापासून धुमसणार्या ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील वणव्यामुळे प्रचंड वनसंपत्तीचे नुकसान झाल्याचे समोर आले. परंतु, अगदी थोड्याशा कालावधीत होत्याचे नव्हते झालेल्या या जंगलाला पुन्हा मूळ स्वरूपात आणण्यासाठी जवळपास १०० वर्षांचा काळ लागेल, असे म्हटले जात आहे. नुकतेच पावसाच्या सहयोगामुळे ऑस्ट्रेलियातील जंगलांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, त्यानंतर ही माहिती पुढे येत आहे. दरम्यान, जंगलात लागलेल्या वणव्यामुळे सुमारे एक अब्ज जीव-जंतू नष्ट झाले, तर कितीतरी लुप्तप्राय प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, त्यांचे अस्तित्वच संपले. जंगलातील वणव्याने प्राणी, पशु-पक्ष्यांसह कोट्यवधींची संपत्तीही स्वाहा झाली, तर आगीमुळे २८ माणसांचाही जीव गेला. हा वणवा इतका मोठा होता की, 'नासा'ने उपग्रहांच्या माध्यमातूनही त्याची छायाचित्रे घेतली. आगीचा ताप परमोच्च होता, त्यावेळी संपूर्ण ऑस्ट्रेलियातील वातावरणही लालेलाल झाले होते. आगीमुळे निर्माण झालेला धूर ऑस्ट्रेलियात तर पसरलाच, पण त्याने न्यूझीलंडचे आकाशही गाठले.
वणवा भडकल्यानंतर, तो शमल्यानंतर आता पर्यावरण क्षेत्रातील जाणकार-विशेषज्ज्ञ त्यासंबंधी अधिक माहिती घेत आहेत. तसेच त्यांच्या मते एका शतकाचा कालावधी तरी हे जंगल पुन्हा एकदा पूर्वीसारखे उभे राहण्यासाठी लागेल. ऑस्ट्रेलियाचे अग्निशमन विभागप्रमुख मिक क्लार्क म्हणाले की, "आगीची घटना एवढी मोठी होती की, या प्रदेशाला हिरवेगार करण्यासाठी १०० वर्षे लागतील. इथल्या भागाची वणव्यापूर्वीची आणि वणव्यानंतरची छायाचित्रे पाहिली तरी अंदाज येऊ शकतो की, किती विद्ध्वंस झाला आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला हिरवळ होती ती आता गायब झाली आहे. संपूर्ण परिसरच उद्ध्वस्त झाला आहे. हिरवळ नष्ट झाली असून सगळीकडे केवळ राख आणि राखच दिसत आहे." 'नासा'च्या प्रवक्त्याने याबद्दल सांगितले की, "आग अतिशय मोठी होती व तिच्या धुराने सारा आसमंत व्यापला होता. तसेच वणवा सर्वत्र केवळ पसरत होता." तर पर्यावरण विशेषज्ज्ञांचे म्हणणे आहे की, "आगीच्या धुराने जगातील वातावरणाला किंवा वायुमंडळालाही प्रभावित केले. आगीमुळे धोकादायक वायू अधिक प्रमाणात निर्माण झाले आणि हवेची गुणवत्ताही अधिकच खालावली."
ऑस्ट्रेलियातील जंगलात एका ठिकाणी नव्हे, तर १०० ठिकाणी वणवे पेटले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि अग्निशमन विभागाच्या महत्प्रयासाने त्यावर नियंत्रण मिळवता आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, जंगलातील वणव्यामुळे ऑस्ट्रेलियातील कोआला या प्राण्याच्या एक तृतीयांश संख्येचा बळी घेतला. ऑस्ट्रेलियात कोआलांची संख्या आधीच कमी होती आणि आता आगीमुळे हा प्राणी जवळपास संपल्यातच जमा आहे, असेही म्हटले जात आहे. तसेच प्रचंड मोठ्या भूभागावर लागलेल्या आगीमुळे सर्वच गोष्टींना राख केले आहे. दरम्यान, या आगीमुळे ऑस्ट्रेलियन जंगलातील तीन प्रजाती संपूर्णत: नामशेष झाल्या आहेत. त्यात दक्षिणेकडील बेडूक, रीजेंट हनीटर पक्षी आणि पश्चिमेकडील जमिनीवरील पोपटांचा समावेश आहे, तर अस्तित्व धोक्यात आलेल्या प्राण्यांमध्ये दक्षिण-पूर्वेकडील कोआला, कांगारू द्वीप डुनर्ट, चमकणारे काळे कॉकटू, लांब पायांचे पोटरू, पश्चिमेकडील जमिनीवरील पोपट, ब्ल्यू माऊंटन वॉटर स्किंक, पूर्वेकडील ब्रिसल्टर्ड आणि ब्रशसारख्या शेपटीच्या रॉक वालबायचा समावेश आहे.
दरम्यान, जंगलातील वणव्यामुळे सुमारे १५ दशलक्ष हेक्टर परिसर जळून खाक झाला आणि त्याला पुन्हा जसेच्या तसे करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने ३४.५ दशलक्ष डॉलर्सच्या निधीची घोषणा केली आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बुश फायर रिकव्हरी फंडामध्ये जवळपास एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणादेखील केली आहे. या निधीच्या साह्याने आगीमुळे नष्ट झालेली घरे आणि पायाभूत सोयी-सुविधांना आगामी दोन वर्षांत पुन्हा उभे केले जाईल. परंतु, माणसाने निर्माण केलेल्या गोष्टी वा झाडे पुन्हा अस्तित्वात येतील, पण ज्या प्राण्यांच्या प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या, त्यांचे काय? पृथ्वीवरील शेकडो प्राणी गेल्या लाखो वर्षांत नष्ट झाले व ते पुन्हा कधीही दिसले नाही, तशीच अवस्था आता ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील नामशेष प्राण्यांचीही होईल, ते फक्त चित्रात दिसतील.